राज्य सरकारचा निर्णय : संप सुरूच, परिवहन कर्मचारी-सरकार तिढा कायम
प्रतिनिधी/ बेंगळूर
परिवहन कर्मचारी आणि राज्य सरकार यांच्यातील तिढय़ामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. मागील दोन दिवसांपासून राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱयांनी सरकारी कर्मचारीपदाचा दर्जासह अनेक मागण्या करून संप पुकारला आहे. त्यामुळे शनिवारी देखील बेंगळूरसह राज्यातील सर्व परिवहन निगमच्या बसेस धावल्या नाहीत. पर्यायी व्यवस्था म्हणून रविवारपासून खासगी बसेसचा सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. संप मागे घेतल्यानंतरच कर्मचाऱयांशी चर्चा करण्यात येईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. शिवाय आंदोलन मागे न घेतल्यास ‘एस्मा’ जारी करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, परिस्थितीसंबंधी रात्री मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक घेतली.
वेतनवाढ, सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा द्यावा यासह अनेक मागण्यांसाठी गुरुवारपासून परिवहन कर्मचाऱयांनी आंदोलन सुरू केले आहे. सरकारकडून मागण्यांची दखल घेण्यात येत नसल्याने परिवहन कर्मचाऱयांनी शुक्रवारपासून संप पुकारला आहे. शुक्रवारी परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या उपस्थितीत परिवहन कर्मचारी संघटनेशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने शनिवारी देखील बसेस बंद ठेवून आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. दरम्यान, शनिवारी परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी यांनी परिवहन कर्मचाऱयांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. संप मागे घेतल्यानंतरच चर्चा करण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे परिवहन कर्मचारी आणि सरकारमधील तिढय़ामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
संप मागे घेतल्यानंतरच चर्चेसाठी या!
परिवहन कर्मचाऱयांनी शनिवारी मध्यरात्रीपर्यंत आंदोलनातून माघार न घेतल्यास प्रवाशांच्या सोयीसाठी खासगी बसेसची व्यवस्था करण्यात येईल, परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी यांनी असे सांगितले आहे. सरकारी बसेसप्रमाणेच खासगी बसेसमध्ये तिकीटदर आकारण्यात येईल. आपण अलिकडेच खात्यातील वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा केली आहे. कर्मचाऱयांच्या मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल. मात्र, संप मागे घेऊन चर्चेसाठी या, असे आवाहन त्यांनी केले.
दगडफेक करणारे 10 कर्मचारी अटकेत
संप पुकारलेल्या परिवहन कर्मचाऱयांकडून दगडफेक करून बसेसच्या काचा फोडण्याचे सत्र सुरूच आहे. आतापर्यंत 37 बसेसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 10 परिवहन कर्मचाऱयांना अटक केल्याचे समजते.
शनिवारी धावल्या केवळ 196 बसेस
राज्य परिवहन कर्मचारी संपावर गेल्यामुळे राज्यातील सार्वजनिक प्रवासी सेवा ठप्प झाली आहे. दरम्यान, शनिवारी बेंगळूर शहर परिवहन मंडळाच्या 126 तर राज्य परिवहन मंडळाच्या 170 बसेस धावल्या. केएसआरटीसीने ही माहिती दिली आहे.
गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
परिवहन कर्मचाऱयांचा संप सुरूच असल्याने शनिवारी गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी कायदा-सुव्यवस्थेसंबंधी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान ‘कावेरी’ येथे बोम्माई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. संपामध्ये बाहेरील काही व्यक्ती सहभागी होत असून त्यांच्यामुळे राज्य सरकारची बदनामी करण्याचे कारस्थान होत आहे. त्यामुळे पोलिसांना अशा व्यक्तींवर लक्ष ठेवण्याची सूचना देण्यात आल्याचे त्यांनी येडियुराप्पांना सांगितले.
एस्मा जारी करण्याचा सरकारचा विचार
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱयांनी आंदोलन आणखी तीव्र केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अत्यावश्यक सेवा नियंत्रण कायदा (एस्मा) जारी करण्याचा विचार राज्य सरकारने चालविला आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत परिवहन कर्मचाऱयांना सरकारी कर्मचारीपदाचा दर्जा देणे अशक्य असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे कर्मचाऱयांनी आंदोलन मागे न घेतल्यास सोमवारपासून एस्मा कायदा जारी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजते.