नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्ला केला आहे. पेगॅसस प्रकरणावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र डागताना आणीबाणीपेक्षा पेक्षा गंभीर परिस्थिती असून आता संपूर्ण देशात ‘खेला होबे’ होणार असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
माझा फोन पहिलाच टॅप झाला आहे. अभिषेकचाही फोन टॅप होत आहे आणि मी त्याच्याशी रोज फोनवर बोलते. त्यामुळे माझाही फोन टॅप झाला आहे. पेगॅससने सर्वांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं. अच्छे दिन खूप बघितले आता आम्ही सच्चे दिन बघू इच्छित आहोत, असा निशाणा त्यांनी मोदी सरकारवर साधला.
ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की मी सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल यांना भेटणार आहे. लालू यादव यांच्याशीही चर्चा झाली आहे. सर्वांना एकत्र यायचं आहे. सोनिया गांधींनाही विरोधी ऐक्य हवं आहे, आम्ही त्यांच्यासोबत बैठकीत यावर चर्चा करू, असं ममता बॅनर्जींनी सांगितलं. सर्वांनी विरोधकांच्या आघाडीवर गांभीर्याने काम केलं तर ६ महिन्यांत निकाल दिसू शकेल, असा विश्वास ममतांनी व्यक्त केला. सर्व विरोधी नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत, जर विरोधकांचं राजकीय वादळ आलं तर कोणीही हे रोखू शकणार नाही. आता ‘खेला होबे’चा आवाज देशभर ऐकू जाणार आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.


previous post