Tarun Bharat

आज रात्रीपासून लॉकडाऊन अधिक कडक

पालकमंत्र्यांची माहिती : केवळ पार्सल सेवा : सर्वपक्षीय आमदार, खासदारांची सहमती : नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई 

प्रतिनिधी / ओरोस:

जिल्हय़ातील कोरोनाचा उंचावणारा आलेख खाली आणण्यासाठी 10 ते 15 मे दरम्यान जिल्हय़ात कडक लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी ऑनलाईन पत्रकार परिषदेत जाहीर केले. जिल्हय़ातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

जिल्हय़ातील खासदार, आमदार, व्यापारी संघ यांच्याशी चर्चा करण्यात आली. जिल्हावासीयांच्या हितासाठी कडक लॉकडाऊनची आवश्यकता असल्याचे सर्वच लोकप्रतिनिधींनी मान्य केले. त्यामुळे रविवारी रात्री 12 वाजल्यापासून 15 मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होणार आहे, असे पालकमंत्री म्हणाले.

आंबा वाहतुकीस परवानगी, पण..

सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळविपेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यासह), पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळय़ाच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱया साहित्यांच्या उत्पादनाशी निगडित दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी सात ते अकरा या कालावधीतच सुरू ठेवण्यास परवानगी राहील. आंबा वाहतुकीस परवानगी राहील. मात्र वाहतुकीदरम्यान कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. कृषी अवजारे व शेती उत्पादनाशी संबंधित दुकानांची सेवा सकाळी सात ते सायंकाळी पाच या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी राहील. हॉटेल, रेस्टॉरंट यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी अकरा ते दुपारी दोन व सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहील. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील रास्त भाव दुकाने सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी राहील. जिल्हय़ातील शिवभोजन केंद्र सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल. लसीकरणाकरिता प्रवास करणाऱया व्यक्तींना व ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत काम करणाऱयांना यामधून सूट देण्यात आली आहे.

जनतेने सहकार्य करावे!

जिल्हय़ात कोरोना आटोक्यात आहे. मात्र तो थांबावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान कणकवली व अन्य काही तालुक्यात जनता कपर्यू लागू करण्यात आला आहे. त्यांना रविवारी कोविड नियमांचे पालन करून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सोमवारपासूनच्या कडक लॉकडाऊनमध्ये सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

सत्तर हजार नागरिकांची तपासणी

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अंतर्गत आतापर्यंत घरोघरी जाऊन 70 हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामधून 36 नागरिक पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. हे नागरिक एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी गेल्यास कोरोनाचा अधिक फैलाव होऊ शकतो. त्यामुळे सहा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये आदेश मोडणाऱया संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश यंत्रणेला दिले असल्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांचा ‘प्रंट लाईन वर्कर’ म्हणून समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. यावेळी खासदार विनायक राऊतही उपस्थित होते. पत्रकार पॉझिटिव्ह आल्यास पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळे दिली.

ऑनलाईन नोंदणीसाठी स्वतंत्र ऍपची मागणी करणार

मराठा आरक्षणाबाबतची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ते याबाबत योग्य तो निर्णय घेऊन मराठा समाज बांधवांना निश्चितच न्याय देतील. मात्र आरक्षण मागणीसाठी आंदोलन करू नये, असे त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. महाराष्ट्राबाहेरील नागरिकही सिंधुदुर्गात लसीकरणाचा लाभ घेत आहेत. याला आळा बसावा, यासाठी ऑनलाईन नोंदणीबाबतचे महाराष्ट्रासाठी एक स्वतंत्र ऍप निर्माण करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही ते म्हणाले.

Related Stories

रत्नागिरी : कोविड सेंटरसाठी खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांनी वापरला विशेषाधिकार

Archana Banage

साडेपाच लाख लोकांनी घेतला पहिला डोस

NIKHIL_N

रत्नागिरी (राजापूर) : देवाचेगोठणेत बिबट्याची दहशत

Archana Banage

रेवंडी खाडीपात्रात पुन्हा अतिक्रमण!

NIKHIL_N

‘टीईटी’ पात्रताधारक उमेदवार पुढच्या वर्षी ठरणार बाद

Patil_p

भालावली येथील मंदिर चोरी प्रकरणी अद्यापही कोणाला अटक नाही

Patil_p