आजपर्यंत चित्रपटांमध्ये पाहावयास मिळणारा यंत्रसैनिक किंवा फायटर रोबो आता प्रत्यक्षात अवतरला आहे. कानपूर येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) च्या संशोधक विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक आणि गणितीय समिकरणांच्या आधारे अशा यंत्रसैनिकाची निर्मिती यशस्वीरित्या करून दाखविली आहे. हा सैनिक एका सेकंदात पाच गोळय़ा झाडण्याची क्षमता राखतो. तसेच तो सहजगत्या शत्रुच्या दृष्टीलाही पडत नाही.


हा सैनिक केवळ जमिनींवरील शत्रू सैनिकांचा खात्मा करतो असे नाही तर आकाशातील ड्रोन्सचाही अचूक वेध घेतो. सध्या या यंत्रसैनिकाचा प्रोटोटाईफ बनविण्यात आला असून त्याचे उत्पादन सुरू करण्यास अजून काही वेळ लागणार आहे. प्रत्यक्ष युद्धभूमीवर या सैनिकाची कामगिरी कशी होते, हे कालांतराने समजले असले तरी भारताने असे यंत्रसैनिक बनविणाऱया अत्यंत मोजक्या देशांच्या पंगतीत आता भारताचाही समावेश झाला आहे, असे म्हणता येते.
या यंत्रसैनिकात अनेक छोटी-मोठी उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्यात लिडार हे महत्त्वाचे आहे. या उपकरणाच्या साहाय्याने प्रकाशाच्या दिशेने बऱयाच दूर अंतरावरील लक्षाचा वेध घेता येतो. याशिवाय लेझर लाईट, ऑटोमॅटीक बॅरल, थ्रीडी कॅमेरा, मायक्रोप्रोसेसर इत्यादी अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत. या यंत्रसैनिकावर आणखी काही प्रयोग होण्याची आवश्यकता असून त्याचे लवकरात लवकर उत्पादन सुरू करण्याचा विचार त्याच्या निर्मात्यांनी केला आहे.