Tarun Bharat

आठवड्य़ातून तीन दिवस उद्योग बंदचे संकट

कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे फौंड्री जगतात चिंतेचे वातावरण

कोल्हापूर प्रतिनिधी

कोरोनानंतर सावरत असलेला जिल्हय़ातील फौंड्री उद्योग पुन्हा अडचणीत आला आहे. कच्च्या मालाचे प्रचंड प्रमाणात वाढलेले दर, क्रेडिटच्या (ऍडव्हान्स देणे घेणे) व्यवहारावर आलेल्या मर्यादा आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम यामुळे आठवड्य़ातील दोन ते तीन दिवस फौंड्री बंद ठेवण्याची वेळ स्थानिक फौंड्रीमालकांवर आली आहे.

दरम्यान, कच्च्या मालाच्या दरवाढीचा आलेख वाढत राहिल्यास त्याचा तुटवडा निर्माण होऊन नजिकच्या काळात उत्पादन निर्मितीला (कास्टिंग) फटका बसणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ञ सांगत आहे. त्यामुळे सरकारने पिग आयर्नसह इतर कच्च्या मालाच्या दरावर नियंत्रण ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनचे संकट झेलल्यानंतर कोल्हापूरचा स्थनिक उद्योग गेल्या काही महिन्यांपासून सावरत होत. पण आता वीजरदवाढीबरोबर फौड्रीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडू लागले आहेत. पिग आयर्न, कास्ट आयर्न स्क्रॅप, माईल्ड स्टिल व ऑलॉयन मटेरियलच्या दरात 30 ते 35 टक्क्यांहून दरवाढ झाली आहे. या दरवाढीमुळे उद्योजक आर्थिकदृष्ट्य़ा अडचणीत येऊ लागल्याने यापूर्वीचे ऍडव्हॉन्स देणे-घेणे, क्रेडिटने तयार माल, वस्तू देणे-घेणे आदी व्यवहारही बंद होऊ लागले आहेत. त्यातच 18 टक्के जीएसटी आकारणीबाबत असलेल्या सरकारच्या धोरणामुळे उद्योजक मेटाकुटीला आले आहेत. जानेवारी 2021 मध्ये 10 टन पिग आयर्नवर 75 हजार 690 रूपयांचा जेएसटी भरावा लागत होता. आता मार्च 2022 मध्ये याच 10 टन पिग आयर्नवर तब्बल 1 लाख 8180 रूपयांचा जीएसटी उद्योजकांना भरावा लागला. जीएसटी भरण्याबरोबर बँक कर्जाचे हप्ते, कामगारांचे पगार, वीजबिल व मेटेनन्स आदी गोष्टी पूर्ण करताना उद्योजकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीचे परिणामही स्थानिक उद्योगांना सहन करावा लागत आहेत. कच्च्या मालाच्या दरवाढीत युद्धही एक कारण असल्याचे सांगितले जाते.

आठवडय़ातून दोन तीन दिवस बंद ठेवण्याची वेळ
अर्थचक्र बिघडू लागल्याने स्थानिक फौंड्रीमालकांपुढे आठवडय़ातून काही दिवस उद्योग बंद ठेवण्याची वेळ आली आहे. सध्या 90 टक्के लहान, मध्यम फौंड्री उद्योग आठवडय़ातून दोन तीन दिवस बंद ठेवले जात आहेत. तर मोठे उद्योग अशा बंद संदर्भात विचार करत आहेत. त्याचबरोबर फौंड्री उद्योगावर अवलंबून असणाऱया इतर उद्योग, व्यवसायांनाही फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ज्यांनी दोन तीन दिवस उद्योग बंदचा निर्णय घेतला आहे. त्यांचे कामगार कामावर येत आहेत. त्यांना पगार सुरू आहे. त्यांच्याकडून दुरूस्ती, देखभालीची आणि स्वच्छतेची काम करून घेण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. नजिकच्या काळात या सर्व गोष्टीचा परिणाम फौंड्री जगताचे गणित बदलून टाकणार ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

450 फौड्रीज्, 1200 लघु-मध्यम उद्योग
कोल्हापुरात लहान-मोठय़ा अशा 450 फौंड्रीज् आहेत. या फौंड्रीवर सुमारे 1200 लघु व मध्यम उद्योग अवलंबून असून, यामध्ये लाख ते सव्वा लाख कामगार काम करत आहेत. फौंड्री उद्योगासाठी लागणारे पिग आयर्न, कास्ट आयर्न स्क्रॅप, माइल्ड स्टील या कच्च्या मालामध्ये अंदाजे 30 ते 35 टक्क्याने वाढ झाली आहे. या फौंड्रीज्ना महिन्याला सुमारे 25 हजार टन पिग आयर्नची गरज असून, यातून 75 हजार टन कास्टिंग तयार केले जात आहे. सध्या स्क्रॅपचा तुटवडा जाणवू लागला आहे.

कच्च्या मालाचे दर किमान एक वर्ष स्थिर ठेवावेत
एका वर्षात फौंड्रीसाठी लागणाऱया कच्च्या मालाच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. रोख पेसे भरूनही कच्चामाल वेळेत मिळत नाही. मालाचा तुटवडा असल्याने, छोटे व मध्यम आठवडय़ातून दोन तीन दिवस बंद ठेवण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने किमान कच्च्या मालाचा दर वर्षभर तरी स्थिर ठेवल्यास फौंड्री उद्योगाला स्थिरता येईल.

Related Stories

जिल्ह्यातील निम्मे शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत

Archana Banage

कोल्हापूर : संशयातून रागाच्या भरात पत्नीचा गळा आवळून खून

Archana Banage

तडसर येथे दोन नवीन धान्य गोदामे होणार : राज्यमंत्री विश्वजीत कदम

Archana Banage

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दलालांपासुन मुक्त केले : सदाभाऊ खोत

Archana Banage

बिहारचे काँग्रेस प्रभारी शक्ती सिंग गोहिल यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

कागल तालुका ग्रामपंचायत निवडणुक प्रशिक्षण आणि पूर्व तयारीसाठी प्रशासन सज्ज

Archana Banage