श्रावण महिन्यात दरवर्षी होते गर्दी
वार्ताहर / दोडामार्ग:
श्रावण महिन्यात दर सोमवारी गजबजलेले कसईनाथ डोंगर हे धार्मिक ठिकाण कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी बंद राहणार आहे. याबाबतचे तसे प्रसिद्धीपत्र आंबेली गावचे विठोबा पालयेकर यांनी काढले आहे.
दोडामार्ग शहरालगत आंबेली येथे असलेल्या कसईनाथ डोंगराची ओळख फार पूर्वीपासून आहे. दोडामार्ग आंबेलीच्या सीमेवर असलेल्या या डोंगराला पांडवकालीन पार्श्वभूमी आहे. आपल्या अज्ञातवासात जेव्हा पांडव ठिकठिकाणी फिरत होते. तेव्हा एके रात्री ते या डोंगरावर राहून गेल्याच्या खाणाखुणा आढळतात. डोंगर माथ्यावर श्री गणेश, शिवलिंग तसेच नंदी यांच्या पाषाणमूर्ती असून श्रावण महिन्यातील दर सोमवारी व गुरुवारी पूजाअर्चेसाठी मोठी गर्दी जमते. केवळ धार्मिक स्थळ म्हणूनच नव्हे तर पर्यटनदृष्टय़ाही कसईनाथ डोंगर विशेष प्रसिद्ध असून डोंगर चढून गेल्यावर दिसणाऱया सह्याद्रीच्या पर्वतरांगा, कोसळणारे धबधबे, विलोभनीय हिरवेगार निसर्ग येथून पाहता येतो त्यासाठीही अनेक पर्यटक येत असतात. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गोवा, कर्नाटक, कोल्हापूर सारख्या ठिकाणांहून होऊ शकणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी कसईनाथ डोंगर दर्शन तसेच आंबेली गावातील सिद्धनाथ सातेरी मंदिरातील वार्षिक पूजा महाप्रसाद कार्यक्रमही होणार नसल्याचे पालयेकर यांनी स्पष्ट केले आहे.