ऑनलाईन टीम
आयपीएल 2020 मध्ये सनरायझर्स हैदराबादला धक्का देत दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक दिली आहे. त्यामुळे आता मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली मुंबईला भिडणार आहे. दुबईत मंगळवार दि. 10 नोव्हेंबर रोजी हा अंतिम सामन्याचा थरार होणार आहे.
तत्पूर्वी, आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय योग्य ठरवत सलामीवीर शिखर धवन आणि मार्क स्टॉयनिस यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी पॉवर प्लेच्या षटकांत ६५ धावा कुटल्या. धवनने ५० चेंडूत ७८ धावा फटकावल्याने संघाला २० षटकांत १८९ धावांपर्यंत मजल मारता आली.
प्रत्युत्तरात 190 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादला रबाडाने पहिला धक्का दिला. कर्णधार डेव्हीड वॉर्नर 2 धावांवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर मैदानात काहीसे स्थिरावलेल्या प्रियम गर्ग (17) आणि मनिष पांडे (21) यांना स्टॉयनिसने एकाच षटकात माघारी धाडले. एका बाजूला विल्यमसन फटकेबाजी करत होता. तर दुसरीकडे मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जेसन होल्डर 11 धावांवर बाद झाला.
युवा समदच्या साथीने विल्यमसनने महत्त्वपूर्ण भागिदारी करत अर्धशतक पूर्ण केले. परंतु, स्टॉनिसने विल्यमसनला रबाडाकडे झेल देण्यास भाग पाडले. एकोणिसाव्या षटकात रबाडाने चार चेंडूत तीन बळी घेत हैदराबादच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आणल्या. त्यामुळे हैदराबादला 17 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.


previous post
next post