Tarun Bharat

आयपीएलमधील सामने सहा केंद्रांवर होणार

वृत्तसंस्था/ मुंबई

आगामी आयपीएल स्पर्धेतील सामने मुंबई व पुणे या दोनच ठिकाणी व प्लेऑफ आणि अंतिम लढत अहमदाबाद येथे आयोजित करण्याची योजना बीसीसीआयने आखली होती. पण त्यात आता बदल केला असून स्पर्धेतील सामने भरविण्यासाठी सहा केंद्रांची त्यांनी निवड केली आहे.

बीसीसीआयने मुंबई, बेंगळूर, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद व दिल्ली या सहा केंद्रांची निवड यंदाच्या आयपीएलसाठी केली आहे. स्थानिक क्रिकेट संघटनेची अडचण लक्षात आल्याने त्यांनी हैदराबाद या केंद्राला वगळले असून त्याऐवजी दिल्लीची निवड केली असल्याचे समजते. महाराष्ट्र सरकारचे विविध मुद्यांवरून केंद्राशी मतभेद असले तरी त्यांनी वानखेडे स्टेडियमवर सामने भरविण्यास हिरवा कंदिल दाखविला आहे. मात्र हे सामने प्रेक्षकांशिवाय खेळविले जाणार आहेत. पुणेमध्ये इंग्लंडविरुद्धचे तीन वनडे सामने प्रेक्षकांविना खेळविले जाणार आहेत. तोच नियम मुंबईत होणाऱया आयपीएल सामन्यांसाठी राहणार आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदाची आयपीएल स्पर्धा एप्रिलच्या दुसऱया आठवडय़ात (11 एप्रिल) सुरू होणार असून जूनच्या पहिल्या आठवडय़ात (6 जून) त्याची सांगता होणार आहे. यातील काही सामन्यांना स्टेडियम क्षमतेच्या पन्नास टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. बीसीसीआयने हा निर्णय घेतला असला तरी त्यांनी यासंदर्भात प्रँचायजींशी अद्याप चर्चा केलेली नाही. मात्र अनधिकृतपणे त्यांना हे वृत्त समजल्यानंतर त्यांच्यात गोंधळ निर्माण झाला असून ते वेगवेगळी विधाने करीत आहेत. बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन या सहा केंद्रांवर कशा पद्धतीने करते आणि या केंद्रांवर जैवसुरक्षित कवच कसे तयार करते, हे पाहण्यासाठी काही प्रँचायजींनी प्रतीक्षा करण्याचे ठरविले आहे तर काही फ्रँचायजींना मात्र हा निर्णय पसंत पडलेला नाही. ‘खरोखरच हे भीतिदायक आहे. एक किंवा दोन केंद्रांवर सामने घेण्याचा आधीचा निर्णय याहून चांगला होता. मागील स्पर्धाही फक्त तीनच केंद्रांवर खेळविण्यात आली होती, हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे,’ असे एका प्रँचायजीचा प्रतिनिधी म्हणाला.

या स्पर्धेच्या आयोजनासाठी बीसीसीआय काय करणार आहे, हे पाहण्याची संघ व संघमालकांनी प्रतीक्षा करण्याचे ठरविले आहे. आठ प्रँचायजींची गट विभागणी करून केंद्रांनुसार त्यांचे आयोजन करण्याचा प्रस्ताव मंडळाने ठेवला आहे. या प्रस्तावनुसार एका गटातील सर्व संघ घरचे व बाहेरचे सामने एकाच ठिकाणी खेळल्यानंतर दुसऱया गटातील दुसऱया केंद्रावर सामने खेळण्यासाठी ते जाणार आहेत. ‘या स्पर्धेच्या रुपरेषेत कोणताही बदल होणार नाही. घरचे व प्रतिस्पर्ध्याच्या ठिकाणी सामने, हाच फॉरमॅट कायम राहणार असून प्रत्येक संघ घरच्या मैदानावर सात आणि प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर सात सामने खेळणार आहे. यानुसार एकूण 60 सामने आयोजित केले जाणार आहेत. संघांची गटवारी ही जैवसुरक्षित कवच तयार करणे सोपे जावे आणि गेंधळ कमी व्हावा, यासाठी करण्यात आली आहे,’ असे एका माहितगार सूत्राने सांगितले.

Related Stories

नसीम शाहचा ग्लोसेस्टरशायरशी करार

Patil_p

बार्सिलोनाचा मोठा विजय

Patil_p

क्रिकेट सामन्यादरम्यान अफगाणिस्तानात स्फोट

Patil_p

सौरव गांगुलीचा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

Patil_p

कोल्हापूर : स्नेहा, सायली शिकतायेत बॉक्सिंगचा पंच

Archana Banage

पाकची टी-20 मालिकेत विजयी सलामी

Patil_p