Tarun Bharat

आढावा बैठकीत खड्डेमय रस्त्यांवरून अधिकारी धारेवर

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हय़ात अनेक रस्ते खड्डेमय आहेत. रस्ते पाहिल्यास कामे सुरू आहेत का, असा प्रश्न पडतो, ठेकेदार कोण आहे, त्याने काम केलेय का, असे सवाल करत आढावा बैठकीत खड्डेमय रस्त्याबाबत ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी अधिकाऱयांना धारेवर धरले. जनतेला प्रशासन आपलं वाटलं पाहिजे याची दक्षता घ्या, नियमातील कामांसाठी जनतेला हेलपाटे मारायला लावू नका, अशी सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

 ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी येथील शासकीय विश्रामगृहातील हॉलमध्ये सोमवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाबरोबर पहिलीच आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुश्रीफ म्हणाले, ‘कृष्णा खोरे’चे रखडलेले प्रकल्प दोन वर्षांत मार्गी लावायचे आहेत. किती प्रकल्पग्रस्तांना पॅकेज मिळाले आहे, याची माहिती द्यावी. जर कामे नियमात होत असतील तर त्यासाठी जनतेला हेलपाटे मारायला लावू नका, जनतेशी कामे प्राधान्याने करा, असे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य सुविधा, चांगले रस्ते यावर भर द्या. आंबेहोळ, नागनवाडी, उचंगी, धामणी या प्रलंबित प्रकल्पांबाबत माहिती घेत. ही धरणं दोन वर्षात पूर्ण होतील याचं नियोजन करा, अशी सूचनाही त्यांनी केली.

मंत्री सतेज पाटील म्हणाले, जिल्हय़ात अनेक रस्ते खड्डेमय आहेत. लिंगनूर ते मुधाळ तिठ्ठा, गगनबावडा ते कोल्हापूर, कोल्हापूर ते गारगोटी आदी रस्ते पाहिल्यास कामे सुरू आहेत का, असा प्रश्न पडतो, ठेकेदार कोण आहे, त्याने काम केलेय का, असे प्रश्न केले. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांनी रस्ते पाहून येतो, असे सांगितले. यावरून संबंधित अधिकाऱयाला मंत्र्यांनी धारेवर धरले. लिंगनूर, मुदाळ, चंदगड, गारगोटी, कोल्हापूर-गगनबावडा, गडहिंग्लज-अंबोळी, बेळगाव-सांगली-कोल्हापूर या मार्गांविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंत्यांकडून आढावा घेतला. रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्तीबाबत त्यांनी सूचना केल्या. बैठकीत वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, नियोजन विभागाचा आढावा घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी स्वागत केले. जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव यांनी जिल्हा नियोजन निधीची माहिती दिली. जिल्हा कृषी अधिकाऱयांनी पीक नुकसानीची माहिती दिली. जिल्हाधिकारी देसाई यांनी आभार मानले.

अपर जिल्हाधिकारी काटकर यांना पदोन्नती..

पुनर्वसनाचा आढावा घेताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, अपर जिल्हाधिकारी काटकर यांनी कोल्हापुरात पुनर्वसनाचा प्रश्न चांगला हाताळला; पण त्यांची राज्याच्या अर्थमंत्र्यांनीच मागणी केली आहे. विशेष कार्य अधिकारी म्हणून काटकर यांच्या नावाला पसंती दिली आहे, असे सांगता तुम्ही पुण्याला जायची तयारी करा, असे संकेत दिले. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी काटकर यांना पदोन्नती मिळाल्याची चर्चाच बैठकीनंतर सुरू झाली.

शिवभोजन थाळी योजनेचा घेतला आढावा

यावेळी तिन्ही मंत्र्यांनी जिल्हा उप निबंधकांकडून कर्जमाफीबाबत माहिती घेतली. शिवभोजन थाळी योजनेचा आढावा घेतला. शिवथाळी योजनेबाबत एकूण 16 प्रस्ताव आले आहेत. 26 जानेवारीला किमान एक केंद्र सुरु करण्याच्या सूचना आहेत. जिह्यामध्ये चार केंद्र सुरु करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी दौलत दैसाई यांनी सांगितले.

Related Stories

३० हजार रुपयांची सापडलेली रक्कम प्रामाणिकपणे केली परत

Archana Banage

पोलीस नाईक सागर कोळी लाचलुचपतच्या जाळ्यात

Archana Banage

अश्विनी बिद्रे हत्याकांडातील चारही संशयीत आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

Archana Banage

Kolhapur : युवा मल्लाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु

Abhijeet Khandekar

राजू शेट्टी यांनी स्वीकारला आमदारकीचा प्रस्ताव

Archana Banage

पूर पंचनाम्यांत `डाटा एंट्री’चा घोळ!

Archana Banage