Tarun Bharat

आजही भारत ‘विश्वगुरु’

भारताचा प्राचीन इतिहास पाहता आपणास कळते की भारत एकेकाळी ‘विश्वगुरु’ म्हणून विख्यात होता. सर्व जगातून ज्ञान प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी भारतात शिक्षण घेण्यासाठी येत होते. नालंदा, तक्षशीलासारखी जगद्विख्यात विद्यापीठे भारतात 12 व्या शतकापर्यंत कार्यरत होती. इतिहासात असेही वर्णन येते की नालंदा येथील विद्यापीठातील पुस्तक संग्रहालय 9 मजले उंच होते व त्यामध्ये वेद, उपनिषद, महाभारत, रामायण इत्यादींवर आधारित जवळजवळ 1 कोटी ग्रंथ उपलब्ध होते. असे हे समृद्ध गंथालय धर्मांध बख्तीयार खिलजीने 12 व्या शतकात आग लावून नष्ट केले. ग्रंथ तीन महिन्यांपर्यंत जळत होते. त्याचबरोबर तेथील हजारो जणांना जिवंत जाळण्यात आले. त्यानंतर ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे येथील प्रचलित गुरुकुल शिक्षण नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. भारतातील इंग्रजी शिक्षणाचा जनक म्हणून प्रसिद्ध असलेला लॉर्ड मॅकॉले 12 ऑक्टोबर 1836 ला आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हणतो, ‘आमच्या इंग्रजी शाळा (भारतामध्ये) प्रभावीरीत्या फोफावत आहेत. आम्हाला सर्वांना शिक्षण देणे कठीण जात आहे. येथील हिंदूंवर इंग्रजी शिक्षणाचा अफाट प्रभाव पडतो आहे. याचा परिणाम असा होतो आहे की एकही हिंदू जो इंग्रजी शिक्षण घेतो तो आपल्या हिंदू धर्माशी एकनि÷ व प्रामाणिक राहू शकणार नाही. माझा असा ठाम विश्वास आहे की जर आमची शिक्षण पद्धती काटेकोरपणे प्रत्यक्षात आणली तर पुढील 30 वर्षात एकही सन्माननीय हिंदू मूर्तीपूजक भारतात शिल्लक राहणार नाही आणि हे सर्व हिंदूंचे धर्मांतर न करता होईल, याचा मला हृदयापासून आनंद होतो आहे.’

आणखी एका ठिकाणी हाच मॅकॉले म्हणतो, ‘सद्य परिस्थितीमध्ये आपण पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न केला पाहिजे की भारतीय हे फक्त रंगाने व रक्ताने भारतीय राहतील. पण चवीने (अन्न) विचाराने (मत) नैतिकता (गुण) व बुद्धीने इंग्रजी बनतील.’

भारत स्वतंत्र होऊन आता 70 वर्षे झाली तरी आपण अभिमानाने ब्रिटिशांच्या या कारस्थानाला बळी पडत आहोत. याचबरोबर ब्रिटिशांनी मॅक्स मुलर या संस्कृत विद्वानाला पद्धतशीरपणे हिंदूंच्या धर्मग्रंथांचे काल्पनिक कथा म्हणून विकृतीकरण करावयास लावले. या विकृतीकरणाला बळी पडून हिंदू धर्माची निंदानालस्ती करण्याची व स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेण्यासाठी भारतात समाजसुधारकांमध्ये स्पर्धा लागली. अशी अनेक आक्रमणे गेल्या 2000 वर्षात भारतीय संस्कृतीवर झाली. पण वेद, उपनिषद, रामायण, महाभारत यावर आधारित असणारी ही संस्कृती आजही जगाला मार्गदर्शन करण्यासाठी जिवंत आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णापासून चालत आलेल्या गुरुशिष्य परंपरेतून हे सनातन ज्ञान अनेक आक्रमणांचा सामना करत आजही सुदैवाने उपलब्ध आहे.

