Tarun Bharat

आज बांबोळी स्टेडियमवर होणार ओडिशा – हैदराबाद यांच्यात लढत

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत आज बांबोळीतील जीएमसी ऍथलेटीक स्टेडियमवर ओडिशा एफसी आणि हैदराबाद एफसी यांच्यात लढत होणार आहे. आयएसएलचा मागील सहावा मोसम दोन्ही संघांसाठी एकदम खराब गेला होता. हैदराबादचा गेल्या मोसमात 12 सामन्यांत पराभूत झाला होता आणि स्वत:वर 39 गोल घेतले होते. ओडिशाचीही कामगिरी तेवढी खास नव्हती आणि त्यानी 31 गोल घेतले होते. 

आता सातव्या मोसमात दोन्ही संघात पुष्कळ बदल झालेले आहेत. गतवर्षीय स्पर्धा हा आमच्यासाठी इतिहास आहे, असे ओडिशा एफसीचे प्रशिक्षक स्टुअर्ट बक्स्टर म्हणाले. आता दोन्ही बाजूने मोठे बदल झाले आहेत. हैदराबादप्रमाणे आमच्याकडेही नवीन आणि अनुभवी खेळाडू असल्याचे बक्स्टर म्हणाले. ओडिशा एफसीने यंदा स्ट्रायकरच्या स्थानावर ब्राझिलच्या डायगो मॉरिस आणि गेल्या वर्षी हैदराबादसाठी खेळलेल्या मार्सेलिनोला यंदा आपल्या संघात घेतले आहे. या दोघातही सामना फिरविण्याची ताकद आहे. फुटबॉल हा खेळ सांघिक आहे व त्यामुळे कोणत्याही एक दोन खेळाडूवर आपण विसंबून राहत नाही, असे इंग्लंडचे प्रशिक्षक बक्स्टर म्हणाले.

हैदराबाद एफसीला गेल्या आयएसएलमध्ये खराब कामगिरीमुळे शेवटचे स्थान मिळाले होते. पहिल्या पाच सामन्यांत हैदराबादला चार सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला होता. ओडिशा विरूद्धचा पहिला सामना आमच्यासाठी महत्वाचा असून विजयाने यंदाच्या मोहिमेची सुरूवात करायची आहे, असे हैदराबादचे यंदाचे नवीन प्रशिक्षक मान्यूयल मार्कीझ म्हणाले.

हैदराबादच्या संघात यंदा अनुभवी आणि युवा फुटबॉलपटूंचा भरणा आहे. रोहित दाणू, गोव्याचा रिस्टन कुलासो आणि आकाश मिश्रा हे प्रतिभावंत युवा फुटबॉलपटूही संघात आहेत. ओडिशाचे बचावपटू जॅकोब ट्राट व जॅरी मावीहमिंगथांगा तर हैदराबादचा फ्रान्सिस्को सँडाझा हे आजच्या सामन्यात खेळणार नाहीत.

error: Content is protected !!