Tarun Bharat

आजपासून रोज कामावर या

Advertisements

सरकारी-निमसरकारी कर्मचाऱयांना आदेश : 27 मे रोजीचे परिपत्रक रद्द : दिवसाआड कामावर येण्याची पद्धत बंद : कार्यालयांमध्ये महामारी एसओपी पाळा

प्रतिनिधी / पणजी

गोवा सरकारने आपल्या धोरणात बदल करून 27 मे रोजी काढलेले परिपत्रक रद्द केले आहे. नव्याने जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे दिवसाआड कामावर येण्याची पद्धत रद्द करून सर्व सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱयांना आज मंगळवार 1 जूनपासून दररोज सेवेवर हजर होण्याचा आदेश दिला आहे.

 राज्यात वाढत्या कोविडच्या परिस्थितीमुळे राज्य सरकारने राज्यात संचारबंदी लागू करतानाच अत्यावश्यक सेवा क्षेत्रातील कर्मचारी वर्ग वगळता इतर सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयातील कर्मचारीवर्गाला दिवसाआड एकदा सेवेत येण्याची मुभा दिली होती. राज्यात कोविड बाधितांची संख्या वाढतच राहिल्याने सुरवातीला 15 दिवसांसाठी ही व्यवस्था केली होती.

 27 मे रोजी आणखी एक परिपत्रक सर्वसामान्य प्रशासन अधिकाऱयांनी जरी करून या नियमात वाढ करून 15 जूनपर्यंत हा नियम लागू करण्याची तरतुद त्यात केली होती. मात्र काल सोमवारी अचानक सर्वसामान्य प्रशासनाने आणखी एक परिपत्रक जारी करून 27 मे चे परिपत्रक रद्दबादल ठरविले. नव्याने सोमवारी जारी केलेल्या परिपत्रकानुसार सर्व खात्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱयांनी पूर्वीप्रमाणेच दि. 1 जून पासून नियमितपणे कामावर यावे, असे कळविले आहे.

 अधिकारी, कर्मचाऱयांची उडाली तारांबळ

 या परिपत्रकामुळे काल अनेक कर्मचाऱयांची तारांबळ उडाली. सर्व खातेप्रमुखांना आता विविध वॉट्सऍप गटाद्वारे हे परिपत्रक जारी करून 1 जून पासून नियमितपणे सेवेवर हजर रहाण्याची सूचना करणे भाग पडले.

……………….बॉक्स………………………

45 वर्षावरील सर्वांनी कोविड लस घ्यावी

सर्वसामान्य प्रशासनाचे अवर सचिव श्रीपाद आर्लेकर यांनी 31 मे रोजी जारी केलेल्या सदर परिपत्रात 45 वर्षांवरील सर्व सरकारी व निमसरकारी कर्मचाऱयांनी कोविडची लस घ्यावी असे कळविले आहे.

……………………………………………………………………………………………………………….

कार्यालयांमध्ये महामारी एसओपी पाळा

कामावर हजर रहाणाऱया सर्वच कर्मचाऱयांना तसेच विभाग प्रमुख आणि खातेप्रमुखांनी काही तत्वे पाळावीत असे नमूद केले आहे. कार्यालयाच्या पायऱयांवर एकत्रित गर्दी केली जाऊ नये. लिफ्ट वापरताना त्यात गर्दी केली जाऊ नये, मास्क वापरणे सक्तीचे आहे. शिवाय काम करीत असताना योग्य पद्धतीने सामाजिक सुरक्षित अंतर राखणे असेही सदर परिपत्रकात नमूद केले आहे. कार्यालयातील कँटिनमध्येही गर्दी केली जाऊ नये. गरज पडेल तेव्हाच बैठका घ्या. जास्तीत जास्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क व संवाद साधावा. आाणि बायोमेट्रीक यंत्रणेचा वापर करू नका, अशा सूचनाही केल्या आहेत.

 आजपासून कार्यालये पुन्हा गजबजणार

नव्याने काढलेल्या या आदेशामुळे आजपासून राज्यातील पुन्हा एकदा सर्व सरकारी कार्यालये गजबजू लागतील. गेले 3 आठवडे विविध सरकारी कार्यालयांना जी मरगळ आली होती ती आजपासून दूर होईल, असा अंदाज आहे.

Related Stories

स्वच्छता अभियानावर वास्कोत चर्चा

Patil_p

तीन सिलिंडर मोफत, ‘दयानंद’ रु. तीन हजार

Amit Kulkarni

पणजीत उद्यापासून पुरुमेताचे फेस्त

Omkar B

आम आदमी पक्षात राजीनामा सत्र

Patil_p

संकेत मुळे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना स्मार्टफोन भेट

Amit Kulkarni

दिल्ली – गोवा रेल्वे कोरोनावाहू ठरणार नाही नाही?

Omkar B
error: Content is protected !!