Tarun Bharat

आटपाडीत तलाठय़ासह दोघांना अटक

प्रतिनिधी/ आटपाडी

तहसील प्रशासनाने वेगवेगळय़ा कारवाया करून जप्त केलेली वाळूची वाहने आर्थिक तडजोड करून सोडून देण्याच्या प्रकरणात आटपाडी पोलिसांनी तलाठी बजरंग लांडगे आणि गोडाऊन किपर भारत बल्लारी या दोघांना मंगळवारी अटक केली. या कारवाईमुळे महसूल प्रशासनासह तालुक्यात खळबळ माजली आहे. वाळूची जप्त वाहन चोरीला न जाता महसूलमधील तिघांनी संगनमताने अर्थकारणातून सोडली आहेत. शिवाय स्वत:च्या बचावासाठी खोटी फिर्याद दिल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

आटपाडी तालुक्यात तहसीलदार सचिन लंगुटे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचाऱयांनी बेकायदेशीर वाळूवर कारवाई करत अनेक वाहने जप्त केली आहेत. अनेकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जप्त वाहने तहसील आवार, शासकीय धान्य गोदाम आवारातून चोरून नेण्याचे प्रकार घडल्याने त्याप्रकरणी अनेकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. परंतु जप्त वाहनांची चोरी होत नसुन ती संगनमताने महसूलमधीलच अधिकारी, कर्मचारी वाळूवाल्यांचे हस्तक बनून सोडून देत असल्याची वस्तुस्थिती चर्चेत आली.

आटपाडी तहसील कार्यालयाच्या पथकाने 6 फेब्रुवारी 2019 रोजी बोंबेवाडी येथे कारवाई करून एक वाळूचा ट्रक्टर जप्त केला होता. ट्रक्टर अन्य वाहनांसह शासकीय धान्य गोदामाच्या आवारात लावण्यात आला होता. हा ट्रक्टर 8 फेब्रुवारी 2019 रोजी चोरून नेवून त्या ठिकाणी दुसरा ट्रक्टर आणून लावण्यात आला. त्याबाबत गोदामपाल भारत बल्लारी (मूळ जत, सध्या आटपाडी.) याने बापू सूर्यवंशी याच्याविरोधात 17 ऑक्टोबर 2019 रोजी आटपाडी पोलिसात दिली होती.

प्रकरणात आटपाडी तहसील कार्यालयाकडील तलाठी बजरंग लांडगे, पुरवठा निरीक्षक बाळासाहेब सवदे आणि खुद्द फिर्याददार भारत बल्लारी यांचाच सक्रिय सहभाग असून त्यांनी आर्थिक तडजोड करून ही वाहने बदलण्यात योगदान दिल्याची चर्चा होती. जप्त वाळूची वाहने गायब होण्याचा प्रकार म्हणजे संबंधित वाळूवाल्यांनीच ती चोरून नेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत होत्या. पण, यात महसूलचेच अधिकारी व कर्मचारीच सहभागी असल्याचे पोलीस तपासात उजेडात आले. याबाबत कारवाई होऊ नये, यासाठीही संबंधित दोषी मंडळींनी प्रयत्न केले होते.

पोलीस निरीक्षक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पी. बी. भांगरे यांनी तपास करत खुद्द फिर्यादी गोडाऊन किपर भारत लालाप्पा बल्लारी, तलाठी बजरंग जयवंत लांडगे, पुरवठा निरीक्षक बाळासाहेब महादेव सवदे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. जप्त वाळू वाहन गोदाम आवारातून बदलून नेल्याप्रकरणी दाखल फिर्याद खोटी असून या गुन्हय़ात सहभागी तिघांपैकी फिर्यादी भारत बल्लारी व तलाठी बजरंग लांडगे यांना मंगळवारी दुपारी अटक केली. अटक केलेल्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस निरीक्षक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पी. बी. भांगरे तपास करत आहेत.

फिर्यादीच बनला आरोप

आटपाडी तहसील कार्यालयात अधिकाऱयांवरच शिरजोरी करून पैशाच्या बदल्यात जप्त वाळूची वाहने सोडणे, वाहने बदलून देणे, वाळूवाल्यांना अभय देणे असे अनेक प्रकार सुरू आहेत. एकीकडे तहसीलदार व काही प्रामाणिक तलाठी, कर्मचारी रात्री गस्त घालून वाहने पकडत असताना ती वाहने पैसे देऊन सोडण्याची टोळीही सक्रिय होती. त्याबाबतची वस्तुस्थिती आत्ता उजेडात आली असून खुद्द फिर्यादीच या प्रकरणात आरोपी बनला. गोदामपाल भारत बल्लारी व तलाठी बजरंग लांडगे यांच्या अटकेमुळे महसूल प्रशासनासह तालुक्यात खळबळ माजली आहे.

Related Stories

इस्लामपुरात कुत्र्यांच्या हल्ल्यात २२ शेळ्या मृत्यूमुखी

Archana Banage

सय्यद अमीन आणि सरदार पटेलांचे नाव हटवण्याचा सांगली महापालिकेत प्रस्ताव

Abhijeet Khandekar

Special story; नॅनो युरिया ठरणार शेतकऱ्यांना वरदान ! जाणून घ्या फायदे !

Abhijeet Khandekar

जतबाबत घोषणा नको..विस्तारित योजनेला मंजुरी द्या! अन्यथा कर्नाटकात जाऊ

Abhijeet Khandekar

दुहेरी जलवाहिनीमुळे ऊस उत्पादनावर परिणाम

Patil_p

मिरज शासकीय रुग्णालयात 300 वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण

Archana Banage