Tarun Bharat

आजपासून आठवडाभर ‘कडक’ लॉकडाऊन

प्रतिनिधी/ रत्नागिरी

कोरोनाच्या वाढत्या फैलावाला पायबंद घालण्यासाठी जिह्यात आजपासून आठवडाभर टाळेबंदीचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जारी केले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अर्थात ‘बेक द चेन’च्या हेतूने 1 ते 8 जुलै या दरम्यान या लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. या काळात प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असून नागरिकांना अत्यावश्यक कामाव्यतिरीक्त घराबाहेर पडण्यात बंदी घालण्यात आली आहे. शेती कामे, घरपोच मद्य विक्री, दूध, भाजी, फळे, अन्नधान्य यांची दुकाने मात्र सुरु राहतील. सर्व औद्योगिक व व्यवसाय यांच्या आस्थापना सुरु राहतील असेही त्यांनी आपल्या आदेशात त्यांनी म्हटले आहे.

                  नियंत्रित व प्रतिबंधित बाबी

लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यक्तींना घरातून बाहेर पडणेस प्रतिबंध करण्यात आला आहे. रत्नागिरी जिह्याच्या सर्व सिमा बंद राहणार असून अत्यावश्यक सेवा वगळून सर्व सेवा बंद राहतील. सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक, दुचाकी वाहने, तीन चाकी वाहने, रिक्षा, जीप, टॅक्सी, कार, बस बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकाने, आस्थापना वगळून अन्य सर्व दुकाने, आस्थापना बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमा होण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी जाताना सामाजिक अंतर किमान 6 फूट ठेवणे आवश्यक आहे. दुकानामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त ग्राहक उपस्थित राहणार नाहीत.

  सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई असून असे कृत्य करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, तंबाखू इत्यादी सेवनास बंदी घालण्यात आली आहे. कामाच्या ठिकाणी थर्मल स्पॅनर, हात धुण्याचा साबण, सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक राहणार आहे.

लॉकडाऊन कालावधीत सुरु राहणाऱया सेवा

  अत्यावश्यक सेवा व आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी संबंधित कार्यालये/ आस्थापस्था 100 टक्के कर्मचाऱयांनिशी सुरु राहणार आहेत. अन्य शासकीय व निमशासकीय कार्यालये 10 टक्के अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीसह सुरु राहतील. पिण्याचा पाणी पुरवठा, सांडपाणी निचरा व्यवस्थापन, स्वच्छता इत्यादी व्यवस्थापन करणाऱया आस्थापना सुरु राहणार आहेत. सर्व बँका, पोस्टल सेवा, कुरिअर सेवा, दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱया आस्थापना, अत्यावश्यक सेवा देणाऱया आय. टी. आस्थापना, ऑनलाईन शिक्षण, ई-कॉमर्स सर्व्हिस उदा. फ्लिपकार्ट, ऍमॅझॉन इत्यादी पूर्ण क्षमतेने सुरु राहणार आहेत. अन्नधान्य, फळे, भाजीपाला, दूध व दुधाचे पदार्थ, ब्रेड, किराणा माल, सार्वजनिक वितरण व्यवस्थादेखील सुरु राहणार आहेत. मांस, मासे, अंडी यांची विक्री दुकाने फक्त बुधवार, शुक्रवार, रविवार या दिवशी सुरु राहतील. रूग्णालये व सर्व वैद्यकीय आस्थापना, औषधालये तसेच पशुवैद्यकीय दवाखाने, देखभाल केंद्रे व पाळीव प्राण्यांची पशुवैद्यकीय आस्थापना व दुकाने सुरु राहणार आहेत.

  विशेष म्हणजे जिह्यातील सर्व प्रकारचे उद्योग, व्यवसाय व त्यांच्या आस्थापना. ऑईल, गॅस, पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने पुरविणाऱया आस्थापना, त्यांची गोदामे. प्रसारमाध्यमे व इलेक्ट्रॉनिक मिडीया यांची कामे संपूर्ण क्षमतेने सुरु राहणार आहेत. अंत्यविधी, अंत्ययात्रा 20 व्यक्तीसाठी मर्यादित ठेवण्यात आल्या आहेत.

  शासकीय कामे, शेती विषयक कामे, कृषी माल, प्रक्रिया व साठवणूक, सर्व बंदरे व त्यासंबधी निगडीत बाबी सुरु राहतील. तसेच मद्य विक्री ऑनलाईन मागणी स्वीकारून घरपोच सेवा सुरु राहणार आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानीची पुनर्बांधणी, पंचनामे, मदत वाटप संबंधीच्या आस्थापना सुरु राहतील. वरील सर्व बाबी, सेवांसाठी आवश्यक प्रवास व वाहतूक, संबंधितांकडील ओळखपत्र व त्यासंबंधीचा वाहनावरील स्वयंघोषित फलक या आधारे करता येईल.

9 ते 5 कालावधीत अत्यावश्य सेवा

अत्यावश्यक सेवा सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत सुरु राहतील. सायंकाळी 5 ते सकाळी 9 या कालावधीत केवळ वैद्यकीय तपासणीचे कारण वगळता अन्य कोणत्याही कारणास्तव घरा बाहेर पडता येणार नाही. याशिवाय घराबाहेर पडणे आवश्यक असल्यास संबंधित तहसीलदारांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.  कोरोना बाधित क्षेत्रात ही मुभा लागू नसेल असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

कडक अंमलबजावणीकडे लक्ष

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ ची अंमलबजावणी करत 1 जुलैपासून आठवडाभर कडक लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत 28 जून रोजी केली होती. मात्र   कडक अंमलबजावणी म्हणजे नेमके काय याबाबत 30 जूनच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे नेमके काय चालू राहणार व काय बंद राहणार याबाबत उलट-सुलट चर्चा होत्या. नागरिकांकडून होणाऱया चौकशीमुळे अस्वस्थ झालेले काही अधिकारी वृत्तपत्र कार्यालयामध्ये याबाबत काही माहिती आहे का याबाबत विचारणा करत होते.  सायंकाळी 6 वाजता जारी झालेल्या अधिकृत आदेशातील चालू-बंदची यादी पाहता याआधीच्या लॉकडाऊनप्रमाणेच बहुतांश सेवा सुरूच राहणार असल्याचे, उलट सुरूच्या यादीत काहीची भरच पडल्याचे दिसत आहे. हॉटेलच्या पार्सल सेवेबाबतचा संभ्रम कायम होता. त्यामुळे आता लॉकडाऊनच्या ‘कडक’ अंमललबजावणीकडे लक्ष लागले आहे.

Related Stories

‘पैशांचा पाऊस’ मेहनतीच्या जोरावर

Patil_p

“हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय,” मुख्यमंत्री ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला

Archana Banage

लोटेतील प्रदुषणामुळे दर्यासारंग मच्छीमार भोई समाज हैराण

Patil_p

बावशी येथे राहते घर कोसळले

Anuja Kudatarkar

सावंतवाडीत होणार रणजी क्रिकेट दर्जाची खेळपट्टी

Anuja Kudatarkar

दापोलीतील तीन गावांतील ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

Patil_p