पुणे \ ऑनलाईन टीम
उद्या जर आदित्य ठाकरे यांना लग्नासाठी मुलगी बघायची वेळ आली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्र सरकारला पत्र लिहतील, अशी उपरोधिक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. राज्य सरकार काही झाले की केंद्र सरकारकडे बोट दाखवते, असेही त्यांनी यावेळी म्हटले. ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. महाविकास आघाडीला वाटतं की जनता मूर्ख आहे. गेल्या दीड वर्षांपासून राज्यात मागास आयोग नाही. त्यामुळे इथं केंद्राचा काहीही संबंध नाही. पण हे सरकार कोडगं आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी मुलगी बघायची असेल तेव्हाही उद्धव ठाकरे पंतप्रधानांना पत्र लिहतील, तुमच्या बघण्यातली दिल्लीतली कोण मुलगी असेल तर सांगा म्हणून, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासंदर्भात भाष्य केले. राज्य सरकाकडून संभाजीराजे यांची हेरगिरी होत असल्याची बाब समोर आली आहे. मी याचा निषेध करतो. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी खासदारकीचा राजीनामा दिला तर कोणावरही परिणाम होणार आहे का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला. तसेच ओबीसी आरक्षणाचा केंद्र सरकारशी कोणताही संबंध नाही. राज्य सरकारने दीड वर्षापासून मागासवर्गीय आयोगच नेमला नाही. तो आधी नेमला जावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट राजकीय नव्हती. शरद पवार आजारी असल्यामुळेच देवेंद्र फडणवीस त्यांना भेटायला गेले होते. फडणवीस यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यामध्ये काहीही राजकीय नव्हते. आजदेखील देवेंद्र फडणवीस हे जळगावात नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.


previous post