जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांचे आदेश : आचारसंहिता लागू झाल्यानंतर तातडीने बैठक
प्रतिनिधी / बेळगाव
आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱयांवर नियमांनुसार कारवाई केली जाईल. आचारसंहितेबाबत तक्रार नोंदवून घेण्यासाठी नियंत्रण कार्यालय सुरू करावे, असा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी अधिकाऱयांना दिला आहे. निवडणूक आयोगाने जी मार्गसूची घालून दिली आहे त्यानुसार प्रत्येक अधिकाऱयाने काम करावे, प्रचार तसेच इतर कार्यक्रमांसंदर्भात परवानगी देताना नियम पाळावे, अशी सुचनादेखील जिल्हाधिकाऱयांनी यावेळी दिली आहे.
लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱयांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये जिल्हाधिकाऱयांनी ही सूचना केली आहे. मतदार याद्यांमध्येही सुधारणा करावी. तसेच या याद्या पूर्ण करुन उपलब्ध कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
80 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींना तसेच दिव्यांग व्यक्तींना पोस्टाव्दारे मतपत्रिका उपलब्ध करुन द्याव्यात. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार हे काम करावेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मद्य विक्री तसेच तस्करीवर अधिक लक्ष द्या
निवडणूक काळात परराज्यातून बेळगाव जिल्हय़ामध्ये मद्यपुरवठा करण्याची शक्मयता आहे. त्यामुळे मद्य विक्री तसेच तस्करी करणाऱयांवर अधिक लक्ष द्या, असेही जिल्हाधिकारी हिरेमठ सांगितले आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी याबाबत कोणालाही अधिक माहिती असल्यास पोलीस विभागाशी त्वरित संपर्क साधावा असे सांगितले.
मतमोजणीचेही नियोजन करा
अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी आतापासूनच मतदानाबरोबरच मतमोजणीचेही नियोजन आधीपासूनच करणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टिने अधिकाऱयांनी आतापासूनच आराखडा तयार करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. मतदान केंद्र तसेच मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रुम याबाबत रुपरेषा ठरविणे महत्त्वाचे असून अधिकाऱयांनी त्याची तयारी करावी, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विविध ठिकाणी चेकपोस्ट
परराज्यातून येणाऱया वाहनांवर नजर ठेवण्यासाठी कोगनोळी, कणकुंबी यासह शिनोळी व इतर रस्त्यांवर चेकपोस्ट करण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली जाणार आहे. दारु किंवा बेहिशेबी रक्कम याची कसून तपासणी केली जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासह पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, महापालिका आयुक्त के. एच. जगदीश यांच्यासह इतर अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.