Tarun Bharat

आक्रमक फलंदाजी हाच योग्य पर्याय होता

Advertisements

भारतीय सलामीवीर रोहित शर्माचे प्रतिपादन, अष्टपैलू फिरकीपटू अक्षर पटेलची मुक्तकंठाने प्रशंसा

अहमदाबाद / वृत्तसंस्था

‘मोटेराच्या खेळपट्टीवर केवळ तग धरणे नव्हे तर आक्रमकपणे धावा जमवणे हाच पर्याय योग्य होता, त्या खेळपट्टीत काहीच दोष नव्हता, फलंदाजांनी ज्याप्रमाणे फटके निवडले, त्याप्रमाणे खेळपट्टी वागत गेली’, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय सलामीवीर रोहित शर्माने केले. भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी फिरकीला पोषक खेळपट्टीवर अवघ्या दोनच दिवसात निकाली झाली, त्या पार्श्वभूमीवर रोहित बोलत होता.

भारत व इंग्लंड संघातील जवळपास सर्वच फलंदाज दोनपैकी किमान एका डावात अपयशी ठरले. रोहितने मात्र दोन्ही डावात तडफदार फलंदाजी साकारली. या मुंबईकर फलंदाजाने पहिल्या डावात 96 चेंडूत 66 धावांसह शानदार अर्धशतक झळकावले तर दुसऱया डावात 25 चेंडूत नाबाद 25 धावा फटकावत 10 गडी राखून विजय संपादन करुन देण्यात मोलाचा वाटा उचलला.

‘या प्रकारच्या खेळपट्टीवर फलंदाजी करत असताना धावा जमवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे पथ्यावर पडते. प्रत्येक वेळी चेंडू तटवणे हाच पर्याय नसतो. पहिल्या डावात 66 धावांची खेळी साकारली, त्यावेळी मी इंग्लिश गोलंदाजांपेक्षा एक-दोन पावले पुढे होतो. आक्रमक बाण्यावर भर दिला, म्हणूनच मी तेथे धीरोदात्तपणे फलंदाजी करु शकलो. ही खेळपट्टी माझ्या मते रंजक होती. तेथे काही चेंडू सरळ येत होते तर काही अचानक वळत होते’, असे निरीक्षण रोहितने पुढे नोंदवले.

रवींद्र जडेजाच्या स्थानी संघात आलेल्या अक्षर पटेलच्या भेदक गोलंदाजीची देखील रोहितने मुक्तकंठाने प्रशंसा केली. ‘अक्षरने सातत्याने स्टम्पवर मारा केला आणि यामुळे तो अधिक यशस्वी झाला. वास्तविक, यापूर्वी फारसे कसोटी क्रिकेट खेळलेले नसताना येथे येऊन इतकी भेदक गोलंदाजी साकारणे अतिशय अवघड होते. पण, त्याने अतिशय चतुराईने, भेदक गोलंदाजी केली. त्याने फलंदाजांना शक्य तितके चेंडू खेळणेच भाग पाडले आणि यामुळे तो अधिक यशस्वी ठरला’, असे हा दिग्गज फलंदाज म्हणाला.

चेन्नई, अहमदाबाद खेळपट्टीतील फरक

चेन्नई व अहमदाबादेतील कसोटीत खेळपट्टीत कसा फरक होता, या प्रश्नावर बोलताना रोहितने अहमदबादमध्ये आपल्या संघाची फलंदाजी अपेक्षित झाली नाही, हे मान्य करावे लागेल, असे नमूद केले. तो म्हणाला, ‘चेन्नईतील दुसऱया कसोटीत  इथल्या कसोटीपेक्षा अधिक चेंडू वळत होता. पण, चेन्नईत आमचे फलंदाज आक्रमक खेळले. अश्विनने तेथे शतक केले. विराट 60 धावांच्या आसपास पोहोचला. अहमदाबादमध्ये मात्र आमच्या धावा झाल्या नाहीत. चेंडू वळत नसेल तर कशी रणनीती अंमलात आणावी, याबद्दल अधिक विचार होणे आवश्यक आहे. येथील कसोटीत बहुतांशी फलंदाज सरळ चेंडूवरच बाद झाले’.

लाल चेंडू व गुलाबी चेंडूने खेळताना नेमका कसा फरक पडतो, यावर बोलताना रोहितने गुलाबी चेंडू लाल चेंडूच्या तुलनेत अधिक वेगाने बॅटवर येतो, असे निरीक्षण नोंदवले. इंग्लंडविरुद्ध 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. उभय संघातील चौथी कसोटी गुरुवार दि. 4 मार्चपासून सुरु होईल.