सनातन धर्म

वास्तविक ‘हिंदू’ ही आपली खरी ओळख नाही. वेद, शास्त्र, पुराण, महाभारत, रामायण यासारख्या ऐतिहासिक ग्रंथांमध्ये हिंदू असा उल्लेख कुठेही आढळत नाही. पर्सियन लोकांनी सांकेतिकदृष्टय़ा सिंधू नदीपलीकडे असलेल्या संस्कृतीला हिंदू म्हणण्यास सुरुवात केली. आपली खरी ओळख आहे, ‘सनातन’ धर्म. अर्थात आपण सर्व जण ‘आत्मा’ आहोत आणि आपला सनातन संबंध भगवान श्रीकृष्णाशी आहे. इथे धर्म याचा अर्थ आपला मूळ स्वभाव असा आहे. त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीला ‘वैदिक’ संस्कृती असेही म्हणतात. कारण वेदावर म्हणजे आपण ‘आत्मा’ आहोत या ज्ञानावर आधारित असलेली संस्कृती.श्रीमद् भगवद्गीता आणि श्रीमद् भागवत यांच्या मार्गदर्शनानुसार चालणारा ‘भागवत धर्म’ असेही या संस्कृतीला म्हटले जाते. दुर्दैवाने या एके काळी सर्व जगभर पसरलेल्या संस्कृतीला आज भारतीय साशंकतेने पाहतात आणि जे कोणी थोडेफार ओळखतात ते एकतर अज्ञानाने किंवा अंधश्रद्धेने स्वत:च्या मनाप्रमाणे पालन करतात.

पण गेल्या 50 वर्षांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे. स्वामी प्रभूपाद यांच्या अथक प्रयत्नाने सर्व जगभर पुन्हा गीता भागवत या ग्रंथावर आधारित ‘वेदिक संस्कृती’चा मूळ स्वरुपात प्रचार आणि प्रसार होत आहे. श्रील प्रभूपाद यांना इंग्लंडमध्ये एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, ‘स्वामीजी, तुम्ही इंग्लंडमध्ये कशासाठी आलात?’ श्रील प्रभूपादांनी निर्भिडपणे आणि आत्मविश्वासाने उत्तर दिले, ‘तुम्ही ब्रिटिशांनी भारताला लुटले, पण भारताचे खरे वैभव तुम्ही विसरलात ते देण्यासाठी मी आलो आहे.’ पत्रकाराने विचारले, ‘अशी कोणती मूल्यवान वस्तू ब्रिटिश विसरले?’

श्रील प्रभूपाद आपल्याजवळील ‘भगवद्गीता’ दाखवत म्हणाले, ‘हा भारताचा खरा मौल्यवान खजिना आहे.’ भगवद् गीता ही फक्त हिंदूंसाठी नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या उद्धाराकरिता आहे. याच कारणासाठी संपूर्ण जगभरात अनेक देशांमध्ये, सर्व जातीधर्माचे, सर्व क्षेत्रातले लोक भगवद्गीतेचे यथारूप पालन आपल्या जीवनात करीत आहेत. आज अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, न्यूझीलंड, जपान, चीन, बांगलादेश, पाकिस्तान, अरब राष्ट्रे इत्यादी सर्व ठिकाणी भारताबद्दल एक विशेष आकर्षण निर्माण होत आहे. सर्व जगामध्ये लोक भोगवाद, चंगळवाद या पाश्चात्य संस्कृतीला कंटाळून ‘भगवद् गीता’वर आधारित शुद्ध जीवन जगण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करीत आहेत. श्रील प्रभूपाद सर्व भारतीयांना आवाहन करताना म्हणतात, की ‘मी वृद्धावस्थेमध्ये संपूर्ण जगभर प्रवास करून गीता भागवतचा प्रचार केला. प्रत्येक भारतीयाने जर गीता भागवत या ग्रंथाचा वैज्ञानिकदृष्टय़ा अभ्यास करून स्वत:चे जीवन परिपूर्ण केले तर संपूर्ण जग या दिव्य ज्ञानाचा स्वीकार करायला तयार आहे.’ आज जगामध्ये उद्भवलेल्या अगदी वैयक्तिक समस्येपासून जागतिक समस्या सोडविण्याचा परिपूर्ण मार्ग भगवद्गीतेमध्ये आहे. विज्ञानालाही कधीही न कळणारे असे दिव्य ज्ञान या ग्रंथामध्ये आहे. म्हणून तर सर्व जग याचा अभ्यास करण्यासाठी भारताकडे आकर्षित होत आहे. श्रील प्रभूपाद यांच्या अथक प्रयत्नाने व त्यागाने संपूर्ण जगामध्ये ‘वैदिक संस्कृती’चा प्रचार होऊन आज भारत ‘आध्यात्मिक विश्वगुरु’ बनला आहे. आता प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे की गीता-भागवत समजून घेऊन त्याचे जीवनात प्रत्यक्ष पालन करून जगाला मार्गदर्शन करावे. आज जगाला याची खरी गरज आहे.

वृंदावनदास

Related Stories

शुभ्र काही भिवविणे

Patil_p

राज्यात पुन्हा ईडीचा खेळ, विरोधकांचा मेळ!

Patil_p

कृपेनें रक्षावी शोणितपुरी

Patil_p

हे राम!

Patil_p

कोकणच्या गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट

Patil_p

परतीच्या पावसाचे संकट

Amit Kulkarni