Tarun Bharat

आता खासगी सहभागातून कोविड प्रयोगशाळा

वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर : आठवडाभरात मागविणार निविदा

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करीत आहे. कोरोना चाचण्यांची संख्या वाढवून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आता खासगी संस्थांशी करार करून कोविड प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याकरिता आठवडाभरात निविदा मागविण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.

बेंगळूर येथे युरोफिन्स क्लिनिकल जेनेटिक इंडिया या संस्थेने सुरू केलेल्या नव्या कोविड प्रयोगशाळेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार कोरोना चाचण्यांची संख्या तीन पटीने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उद्देशाने खासगी सहभागातून प्रयोगशाळा सुरू केल्या जाणार आहेत, असे ते म्हणाले.

वैद्यकीय शिक्षण खाते आणि आरोग्य खाते संयुक्तपणे यासंबंधी आराखडा तयार करून आठवडाभरात निविदा मागविल्या जाणार आहेत. राज्य सरकारने केवळ सहा महिन्यात 144 कोविड प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. आता उद्घाटन झालेली प्रयोगशाळा 145 वी आहे. या ठिकाणी दररोज 5 हजार कोरोना चाचण्या करून अहवाल देण्याचे आश्वासन युरोफिन्स क्लिनिकल जेनेटिक इंडिया संस्थेने दिले आहे. सरकारकडून देखील आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले.

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक जागृती केली तरीही जनता खबरदारी बाळगत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे मास्क न वापरणाऱयांविरुद्ध कारवाई करण्यासाठी दंडाची रक्कम 200 रुपयांवरून शहरी भागात 1 हजार रुपये तर ग्रामीण भागात 500 रु. ने वाढविण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण 1.52 टक्के

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 1.52 टक्के आहे. शिवाय 50 लाखहून अधिक कोरोना चाचण्या करून आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. पुढील काळात दिवसाला दीड लाख चाचण्या करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे, अशी माहिती मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली आहे.

Related Stories

कृषीमंत्री पाटील यांनी सिध्दरामय्यांवर साधला निशाणा

Archana Banage

बीएमटीसी सोमवारपासून दोन हजार बसेस चालविण्याच्या तयारीत

Archana Banage

कर्नाटक : सामाजिक कार्यक्रमांना ५०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी

Archana Banage

आजपासून खासगी बसेस सोडणार

Patil_p

बेंगळूर: पोलिसांनी ५४ दिवसात ४१,८३२ वाहने केली जप्त

Archana Banage

कर्नाटक आरोग्यमंत्र्यांचा खासगी रुग्णालयांना इशारा

Archana Banage