Tarun Bharat

आज संपणार उत्कंठा

423 उमेदवारांच्या भवितव्याचा होणार फैसला

प्रतिनिधी / पणजी

मनपासह 6 पालिका, 17 ग्रामपंचायती तसेच नावेली जिल्हा पंचायत आणि सांखळी पालिकेच्या एका प्रभागासाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीतीची मतमोजणी आज दि. 22 रोजी होणार असून एकूण 423 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. या निकालाद्वारे मतदारांच्या उत्कंठेलाही पूर्णविराम मिळणार आहे.

राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱयांनी या गोष्टीस दुजोरा दिला असून निवडणुकीच्या निर्धारित वेळापत्रकानुसार आज मतमोजणी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पणजी महानगरपालिकेसह पेडणे, डिचोली, वाळपई, कुडचडे-काकोडा, कुंकळ्ळी व काणकोण या सहा पालिका. तसेच बस्तोडा, ओशेल, वेर्ला काणका, हरमल, कोरगाव, मोरजी मेरशी, आगशी, सर्वण कारापूर, मुळगाव, म्हाऊस, पिसुर्ले, वेलिंग-प्रियोळ-कुंकळये, असोळणा, नावेली, बाळ्ळी-अडणे, भाटी या ग्रामपंचायती. दक्षिण गोव्यातील नावेली जिल्हा पंचायत आणि सांखळी पालिकेचा प्रभाग क्र. 9 साठी दि. 20 रोजी ही निवडणूक घेण्यात आली होती. त्याद्वारे 423 उमेदवारांचे भवितव्य सिलबंद झाले होते. त्याचा फैसला आज होणार आहे.

पणजी मनपाची निवडणूक इलेक्ट्रॉनिक यंत्रांद्वारे तर अन्य सर्वत्र मतपत्रिकांच्या माध्यमातून घेण्यात आली होती. सायंकाळी 5 वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मनपाच्या 30 प्रभागांमधील मतदान यंत्रे फार्मसी महाविद्यालयातील स्ट्राँग रुममध्ये तर अन्य सर्व ठिकाणी झालेल्या निवडणुकीतील मतपेटय़ा त्या त्या भागातील  स्ट्राँग रुममध्ये कडक पोलीस बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्राँग रुमच्या परिसरात अग्निशामक बंबही तैनात ठेवण्यात आले आहेत.

सकाळी 11.30 वा. निकाल येतील

मनपाच्या 30 प्रभागांमधील निवडणुकीसाठी एकूण 68 मतदान यंत्रे वापरण्यात आली. सकाळी 8 वाजल्यापासून फार्मसी महाविद्यालयात मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया विना अडथळा सुरळीत पार पडल्यास सकाळी 11.30 पर्यंत सर्व निकाल जाहीर होतील, अशी माहिती तिसवाडीचे उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांनी दिली.

मनपाची एकूण मतदारसंख्या 32041 आहे. त्यातील 70.19 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. त्यामुळे कोणत्याही प्रभागात एक हजारचा आकडा पार केलेला नाही. त्यातील सर्वाधिक 977 मतदान प्रभाग 8 मध्ये तर सर्वात कमी 574 एवढे मतदान प्रभाग 12 मध्ये झाले आहे.

आचारसंहिता मध्यरात्री संपुष्टात दरम्यान, निवडणूक प्रक्रियेसाठी राज्यातील संबंधित भागात लागू करण्यात आलेली आचारसंहिता आज मतमोजणी संपल्यानंतर किंवा मध्यरात्री 12 वाजल्यानंतर संपुष्टात येणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात म्हटले आहे.

Related Stories

रस्त्याच्यामध्ये कार ठेवला, खुनी हल्ला, आरोपींना अटक

Patil_p

आश्वासने वाटतात निवडणुकीची आमिषे

Amit Kulkarni

फोंडय़ात परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी उडविला लॉकडाऊनचा फज्जा

Amit Kulkarni

जीवन सुंदर बनविण्यासाठी झाडे लावण्याची गरज

Amit Kulkarni

चांगल्या विचारांचे उमेदवार पालिकेवर निवडले जावेत

Amit Kulkarni

…तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः राजीनामा द्यावा : चोडणकर

Omkar B