Tarun Bharat

आणि तिचा कायापालट झाला

आयुष्य बदलणं आपल्या हाती असतं. अनंत अडचणी, समस्या, अडथळ्यांना पार करूनही जिंकता येतं. कितीही संकटं आली तरी निराश व्हायचं नसतं. रडत बसणं हे कोणत्याही प्रश्नावरचं उत्तर ठरू शकत नाही. केरळच्या जस्मिन मुसा या तरुणीने हे दाखवून दिलं आहे. लहान वयात झालेलं लग्न आणि त्यानंतर सहन करावा लागणारा त्रास हे सगळं मागे टाकत जस्मिन आज फिटनेस ट्रेनर बनली आहे. तिची कहाणी सध्याच्या काळात दिशादर्शक ठरू शकते. 

जस्मिनचा आधीचा आणि सध्याचा फोटो बघितल्यास या दोन्ही एकच जस्मिन आहेत यावर आपला विश्वास बसणार नाही. जस्मिन मुसा ही केरळची तरुणी पूर्णपणे बदलली आहे. आधुनिक बनली आहे. जस्मिनला लहान वयात प्रचंड संघर्ष करावा लागला. कौटुंबिक हिंसाचाराला सामोरं जावं लागलं. मात्र यापैकी कशाहीमुळे ती डगमगली नाही. आपला रस्ता आपणच निवडायला हवा. आपलं आयुष्य आपणच घडवायला हवं हे तिला उमगलं होतं. मग काय, दुसरं काहीही तिच्या महत्त्वाकांक्षांच्या आड आलं नाही. वयाच्या सतराव्या वर्षीच जस्मिनचं लग्न झालं. या मुलाला ती कधीही भेटली नव्हती. साधं बघितलंही नव्हतं. लग्नाच्या दिवशीच त्यांची नजरानजर झाली. मात्र लग्नानंतर जस्मिनला प्रचंड त्रास सहन करावा लागला. पती आणि सासरची मंडळी तिला खूप त्रास द्यायची. मारहाण करायची. घालूनपाडून बोलायची. पण हे सगळं नशीब म्हणून तिने स्वीकारलं नाही. कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून तिने घटस्फोट घेतला. माहेरी आली. पण इथे तिच्याकडे ओझं म्हणूनच बघितलं गेलं. तिच्या दुसर्या लग्नाची चर्चा सुरू झाली. जस्मिनचं दुसरं लग्नही झालं. पण इथेही अडचणी संपल्या नाहीत. कौटुंबिक सुख लाभलं नाही. पती त्रास देऊ लागला. दरम्यानच्या काळात ती गरोदर राहिली. जगण्याला अर्थ मिळेल असं वाटून जस्मिन खूप खूश झाली. ही गोड बातमी तिने पतीला सांगितली. पतीला आनंद तर झाला नाहीच उलट त्याने तिच्या पोटावर बुक्के मारले. यामुळे तिचा गर्भपात झाला. मात्र यामुळे जस्मिन कोलमडली नाही. तिने पुन्हा उभारी घ्यायचं ठरवलं. जस्मिनने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. त्याला अटकही करण्यात आली.

जस्मिन या लग्नातून बाहेर पडली. आता तिला स्वतःसाठी जगायचं होतं. जस्मिनने जीममध्ये जायला सुरुवात केली. फिटनेसचं प्रशिक्षण घेतलं. स्वतः तंदुरूस्त झाली. तिच्यात आमूलाग्र बदल घडला होता. कायापालट का काय म्हणतात ते हेच की काय असा प्रश्न पडावा इतकी जस्मिन बदलली. तिने आपला व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. या व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडला. जस्मिन फिटनेस ट्रेनर आहे. जीममध्ये नोकरी करते आणि उत्तम आयुष्य  जगते. एक योग्य निर्णय आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. आज लोक मला कामामुळे ओळखतात याचं खूप समाधान वाटतं असं जस्मिन सांगते. जस्मिनची कथा प्रेरणादायी तर आहेच शिवाय खचलेल्या मनांना उभारी देणारीही आहे. 

Related Stories

बायओपोलार डिसॉर्डरविषयी

Amit Kulkarni

प्रबळ इच्छाशक्तीचा बळावर

Amit Kulkarni

टिकवा नात्यातला गोडवा

Amit Kulkarni

रिफ्रेश व्हा

Amit Kulkarni

गेट द फ्युजन लूक

Omkar B

दातांनी नारळ सोलणार्‍या नीलावती गावकर तेळय – बासरय, बाळ्ळी येथील महिला

GAURESH SATTARKAR
error: Content is protected !!