नवी दिल्ली
कोरोना प्रादुर्भाव आणि प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यात येणाऱया अडचणी लक्षात घेता प्राप्तिकर विभागाने आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. आता 30 सप्टेंबर 2021 या मुदतीऐवजी 31 मार्च 2022 ही आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत असणार आहे. आधार-पॅन जोडण्यासाठी 6 महिन्यांचा वाढीव अवधी मिळाल्यामुळे अद्याप जोडणीची प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्यांना प्राप्तिकर विभागाने दिलासा दिला आहे. प्राप्तिकर विभागाने 7 जून रोजी नवी वेबसाईट सुरू केली होती. त्यानंतर विवरणपत्र भरण्यासाठी अनेकांना अडचणी येत असल्यामुळे विवरणपत्र दाखल करण्यासाठीही यापूर्वीच मुदतवाढ देण्यात आली आहे.