Tarun Bharat

आचऱयात कारने तिघांना उडवले

दोघे मृत्युमुखी : पालघरच्या पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश, मुलगी गंभीर : कार चालकाला अटक

प्रतिनिधी / आचरा:

आचरा-मालवण मार्गावर आचरा हायस्कूलनजीक रविवारी रात्री रस्त्याने चालत जात असलेल्या तिघांना भरधाव वेगाने जाणाऱया कारने जोरदार धडक देत उडवले. यात दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. भरधाव वेगाने कार चालवित दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कणकवली तालुक्यातील जानवली येथील कृष्णा राणे (60) याच्यावर आचरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अपघातास कारणीभूत ठरलेली मारुती सुझुकी एस प्रेससो कारही आचरा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

या अपघातात आचरा वरचीवाडी शिक्षक कॉलनी येथील स्वामी समर्थ मठाचे संस्थापक आणि ठाणे-पालघर येथील पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दीपक पुरुषोत्तम लोणे (57) व आचरा येथील अन्नछत्र मठाचे आचारी जमेंदर प्रसाद (50, मूळ रा. बिहार पहाडपूर) यांचे कणकवली येथे उपचारादरम्यान निधन झाले. परी दीपक लोणे (16) ही जखमी झाली आहे. अपघातानंतर कार चालक हा मद्यपान केलेल्या अवस्थेत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.

आचरा शिक्षक कॉलनी येथील मठात रजा कालावधीत आलेले लोणे हे रात्री सव्वादहाच्या सुमारास आचरा तिठा येथून जेवण आटोपून आपली मुलगी परी व मठाचे आचारी जमेंदर प्रसाद यांच्यासह चालत घरी जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने तिघांनाही जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती, की या धडकेत लोणे व त्यांची मुलगी दूरवर फेकली गेली. तर सोबत असलेले आचारी हे कारखाली अडकून पडले होते. अपघाताची खबर समजताच गौरव पेडणेकर, विलास आचरेकर, दीपक आचरेकर, नीलेश राणे, विक्रांत राणे, आचरेकर, साजित नायर, छोटू पांगे, धुरी आदींनी धाव घेतली व जखमींना गौरव पेडणेकर यांच्या रिक्षाने आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले.

या अपघातात पोलीस उपनिरीक्षक दीपक पुरुषोत्तम लोणे यांच्या डोक्याला व  कंबरेला गंभीर दुखापत झाली. मठाचे आचारी जमेंदर प्रसाद यांच्या डोक्याला व डाव्या पायाला, तर लोणे यांची मुलगी परी दीपक लोणे हिच्या डाव्या हाताच्या कोपराला व पोटाला दुखापत झाली. गंभीर दुखापतीमुळे तिघांनाही अधिक उपचारासाठी रात्री कणकवली येथे हलविण्यात आले. मात्र, यात दीपक लोणे व जमेंदर प्रसाद यांचा मृत्यू झाला.

भरधाव वेगाने कार चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मारुती सुझुकी एस प्रेससो (एमएच 07 एजी 4025) कार चालक कृष्णा राणे याला आचरा पोलिसांनी ताब्यात घेतले. अपघातास कारणीभूत ठरलेली कारही आचरा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दीपक लोणे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, भाऊ असा परिवार आहे. तर जमेंदर प्रसाद यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, भाऊ, बहीण असा परिवार आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेश देसाई करीत आहेत.

गरिबांचे दाते, स्वामीभक्त लोणेंच्या मृत्यूने हळहळ

स्वामी भक्त म्हणून प्रसिद्ध असलेले दीपक लोणे हे ठाणे-डहाणू, पालघर पोलीस स्टेशनला उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांनी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला 2008 मध्ये स्वामी समर्थ मठ स्थापन करून तेथे हजारो लोकांना चहा, नाश्ता व दोनवेळच्या जेवणाची अविरत मोफत सोय केली होती. 2017 पासून आचरा वरचीवाडी येथेही भगवंतगड रस्त्यालगत शिक्षक कॉलनी येथे स्वामी समर्थ मठ स्थापून अन्नदानाचे पवित्र कार्य सुरू केले होते. या मठाच्या माध्यमातून लोणे यांच्या सहकार्याने कोरोना काळात येथील स्वामी भक्तांच्या सहकार्याने हजारो लोकांना मोफत धान्य वाटप केले जात होते. मठामार्फत शितशवपेटीही उपलब्ध करून देण्यात आल्याने त्याचाही फायदा गरजूंना होत होता. मुणगे येथील कातकरी समाजालाही लोणे यांनी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली होती.  अशा समाजाभिमुख कामामुळे दीपक लोणे यांची स्वामी भक्त म्हणून आचरा परिसरात ख्याती होती.

Related Stories

जिल्हय़ात कोरोनापाठोपाठ ‘सारी’चा धुमाकूळ

Patil_p

‘कोरोना’ला नक्कीच हरवू

NIKHIL_N

लॉकडाऊन विरोधात रत्नागिरीत काँग्रेसची निदर्शने

Patil_p

तीन दिवस वादळी पावसाचा इशारा

Patil_p

..तो भागवतोय कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी, वाटसरूंची तहान

Patil_p

महिला दिनानिमित्ताने घेतलेल्या योग विंज्ञान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Anuja Kudatarkar