Tarun Bharat

आम आदमी पक्षात राजीनामा सत्र

प्रतिनिधी/ मडगाव

गोव्याच्या राजकारणात जम बसवू पहाणाऱया ‘आम आदमी पक्षा’त सद्या राजीनामा सत्र सुरू झाल्याने, या पक्षाला धक्के बसू लागले आहे. हे राजीनामा सत्र नेमके का सुरू झाले हे स्पष्ट झाले नसले तरी काल पक्षाचे दक्षिण गोवा निमंत्रक रॉडनी आल्मेदा यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानतंर त्यावर भाष्य केले आहे. दिल्लीतील पक्षाचे काही पदाधिकारी व नेते गोव्यात येऊन आपल्या मर्जीनुसार कारभार हाताळत असल्याने आपण बाजूला होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे

गेल्या दोन दिवसामागेच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप पाडगांवकर यांनी सरचिटणीस पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यापूर्वी प्रदीप घाडी आमोणकर हे देखील ‘आप’ पासून दूर गेले होते. एल्विस गोम्स यांनी प्रदेश निमंत्रक पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतल्यापासून आपच्या स्थानिक पातळीवर अस्वस्था निर्माण झाली होती. त्यानंतर सद्या राजीनामा सत्र सुरू झाल्याने पक्षात खळबळ माजली आहे. हे राजीनामा सत्र लवकर थांबावे अशी ईच्छा देखील काही पदाधिकारी व्यक्त करताना आढळून येतात.

एल्विस गोम्स यांनी गोव्यात आम आदमी पक्षाची धुरा सुरवातीपासून सांभाळली होती. परंतु, तेच जेव्हा निमंत्रक पदापासून दूर गेले, तेव्हा त्यांच्या समर्थकात नाराजीचा सूर होता. एल्विस गोम्स यांना आपल्या कुंकळळी मतदारसंघात अधिक वेळ देता यावा यासाठी त्यांनी निमंत्रक पदापासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात होते. मात्र, काल रॉडनी आल्मेदा यांनी आपच्या अंतर्गत राजकारणावर प्रकाश टाकला आहे.

दिल्लीतील काही पदाधिकारी व नेते स्थानिक पातळीवर येऊन हस्तक्षेप करतात. स्थानिक पदाधिकाऱयांना विश्वासात घेतले जात नाही असे रॉडनी आल्मेदा यांनी म्हटले आहे. यामुळेच एल्विस गोम्स निमंत्रक पदापासून दूर गेल्याचा अंदाज आपचे कार्यकर्ते व्यक्त करतात. पूर्वी स्थानिक पातळीवर कोणता विषय हातात घ्यावा, त्यावर कोणती कृती करावी हे ठरविले जायचे. मात्र, दिल्लीतील काही पदाधिकारी सद्या गोव्यात तळ ठोकून आहेत व तेच निर्णय घेतात अशी माहिती सुद्धा पुढे आली आहे.

दिल्लीतील नेते व पदाधिकाऱयांनी गोवा फॉरवर्डचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई तसेच पर्वरीचे आमदार रोहन खवटे यांची भेट घेऊन त्यांना आपची ऑफर दिल्याचे सांगितले जात आहे. परंतु, विजय सरदेसाई यांनी आपण आपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रोहन खवटे यांनी मात्र, अद्याप आपली प्रतिक्रीया दिलेली नाही.

आम आदमी पक्षाने जिल्हा पंचायत निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, कोरोना महामारीमुळे ही निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे या पक्षाची नेमकी ताकद स्पष्ट झाली नाही. आत्ता आप विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करणार तोच पक्षाला सद्या राजीनामा सत्राने घेरले आहे. त्यामुळे पक्षात सद्या तरी खळबळ माजलेली आहे.

Related Stories

एलआयसी-लोकमान्य सोसायटी कराराचे नुतनीकरण

Amit Kulkarni

‘त्या’ जखमी युवकाचा मृत्यू

Amit Kulkarni

कांद्याने गाठली शंभरी

GAURESH SATTARKAR

मुंडकारी खटले जलदगतीने निकाली काढा

Omkar B

ड्रग्सचा नायनाट करण्यासाठी जनतेने पोलिसांना सहकार्य करावे

Amit Kulkarni

शाळेत विद्यार्थी-शिक्षकांच्या उपस्थितीचा घेणार मागोवा

Amit Kulkarni