Tarun Bharat

आगामी निवडणुकीतही कुडचडेत भाजपचीच सरशी

प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी व्यक्त केलेला विश्वास, कुडचडे मतदारसंघाचा दौरा

प्रतिनिधी /कुडचडे

आज कुडचडेत आल्यावर अत्यंत आनंद वाटला. भारतीय जनता पक्षाचे चांगले वातावरण स्थानिक आमदार असलेले मंत्री नीलेश काब्राल यांनी राखून ठेवलेले आहे. त्यामुळे आजचा दौरा चांगला झालेला आहे. सध्या आपण असोल्डा व शेल्डे पंचायतींना भेट दिली आहे व कुडचडे पालिकेतील काही भाग राहिला आहे. तो नंतर पूर्ण होणार. मागील दोन वेळा कुडचडेत भाजप निवडून आलेला आहे व यावेळीही भाजपाच निवडून येणार हे नक्की आहे, असे भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी कुडचडेतील दौऱयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी त्यांच्यासोबत वीजमंत्री काब्राल, मंडळ अध्यक्ष विश्वास सावंत, सरचिटणीस राजेंद्र वस्त, आशिष करमली उपस्थित होते. उमेदवारीसंबंधी निर्णय केंद्रीय पातळीवर होणार आहे. आम्ही फक्त उमेदवार निश्चित झाल्यानंतर घोषणा करू शकतो. मतदारसंघात एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार असले वा एकमेव उमेदवार असला, तरी त्याविषयीचा निर्णय केंद्रीय स्तरावरील निवडणूक समिती घेत असते, याकडे तानावडे यांनी लक्ष वेधले.

काही ठिकाणी स्वयंघोषित उमेदवारांकडून प्रचार सुरू केला जात आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. अद्याप कोणत्याही मतदारसंघातील उमेदवाराची निवड झालेली नाही. त्याचबरोबर काब्राल यांना उमेदवारी मिळाली आणि परत ते निवडून आले, तरी त्यांना मंत्री बनवायचे की नाही हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो, असे तानावडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

कुडचडे भाजपचे कार्य चांगले

आपण आतापर्यंत सहा मतदारसंघांचा दौरा केला असून चतुर्थीपूर्वी अजून पाच-सहा मतदारसंघांचा दौरा करणार आहे. कुडचडे भाजप मंडळाचे कार्य चांगले असून पक्ष संघटना म्हणून जे काही कार्य करायला हवे ते सर्व आपल्याला पाहायला मिळाले आहे. आपण पूर्ण समाधानी आहे, असे तानावडे यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्ष जेव्हापासून गोव्यात आहे तेव्हापासून सदैव जनतेबरोबर राहिलेला आहे. म्हणून आज गोव्यात भाजपाचे सरकार कार्यरत आहे. जनतेच्या याच विश्वास आणि सहकार्याच्या बळावर येत्या निवडणुकीतही भाजप सत्तेवर येणार. सध्या राज्यात विरोधक लोकांची दिशाभूल करण्याचा भरपूर प्रयत्न करत आहेत. त्याची सर्वांनी नोंद घ्यावी व दिशाभूल करून घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत येणार

राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकांत भाजप पराभूत होणार असल्याचा दावा केला जात होता. तरीही मेळावलीसारख्या आणि अन्य मतदान केंद्रांत सर्वाधिक मते भाजपाला मिळाली. चांदरसारख्या ठिकाणी कोळसा, डबल टेक व अन्य विषय घेऊन रान पेटविले होते. त्याही ठिकाणी भाजपची सरशी झाली. हे गोव्यातील जनतेला माहीत आहे. नगरपालिका निवडणुकीत सुद्धा असेच चित्र निर्माण केले जात होते. तरीही भाजपाला दहा पालिकांत विजय प्राप्त झाला. याचा अर्थ ग्रामीण भागांतील मतदार व शहरी भागांतील मतदार भाजपबरोबर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत पूर्ण बहुमताने भाजप सत्तेवर येणार. भारतीय जनता पक्ष हा सर्वांचा आहे व सर्वांसाठी काम करणारा आहे. यावेळीही भाजपाचेच उमेदवार निवडून येणार, असा विश्वास तानावडे यांनी व्यक्त केला.

Related Stories

प्रोबस क्लब फोंडाच्या ज्येष्ठ नागरीकांसाठीचा क्रीडा महोत्सव उत्साहात

Amit Kulkarni

म्हादई सरंक्षणासाठी आम्ही सर्व प्रयत्न करु

Patil_p

जावडेकर यांनी मेळावलीकरांना मार्गदर्शन करावे

Patil_p

पावसाची विक्रमी नोंद, 25 इंच जादा पाऊस

Patil_p

काँग्रेस संस्कृतीची घुसखोरी भाजपसाठी धोक्याची घंटा

Amit Kulkarni

कवळे येथे घरावर झाड कोसळून हानी

Omkar B