कोरोना संदेश : डॉ. दिलीप पाटील, आरोग्य अधिकारी, कोल्हापूर महापालिका
आम्ही कोल्हापूरची माणसं आहोत. बलदंड आहोत. तरुण आहोत, आम्हाला काय होतयं?, कोरोना बिरोना कुछ नाही, अशा भ्रमात राहू नका, वाढदिवस, पाटर्य़ा साजर्या करू नका, कारण आज कोरोना सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे सर्वांनी केवळ काळजी नव्हे तर दक्षताही घेणे आवश्यक बनले. बेजबाबदार वर्तन आपल्या सर्वांसाठी धोकादायक ठरू शकते, याचे भान बाळगा, वृथा अभिमान, मेखी मिरविण्यापेक्षा घरातील लहान मुले, वृद्ध मंडळी आणि आजारी व्यक्तींची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. गेल्या पंधरा दिवसांत कोल्हापूर शहरासह जिल्हय़ात कोरोनाचे रूग्ण मोठय़ा संख्येने वाढत आहेत. दररोज या रूग्ण संख्येत होणारी वाढ चिंताजनक ठरत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, जे कोरोना बाधित झाले आहेत, त्यांच्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा शहरात युद्धपातळीवर कार्यरत राहून सेवा देत आहे. आरोग्य यंत्रणेपेक्षाही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी महत्वाची ठरणार आहे. डब्ल्यूएचओने कोरोना केवळ ड्रॉपलेट्स्मधून पसरत नाही तर तो हवेव्दारेही पसरत असल्याचे निष्कर्ष काढले आहे. त्यामुळे प्रादुर्भाव, संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे केवळ प्रतिबंधात्मक दक्षता हाच सध्यातरी कोरोनावर लस नसल्याने एकमेव उपाय आहे, हे ध्यानात घ्या. शहरातील एका घरात तीन चार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. त्याचे कारण शोधले तर संबंधित घरातील एखादी व्यक्ती परगावी जावून आलेली असते किंवा परगावाहून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेली असते. त्यातून संसर्ग होतो. सशक्त व्यक्तीला संसर्ग होत नाही, पण त्याच घरातील अशक्त व्यक्तीला संसर्गाचा धोका अधिक असतो. शहरात अशाच पद्धतीने पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहे. त्याची वाढती संख्या गंभीर आहे. सध्या पावसाळा आहे. इतर डेग्यू, मलेरिया, गॅस्टोसारख्या साथीचे आजारही येण्याची भीती आहे. अशावेळी सर्व कोल्हापूरकरांनी घाबरून न जाता घरीच राहावे, अत्यावश्यक काम वगळता घराबाहेर पडू नये, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर सक्तीने करावा, दर तासाने साबणाने हात धुवावेत, कोणाशी संपर्क साधताना मोबाईलसारख्या साधनांचा वापर करावा. आपली एक चूक सार्या घराला, समाजाला महागात पडू शकते, याचे भान बाळगा. कोरोना समोर व्यक्ती कोण आहे? हे विचारून शरीरात शिरत नाही हे लक्षात ठेवा, घरी रहा, सुरक्षित राहा.
शब्दांकन : संजीव खाडे, कोल्हापूर