Tarun Bharat

आजपासून घुमणार शिमग्याचा ढोल..!

जिल्ह्य़ातील उत्सवाला कोरोनाचे बंधन

प्रतिनिधी/ रत्नागिरी

मानकरी, गावकरी आणि चाकरमान्यांच्या साथीने कोकणच्या संस्कृतीची अनुभूती देणाऱया शिमगोत्सवाचा जल्लोष यावर्षी कोरोनाच्या नियमांच्या चौकटीत साजरा होणार आहे. आज फाकपंचमीपासून जिल्हाभरात शिमगोत्सवाची धुम गावोगावी होळय़ांच्या पहिल्या होमाने सुरु होणार आहे. उत्सवावर असलेले नियमांचे बंधन पाळून पहिल्या होळीचे जिल्हाभर वाजत-गाजत आगमन सुरु झाले आहे.

  कोकण आणि शिमगा हे एक अतुट नाते आहे. येथील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब असला तरी होळी सणासाठी त्याचे पाय गावाकडे वळतातच. कोकणात विशेषतः रत्नागिरी जिह्यात शिमगा सण 5 ते 15 दिवस असतो. या शिमगोत्सवाला आज गुरूवारी फाल्गुन शुद्ध पंचमीला पहिल्या होळीने प्रारंभ होणार आहे. ग्रामदेवतांच्या पालख्यांची  लगबग, शंकासूरचा मार, गोमूचा नाच, शिमग्याची सोंगं जणू काही आनंदाची पर्वणीच! प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी/त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये मुख्य म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे अर्थात देवीच्या उत्सवमूर्ती लावण्यात येतात. त्यानंतर पालखी देवळातून सहाणेवर आणली जाते. होळीपौर्णिमेला शिमग्यांची सांगता होते.

रत्नागिरी जिह्यात शिमगोत्सवाची रंगत आठवडा ते काही ठिकाणी अगदी महिनाभर राहणार आहे. काही ठिकाणी आदल्या दिवशी बुधवारी तर बहुतांश ठिकाणी गुरूवारी 18 मार्च रोजी फाक पंचमीला वाडय़ा-वस्त्यांवर होळय़ांचे वाजतगाजत आगमन होणार आहे. त्या ठिकाणी विधीवत पूजाअर्चा करून होळी उभ्या होणार आहेत. ढोल-ताशांचा गजर आणि फाकांच्या आरोळय़ानी शिमगोत्सवाची रंगत वाढणार आहे. गावा-गावात ग्रामदेवतांच्या पालख्यांनाही रुपे लावण्याच्या कार्यक्रमांची लगबग आहे.

जिल्हय़ात गतवर्षी 3 हजारांहून अधिक खासगी होळय़ा तर 1 हजार 243 सार्वजनिक होळय़ा उभ्या राहिल्या होत्या. 1 हजार 95 ग्रामदेवतांच्या पालख्यांही रुपे लावून सजवल्यानंतर भक्तांच्या भेटींसाठी सज्ज झाल्या होत्या. पण गतवर्षी ऐन शिमगोत्सवाच्या तोंडावर कोरोनाचा प्रभाव सुरू झाला होता. शिमगोत्सव रंगात असतानाच कोरोनाच्या गंभीर संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे पालख्यांच्या पारंपरिक भेटींवरही बंधने आली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रभाव अधिकच वाढल्याने पालख्या घरोघरी जाण्यातही अडचणी निर्माण झाल्या होत्या.

आज कोरोना वर्ष होत आले तरी कोरोनाच्या संकटातून सुटका झालेली नाही. मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाचा प्रभाव कमी होईल, असे वाटत असतानाच पुन्हा हे संकट बळावू लागले आहे. त्यामुळे यावेळचा शिमगोत्सव प्रारंभापासूनच नियमांच्या बंधनात अडकला आहे. कोरोनाचा प्रभाव पाहता शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियमावली घालून देण्यात आली आहे. त्यामुळे शिमग्याच्या उत्सवी स्वरूपावर मर्यादा आल्या आहेत. निवडक गावकऱयांच्या उपस्थितीत, साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे निर्देश प्रत्येक देवस्थान कमिटय़ांना, ग्रामपंचायतींना पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे शासनाच्या नियमावलीच्या चौकटीतच हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय गावोगाच्या देवस्थान कमिटय़ांनी घेतला आहे. 

Related Stories

मास्कच्या कारवाईने संगमेश्वर बाजारपेठेत धावपळ

Patil_p

जिल्ह्यात आणखी एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त उद्या सावंतवाडीत पत्रकार व कुटुंबीयांचे नेत्र तपासणी शिबिर !

Anuja Kudatarkar

हरहर विठ्ठल, घरघर विठ्ठल..

Patil_p

येमेनच्या कैदेतून 20 जहाज कर्मचाऱयांची सुटका

Omkar B

”भाजपची रेल्वे इंजिनविना; गोव्याची प्रगती करण्यात अपयशी”

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!