वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
यावर्षीची आयपीएल स्पर्धा आयोजित करण्यासाठी बीसीसीआय सर्व संभाव्य पर्यायांचा विचार करीत असून देशाबाहेर त्याचे आयोजन करण्याचा शेवटचा पर्याय त्यांच्यासमोर असेल.
‘मंडळ सर्व पर्यायांचा विचार करीत आहे. भारताबाहेर आयपीएल भरविण्याची वेळ आल्यास तेही केले जाईल, पण अखेरचा पर्याय म्हणून त्याचा अवलंब केला जाईल,’ असे बीसीसीआयमधील एका सूत्राने सांगितले. ‘यापूर्वीही आम्ही त्याचा अवलंब केलेला आहे. मात्र त्याचे आयोजन भारतातच करणे, याला आमचे प्राधान्य असेल,’ असेही या सूत्राने सांगितले.
यावर्षीची आयपीएल स्पर्धा 29 मार्चपासून सुरू होणार होती. पण कोरोनामुळे ती अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली. यापूर्वीही 2009 आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आणि 2014 मधील स्पर्धा भारत व संयुक्त अरब अमिरातमध्ये घेण्यात आली होती.
आयसीसीने ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 विश्वचषकाबाबत गुरुवारी देखील कोणताच निर्णय घेतला नाही. आता 10 जूनला त्यावर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचा आधार घेत सूत्राने सांगितले की, ‘ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱया विश्वचषक स्पर्धेबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे स्थिती स्पष्ट होईपर्यंत आयपीएल समिती प्रतीक्षा करणार आहे आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेणार आहे’.