झाडांवर लटकलेले असतात मृतदेह , कंपास देखील करत नाही काम
जगात चित्रविचित्र घटना घडत असतात आणि लोकांदरम्यान त्या चर्चेचा विषय ठरतात. असेच एक ठिकाण जपानमध्ये आहे, त्याला पूर्ण जगात ‘सुसाइड फॉरेस्ट’ म्हणजेच आत्महत्येचे जंगल या नावाने ओळखले जाते. हे हिरवेगार आणि सुंदर दिसणारे जंगल मॉर्निंग वॉकसाठी नव्हे तर स्वतःच्या भयावह कहाण्यांसाठी जगभरात चर्चेचा विषय आहे.
या जंगलात आतापर्यंत अनेकांनी आत्महत्या केली आहे. तर या जंगलाबद्दल लोकांमध्ये अनेक मान्यता आहेत. या जंगलात आत्म्यांचा संचार असून ते लोकांना आत्महत्या करण्यास भाग पाडत असल्याचे काही लोकांचे मानणे आहे. हे जंगल जगातील सर्वात प्यॉप्युलर सुसाइड प्लेसेजमध्ये दुसऱया स्थानावर आहे. हे जंगल जपानची राजधानी टोकियोपासून काही तासांच्या अंतरावर आहे.
ऑकिगहरा जंगलात प्रवेश करताच तुम्हाला अनेक इशारावजा सूचनांचे फलक दिसून येतील. ‘स्वतःच्या मुलांबद्दल आणि कुटुंबाबद्दल विचार करा’, ‘तुमचे जीवन तुमच्या आईवडिलांकडून देण्यात आलेली मौल्यवान भेट आहे’’ असे मजकूर असणारे फलक तेथे आहेत. हे जंगल टोकियोपासून 2 तासांच्या अंतरावर माउंट फूजीच्या उत्तर-पश्चिमेला आहे. तसेच ते 35 चौरस किलोमीटरच्या मोठय़ा भूभागात फैलावलेले आहे. हे जंगल घनदाट असल्याने याला वृक्षांचे सागरही म्हटले जाते.
भीतीदायक कहाणी


या जंगलामध्ये आत्म्यांचा संचार असल्याचे बोलले जाते. अधिकृत नोंदीनुसार 2003 साली या जंगलातून सुमारे 105 मृतदेह हस्तगत करण्यात आले होते. यातील बहुतांश मृतदेह सडले होते, तर काही मृतदेहांचा वन्यप्राण्यांनी लचका तोडला होता. जंगल घनदाट असल्याने लोक वाट चुकतात आणि मग भीतीने स्वतःचा जीव घेत असल्याचेही मानले जाते.
सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे जंगलात कंपास किंवा मोबाईल यासारखी उपकरणे काम करत नाहीत. कंपासची सुई देखील योग्य दिशा दाखवत नाही. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱया लाव्हारसाने मातीचे रुप घेतले असून यात लोहाचे प्रमाण अधिक असते. मॅग्नेटिक आयर्नमुळे कंपासची सुई सदैव हलत राहत असल्याने योग्य दिशा दाखवू शकत नसल्याचे कारण सांगण्यात येते. तर मोबाईल नेटवर्क तेथे नसल्याने जंगलात अडकून पडलेल्या व्यक्तीला उर्वरित जगाशी संपर्क साधणे अवघड ठरते. जंगलातून रात्रीच्या वेळी ओरडण्याचे आवाज ऐकू येतात असे स्थानिकांचे म्हणणे आहे.