Tarun Bharat

आपल्या पक्षाच्याच नेत्यांनी रचले होते षडयंत्र

प्रतिनिधी/ मडगाव

2017 मध्ये विधानसभा निवडणुकीत आपल्याला बाजूला काढण्यासाठी आपल्या पक्षाच्याच काही नेत्यांनी आपल्या विरोधात षडयंत्र रचले होते. त्यात आपल्या विरोधात एकूण पाच तक्रारी नोंद झाल्या होत्या. त्यातील चार प्रकरणाचा निकाल आपल्या बाजूने लागला तर पुनो वेळीप या प्रकरणात आपल्याला दोषी ठरविले आहे. या निवाडय़ाला आपण वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती रमेश तवडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

2017च्या विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने अगोदर पुनो वेळीप प्रकरणात आपल्यावर खोटे आरोप करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण काणकोणच्या कनिष्ठ न्यायालयात गेले. त्याचा निवाडा आपल्या विरोधात गेला. गेल्या साडेतीन वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला. या प्रकरणाचा अनेकांना विसर ही पडलेला आहे. त्यातील सत्यता जनतेसमोर ठेवण्यासाठीच आपण पत्रकार परिषद घेत असल्याचे श्री. तवडकर यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीला एक महिना असताना देखील भाजपचा उमेदवार म्हणून आपला काणकोण मतदारसंघात प्रचार सुरू होता. अशावेळी काही स्थानिक राजकारण्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना धरून आपल्याला बदनाम करण्यासाठी एक षडयंत्र रचले गेले व त्याचाच एक भाग म्हणून पुनो वेळीप प्रकरणात आपल्या विरोधात तक्रार नोंद झाली. पुनो प्रकरणासह आपल्या विरोधात एकूण पाच तक्रारी नोंद झाल्या. गेल्या साडेतीन वर्षात चार तक्रारीतून आपण बाहेर पडलो आहे.

त्यातील एक तक्रार 2007 मधील वनखात्याच्या कर्मचाऱयांना त्याचे काम करीत असताना अडविल्याचे कारण पुढे करून जवळपास 9 वर्षांनी आपल्या विरोधात तक्रार नोंद करण्यात आली. भाषा सुरक्षा मंचचे गोवाभर आंदोलन झाले. त्यावेळी अनेक लोकांनी रस्ते अडविले. आपल्यावर तक्रार नेंद करून आपल्याला अडकविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आयकर खात्याचा छापाही आपल्यावर घालण्यात आला. चौथे प्रकरण बंगल्याचे, जो बंगला आपण खरेदी केलेलाच नाही. पक्षाच्या कामकाजासाठी हा बंगला घेण्यात आला. या बंगल्यात चोरी झाली. त्या प्रकरणातही आपल्याला अडकविण्याचा प्रयत्न झाला. तर पाचवे प्रकरण होते ते पुनो वेळीप यांचे.

पुनो वेळीप हा कोण ?

पुनो वेळीप हा एक सामान्य माणूस. आपला संबंध या व्यक्तीकडे आला तो बलराम शिक्षण संस्थेच्या माध्यमांतून. आपल्या बलराम शिक्षण संस्थेत गरीब व गरजू मुलांना निवासी शाळा उपलब्ध करण्यात आलेली आहे. या शाळेत पुनो वेळीप यांच्या दोन मुलांनी प्रवेश घेतला होता. त्यामुळे पालक म्हणून त्यांच्याशी संपर्क आला होता. एखादा पालक बेशिस्त वागत असले तर त्याला दोन शब्द सांगण्याचा नैंतिक अधिकार आहे. कारण, मुलांच्या भल्यासाठी शाळा सुरू केलेली आहे. त्याला दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न केला. याच कालखंडात त्याला पैसे देऊन किंवा अन्य पद्धतीने त्याला हाताशी धरून मोठे षडयंत्र रचले गेले. आपण त्याला मारहाण केल्याची तक्रार पोलीस स्थानकात नोंद झाली. हे सर्व पद्धतशीरपणे रचलेले षडयंत्र होते, असे श्री. तवडकर म्हणाले.

आपण त्या पुनो वेळीपला एक बोट लावलेले नाही. आपण जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. परंतु आपण आपल्या उभ्या हयातीत असे काहीच केलेले नाही याची जाणीव काणकोणच्या जनतेला व गोव्यातील नागरिकांना ठाऊक आहे. असे असताना देखील काही स्थानिक नेत्यांनी जबरदस्त षडयंत्र आपल्या विरोधात उभे केले. पुनो प्रकरणात पद्धतशीरपणे विविध कलमे लावून त्यात आपल्या अडकविण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या प्रकरणात आपला अर्धा विजय झाल्याचा दावा त्यांनी केला. मध्यंतरी आपल्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आला परंतु आपण डगमगलो नाही. शेवटी भाजपला सर्व गोष्टी कळून चुकल्या व आज आपण पक्षाच्या पुन्हा मुख्य प्रवाहात पोहचलो असल्याचे त्यांनी सांगितले.

या पूर्वी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली. कार्यकर्ते रक्तबंबाळ झाले तरी त्या प्रकरणी काहीच झालेले नाही. मात्र, आपण साधे बोटसुद्धा लावलेले नाही अशा प्रकरणात आपल्या विरोधात तक्रारी नोंद होतात हे कितपत योग्य, असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला. काणकोणचे माजी आमदार वासू पाईक गांवकर यांचा मुलगा सुदेश गांवकर याला माडाला बांधून घालून मारहाण केली. पोलीस तक्रार नोंद झाली. परंतु अद्याप त्याला न्याय मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. बाळळी आंदोलनात उटाचे दोन कार्यकर्ते शहीद झाले. तरी या प्रकरणाचा निकाल लागत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पुनो वेळीप प्रकरणात आपण दाद मागणार आहेच. आपल्या सामाजिक व राजकीय कारर्किदीत एकही डाग आपण लावून घेणार नाही व आपण डाग लागण्यासारखा वागणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

कुशावती नदीला पूर, पारोडा पूल पाण्याखाली

Amit Kulkarni

आसगावात दोन ‘हट’ जाळून खाक

Omkar B

यशराज गोव्यातील डेअरिंग डिबेट चॅम्पियन

Patil_p

दरदिवशी 300 जण मरण्याची सरकार वाट पाहत आहे काय?

Amit Kulkarni

वाटमारी करणाऱया संशयिताला अटक

Amit Kulkarni

कोरोनाची लक्षणे नसलेल्यांना होम क्वारंटाईन

Omkar B