आझाद मैदानावर 22 फेब्रुवारी पासून करण्यात येणार आंदोलन
प्रतिनिधी/असळज
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळाकडून कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन मिळण्यासाठी आझाद मैदान, मुंबई येथे२२ फेब्रुवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन राज्यातील जिल्हा परिषदना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सुमारे २९ हजार ग्रामपंचायती, ३५१ पंचायत समिती व ३४ जिल्हा परिषद कार्यालयामध्ये संग्राम व आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून राज्यातील तरुण–तरुणी असलेले संगणकपरिचालक मागील १० वर्षा पासून काम करत आहेत. राज्यातील सुमारे ६ कोटी ग्रामीण जनतेला शासनाच्या योजना पोहचवून खर्या अर्थाने डिजिटल महाराष्ट्र साकार करण्याचे काम संगणकपरिचालकांनी केलेले आहे. त्यामुळे या प्रामाणिक कामाची दखल घेऊन राज्य शासनाने संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देऊन किमान वेतन देण्याची मागणी केली आहे. २९ नोव्हेंबर २०१८ रोजी राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी हा प्रश्न सोडवण्याचे वचन आझाद मैदानावर येऊन दिले होते. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यासंबंधी आश्वासन दिले होते.
या मागील संग्राम प्रकल्पात तर भ्रष्टाचार झालाच परंतु दिल्लीच्या सीएससी–एसपीव्ही या कंपनीच्या माध्यमातून मागील ४ वर्षात सुमारे ३९२ कोटींचा भ्रष्टाचार,गैरप्रकार व अनियमितता केली असून त्याबाबतची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केलेली आहे. शासनाचा निधी हडप करणार्या कंपनीवर कारवाई करण्याऐवजी ३१ मार्च २०२० रोजी या सीएससी–एसपीव्ही कंपनीचा करार संपलेला असताना या कंपनीलाच नव्याने काम देण्यासाठी कोरोनाचे कारण पुढे करत सीएससी–एसपीव्ही ला नियमबाह्य पद्धतीने मुदतवाढ दिली. व संगणकपरिचालकांना फक्त १००० रुपये मानधन वाढ दिली. म्हणजे आता फक्त ७००० मानधन असेल यात या महागाईच्या काळात त्या संगणकपरिचालकाने कुटुंब कसे चालवायचे? हा प्रश्न आहे. शासनाने समान काम समान वेतन दिलेच पाहिजे,परंतु सर्व नियम पायदळी तुडवून ग्रामविकास विभागाने हा मनमानी निर्णय घेतला आहे.


previous post