अक्षर म्हणाला, आत्मविश्वास यशाची गुरुकिल्ली ठरली

A

रवींद्र जडेजाच्या रुपाने नियमित फिरकी अष्टपैलू संघात असताना अक्षर पटेलला सातत्याने संघाबाहेर रहावे लागले. पण, इंग्लंडविरुद्ध संधी मिळाल्यानंतर त्याने याचे पुरेपूर सोने केले आणि पत्रकार परिषदेत बोलताना हेच त्याच्या वक्तव्यातूनही प्रतिबिंबित झाले.

‘मागील तीन वर्षे सातत्यपूर्ण प्रदर्शन साकारत असताना देखील मी संघाबाहेर होतो. बाहेर मला विचारले जायचे की, उत्तम फॉर्ममध्ये असूनही तू संघात का नाहीस. पण, माझ्या मते आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली होती’, असे अक्षर याप्रसंगी म्हणाला.

गुजरातच्या या 27 वर्षीय डावखुऱया फिरकी अष्टपैलूने इंग्लंडविरुद्ध तिसऱया कसोटीत 11 बळी घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला. अक्षरने बांगलादेशविरुद्ध वनडेत भारतीय संघातर्फे पदार्पण केले. पण, त्यानंतर संघात आंतरराष्ट्रीय पुनरागमनासाठी त्याला 7 वर्षे प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली. रवींद्र जडेजा नियमित सदस्य असल्याने अक्षरला संधी मिळतच नव्हती. आताही जडेजा दुखापतग्रस्त असल्यानेच अक्षरला संघात घेतले गेले. इंग्लंडविरुद्ध चेन्नईत त्याला कसोटी पदार्पण नोंदवता आले. अक्षरने आतापर्यंत खेळलेल्या 141 प्रथमश्रेणी सामन्यात 25.25 च्या सरासरीने 152 बळी घेतले आहेत.

असाही विरोधाभास…..कुछ दिन तो गुजारो गुजरात मे!

गुजरात राज्य पर्यटन विभागाच्या जाहिरातीतून महानायक अभिताभ बच्चन प्रदीर्घ कालावधीपासून कुछ दिन तो गुजारो गुजरात मे, अशी साद घालताना सातत्याने दिसून येतात. येथील अहमदाबाद कसोटीत मात्र पाच दिवसांची कसोटी अवघ्या दोनच दिवसात संपली आणि बच्चन यांचे ते आवाहन तिसऱया कसोटीत दोन्ही संघांनी पाळले नाही, अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर दिवसभर व्हायरल होत राहिल्या.

कमी कसोटीत 400 बळी घेणारे गोलंदाज

गोलंदाज / संघ / सामने

मुथय्या मुरलीधरन / श्रीलंका /  72

रविचंद्रन अश्विन / भारत / 77

रिचर्ड हॅडली / न्यूझीलंड / 80

डेल स्टेन / द. आफ्रिका / 80

रंगना हेराथ / श्रीलंका / 84

अनिल कुंबळे / भारत / 85

भारताविरुद्ध कसोटी डावात निचांकी धावसंख्या

धावा / प्रतिस्पर्धी / षटके / ठिकाण / तारीख

79 / द. आफ्रिका / 33.1 / नागपूर / 25 नोव्हेंबर 2015

81 / इंग्लंड / 30.4 / अहमदाबाद / 24 फेब्रुवारी 2021

82 / श्रीलंका / 51.5 / चंदिगड / 23 नोव्हेंबर 1990

83 / ऑस्ट्रेलिया / 48.4 / मेलबर्न / 7 फेब्रुवारी 1981 84 / द. आफ्रिका / 25.1 / जोहान्सबर्ग / 15 डिसेंबर 2006.

Related Stories

बीसीसीआयकडून रुपरेषेबद्दल कोणतीही विनंती नाही

Patil_p

जोनाथनचा विजय दिवंगत भावाला समर्पित

Patil_p

कोलकात्याविरुद्ध लखनौचे पारडे जड

datta jadhav

यशस्वी प्रशिक्षक होण्यासाठी अनुभवाची गरज नाही

Patil_p

एथिक्स आयोग’ बरखास्तीचा निर्णय अयोग्य : राजीव मेहता

Patil_p

सर्व सदस्यांची चाचणी निगेटिव्ह : चेन्नई सुपरकिंग्सला दिलासा

Patil_p
error: Content is protected !!