Tarun Bharat

आत्मनिर्भर अभियान पॅकेज चाकरमान्यांपर्यंत पोहोचविणार!

भाजपा माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांची माहिती : चाकरमान्यांना गावातच रोजगार संधी उपलब्धतेसाठी प्रयत्न!

वार्ताहर / कणकवली:

कोरोनामुळे मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांना येथेच राहून रोजगार करायचा असेल तर त्यांच्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींमार्फत जाहीर करण्यात आलेले आत्मनिर्भर अभियानाच्या माध्यमातून पॅकेज देण्यात येणार आहे. या माध्यमातून येथे आलेल्या चाकरमान्यांना गावातच रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून, सिंधुदुर्ग भाजपमार्फत अभियान स्वरुपात या योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक तथा अत्मनिर्भर भारत अभियानाच्या समितीचे प्रमुख अतुल काळसेकर यांनी दिली.

येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत काळसेकर बोलत होते. यावेळी प्रभाकर सावंत उपस्थित होते. काळसेकर म्हणाले, कोरोनाच्या दुसऱया टप्प्यात देश सक्षम होण्यासाठी आत्मनिर्भर पॅकेज जाहीर करण्यात आले. तिसऱया टप्प्यात या पॅकेजचा विनियोग जनतेसाठी करण्यावर भर देण्यात येणार आहे. जिह्यात 70 हजार चाकरमानी आले. त्यांच्यापर्यंत हे पॅकेज पोहचविण्यात येणार आहे. यासाठी जिह्यात आत्मनिर्भर समिती स्थापन करण्यात आली आहे.

चाकरमान्यांशी संवाद साधणार

काळसेकर म्हणाले, भाजपचे नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली झाराप येथील भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांना सोबत घेत हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजपचे लोकप्रतिनिधी हे मुंबई – पुण्याहून आलेल्या चाकरमान्यांशी संवाद साधणार आहेत. अनेक चाकरमान्यांशी मी देखील संवाद साधला आहे. येत्या काळात यातील काही चाकरमानी हे जिह्यातच राहणार आहेत. या अभियानातून त्यांना आम्ही काय देऊ शकतो, याबाबत सकारात्मक विचार सुरू करण्यात आला आहे. जिह्यात स्थिरस्थावर झालेल्या चाकरमान्यांना जर लहान – मोठे उद्योग सुरू करून देता आले तर त्यातून रोजगाराची संधी व जिह्यातील अर्थव्यवस्थाही गतीमान करता येणार आहे.

ज्याप्रमाणे माणगाव खोऱयात पोल्ट्री व्यवसाय जोरात करण्यात येतो तेथे जर स्लॉटर हाऊस करता आले तर त्याचा फायदा होऊ शकतो. जिह्यात अंडय़ांना मागणी असताना त्या अनुषंगानेही प्रयत्न करण्यात येणार आहेत. मालवण सभापती अजिंक्य पाताडे यांनी या पद्धतीने काम सुरू केले आहे. ज्या मुंबईकर चाकरमान्यांशी संवाद साधायचा आहे त्यासाठी त्यांनी पथके तयार केली आहेत. याकरिता गुगल फॉर्मही तयार करण्यात आला आहे. कमी पैशात आता कसे रहायचे याची सवय लागली आहे, त्यामुळे या चाकरमान्यांना मानसीक आधार देण्यात हे अभियान महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. गावा – गावात जात या अभियानांतंर्गत उद्योग करायला तयार असतील त्यांना या माध्यमातून मदतीचा हात देण्यात येणार असल्याचे काळसेकर यांनी सांगितले.

शेती व्यवसायाला प्रोत्साहन देणार!

चाकरमानी गावात आल्याने आता गावांमधील पड असलेली जमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. शेती व अन्य उद्योगांच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. लॉकडाऊनमुळे जे कारागिर आपल्या गावी गेलेत त्यांची जागा आपल्या जिह्यातील लोक घेवू शकतात का? याचाही या अभियानात समावेश करण्यात येणार आहे. अशा काम करणाऱयांना प्रोत्साहन देण्यासाठी आत्मनिर्भर अभियान जिल्हाभरात पसरविण्यात येणार असल्याची माहिती काळसेकर यांनी दिली.

Related Stories

विजयदुर्ग येथे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा

Anuja Kudatarkar

विषारी द्रव्य प्राशन केल्याने प्रौढाचा मृत्यू

Patil_p

एम टी बसरा जहाजाचा तळ फुटला

Patil_p

गणेश मूर्तीकारांसमोर आर्थिक पेच कायम

Anuja Kudatarkar

स्वप्नाली सावंत खूनाचे न्यायालयापुढे दोषारोपपत्र , पती भाई सावंतसह दोघांवर आरोप

Archana Banage

रत्नागिरीत एटीएम फोडण्याचा चोरटय़ांचा प्रयत्न फसला

Patil_p