Tarun Bharat

आक्रोश महापुराचा; बांधणी लोकसभेची

शेतकरी नेते राजू शेट्टींचे `मिशन हातकणंगले’

Advertisements

विठ्ठल बिरंजे / कोल्हापूर

शिवार ते संसद असा प्रवास करून 2019 मध्ये पुन्हा शिवारात परतलेल्या शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी पुन्हा आपला जुना अजेंडा बाहेर काढत `मिशन हातकणंगले’ची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्या वळचणीला गेल्यानंतर मिळणारी आमदारकी अजूनही दृष्टीक्षेपात येत नसल्याने शेट्टी यांनी `शेतकरी नेता’ ही आपली मूळची ओळख आणि `शेतकर्‍यांची चळवळ’ हा मूळ अजेंडा आता बाहेर काढण्यास प्रारंभ केला आहे. कोल्हापुरात पूरग्रस्त शेतकर्‍यांच्या आक्रोश मोर्चातून महाविकास आघाडीवर टिकेची तोफ डागणार्‍या शेट्टी यांनी सांगलीच्या परीघात भाजपच्या नेत्यांशी वाढवलेली जवळीक त्यांच्या भविष्यातील वाटचालीचे संकेत देणारी ठरत आहे.

जिल्हा परिषद सदस्य ते आमदार आणि थेट खासदार असा कष्टकरी शेतकर्‍यांच्या जीवावर आणि प्रश्नावर खडतर प्रवास करणार्‍या शेट्टी यांची शेतकरी नेता म्हणून गेल्या दशकात देशभर ओळख निर्माण झाली. देशपातळीवर काम करणार्‍या अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या उत्तरेतील बड्या नेत्यांच्या बरोबरीने शेट्टी यांचे नाव आहे. दोन टर्म खासदारकी भूषविलेल्या शेट्टींनी 2014 मध्ये निवडून आल्यानंतर एनडीएशी जवळीक केली. पण नंतर त्यांचे पंतप्रधान मोदी आणि भाजपशी बिनसले. 2016-2017 च्या दरम्यान त्यांनी एनडीएला सोडचिठ्ठी दिली. त्यावेळी मोदी सरकारविरोधात दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्वही शेट्टी यांनी केले. सरकारच्या धोरणावर कडाडून हल्ला चढवला. भाजपविरोधात त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा मार्ग स्वीकारला. ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी विरोधात त्यांनी आयुष्यभर कडवा संघर्ष केला. त्यांचीच सोबत केल्याने 2019 ला शेट्टी यांना जबर किंमत्त मोजावी लागली. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील बदललेल्या जातीय समीकरणांचा फटका शेट्टींना बसला. भाजपनेही शिवसेनेच्या मदतीने त्यांचा काटा काढला.

2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. त्यामुळे राजकीय समाकरणेही बदलली आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि आणि शिवसेना आघाडी करून लढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे धैर्यशील माने हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. शेट्टी जरी महाविकास आघाडीबरोबर सध्या असले तरी 2024 मध्ये त्यांना आघाडीतून उमेदवारी मिळणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे. या उलट भाजपकडे हातकणंगले मतदार संघात सध्यातरी लोकसभेच्या ताकदीचा चेहरा नाही. त्यामुळे शेट्टी यांनी भाजप नेत्यांशी पुन्हा एकदा जवळीक वाढविण्यास सुरूवात केल्याचे राजकीय पंडीतांचे मत आहे. कोल्हापुरात आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने ही जवळीक स्पष्टपणे अधोरेखित झाली. शेट्टी यांनी आक्रोश मोर्चात महाविकास आघाडीच्या स्थानिक मंत्र्यांवर तिखट शब्दात आसूड ओडले. तर काही दिवसांपूर्वी वाळवा-शिराळ्यातील भाजपच्या काही नेत्यांशी साधलेली जवळीक त्यांची आगामी काळातील वाटचाल स्पष्ट करणारी ठरली आहे. महाविकास आघाडीत सहभागी झाल्यानंतर शेट्टींच्या पदरात फारसे काही पडलेले नाही. त्यामुळे वेळीच सावध होऊन त्यांनी स्वतंत्र तयारी सुरु केली आहे.

स्वाभिमानीची चळवळ पुन्हा वेगवान होणार

लोकसभेतील पराभवाने शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हालचाली मंदावल्या होत्या. कोरोनामुळे रस्त्यावरची चळवळ थांबली होती. आंदोलने, चळवळ नसेल तर संघटना विस्कळीत होऊ शकते म्हणूनच शेट्टी यांनी पुन्हा एकदा चळवळ हाती घेतली आहे. पूरग्रस्त शेतकर्‍यांचा मोर्चा ही त्यातील झलक आहे. त्यामध्ये हातकणंगले लोकसभा मतदार संघ चळवळीच्या केंद्रस्थानी ठेवला आहे. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावरील आक्रोश मोर्चा आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघातील शिराळा आणि वाळवा विधानसभा मतदार संघातील शेतकर्‍यांचे आंदोलन भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांच्या मदतीने इस्लामपूर विभागीय कार्यालयावर काढत आपल्या राजकीय वाटचालीची चतुराई दाखविली. शेट्टी यांच्या शिवारातून पुन्हा संसदेत जाण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना भविष्यात भाजपची किती साध मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

चळवळ टिकली पाहिजे : शेट्टींची शेतकर्‍यांना साद

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजवर राजकीय सोयीच्या भूमिका घेतल्या आहेत. शेट्टी यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक अपक्ष लढवली. 2019 च्या लोकसभेसह स्थानिक स्वराज संस्थांच्या सत्ता स्थापनेत काँग्रेस आघडीला साथ दिली. याचे बक्षिस म्हणून दीड वर्षात काहीच पदरात पडले नाही. संघटनेपासून कार्यकर्ता दूर जाऊ नये, म्हणूनच शेट्टी यांनी आक्रोश मोर्चात `चळवळ टिकली पाहिजे’ अशी साद घातली आहे.

Related Stories

गावोगावी पुरग्रस्त समिती स्थापन करा, समितीत 15 जणांना स्थान द्या

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गोकुळकडून दूध संस्था कर्मचाऱ्यांना साडेनऊ लाख कोविड अनुदान

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पोहोण्यासाठी नदीत उडी मारलेला मलकापूरचा तरुण बेपत्ता

Abhijeet Shinde

जाखलेत रोटरीतर्फे विद्यार्थ्याना स्वेटर, ब्लॅकेटचे वाटप

Abhijeet Shinde

मंत्री असताना बैठका घेतल्या, मंजुरी का आणली नाही? माजी पालकमंत्र्यांना खासदार धनंजय महाडिकांचा सवाल

Rahul Gadkar

…अन् कोल्हापुरात पोलीसांनी घातली पाकिस्तानच्या ध्वजावरून गाडी

Archana Banage
error: Content is protected !!