Tarun Bharat

आता संभाव्य महापूराची माहिती देणार ‘कर्ण’

प्रशांत नाईक / मिरज

2019 च्या महाप्रलयंकारी महापूराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कृष्णा नदीपात्राचा अभ्यास करत असलेल्या केंद्रीय जल आयोग पथकाच्या ताफ्यात आता ‘कर्ण’ हे अत्याधुनिक स्वयंचलित यंत्र दाखल झाले आहे. महाबळेश्वर नंतर दुसरे महत्त्वाचे उपकेंद्र म्हणून अर्जुनवाड पुलावर हे मिटर यंत्र बसविण्यात आहे. या यंत्रामुळे 50 वर्षांनंतर पहिल्यांदाच थेट पुलावरुन पाणी पातळीचा अभ्यास केला जाणार आहे. शिवाय हे यंत्र संभाव्य महापुराबाबत तात्काळ माहिती देणार आहे. त्यामुळे केंद्रीय जल आयोग पथकातील जल अभ्यासकांना बळ मिळाले आहे.

मागीलवर्षी सांगली-कोल्हापूर जिह्यात न भूतो न भविष्यती असा महापूर आला. दोन्ही जिह्यातील सर्वच शहरांसह, हजारो गावे, वाडय़ा-वस्त्या पूर्णत पाण्याखाली होत्या. यावर्षीही मोठय़ा प्रमाणात पावसाची शक्यता असल्याने शिवाय धरण पाणलोट क्षेत्रात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने नदीकाठचा पूरपट्टा पुन्हा एकदा हबकला आहे. महापुराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शासनाने काही दिवसांपासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा व बेळगांव जिह्यातील केंद्रीय जल आयोगाची सर्व केंद्रे कृष्णानदी व कृष्णा नदीस मिळणाऱ्या सर्व उपनद्यांची 24 तास पाणी पातळी मोजत आहेत.

आंध्र प्रदेशपासून महाबळेश्वरपर्यंत हे जल आयोग पथक नदीपात्राचा अभ्यास करतात. यापैकी महाबळेश्वर हे महत्त्वाचे केंद्र असल्याने तेथे यापूर्वीच स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले आहे. गतवर्षी सांगली, कोल्हापूर जिह्याला महापूराचा विळखा पडल्याने या भागासाठी अर्जूनवाड केंद्राला अतिमहत्त्व देण्यात आले आहे.

1969 साली स्थापन झालेल्या अर्जूनवाड केंद्रावर पाणी तपासणीसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा कार्यरत आहे. मात्र, यासाठी स्वयंचलित यंत्रणा नसल्याने पथकातील जल अभ्यासकांना रात्री-अपरात्रीच्यावेळी बोटींमधूनच नदीपात्रात उतरावे लागते. शिवाय रात्रीच्यावेळी नदीच्या पाण्यात थांबूनच पाणी पातळी, खोली, रुंदी, हवेतील अर्दता, गती, दिशा आणि कमाल-किमान तापमान यासह विसर्गाची माहिती नोंद करावी लागते.

आता केंद्रीय जल आयोगाच्या पथकात ‘कर्ण’ हे अत्याधुनिक स्वयंचलित मिटर यंत्र दाखल झाले आहे. सदरचे यंत्र मिरज-अर्जुनवाड पुलावर बसविण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या 50 वर्षांपासून प्रत्यक्ष पाण्यात उतरुन करावा लागणारा पाणी पातळीचा अभ्यास आता पुलावरुनच करता येणार आहे. दररोज सकाळी आठ ते दहा या दोन तासातच या यंत्राद्वारे नदी पात्राची रुंदी, खोली, पाणी पातळी आणि प्रत्येक सेकंदाच्या विसर्गाची माहिती संकलीत केली जात आहे. यंत्राद्वारे संभाव्य महापुराची माहितीही मिळत आहे.

Related Stories

सामर्थ्य सोशल फौंडेशन समाजोपयोगी कार्य करेल

Patil_p

कोयनेच्या पायथा वीजगृहातून विसर्ग

Patil_p

अन् हिल टॉप सोसायटीचा प्रश्न मार्गी

Patil_p

भारनियमनाबाबत ऊर्जामंत्र्यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले…

datta jadhav

उस्मानाबाद जिल्ह्यात सापडले ७ नवीन रुग्ण.

Archana Banage

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या गाडीला अपघात

datta jadhav