Tarun Bharat

आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांना मुदतवाढ शक्य,

जूनमध्ये बैठक होणे शक्य नसल्याने दोन महिने पदावर राहणार, कॉलिन ग्रेव्हज होणार नवे अध्यक्ष

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

येत्या जूनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती अध्यक्षपदावरुन पायउतार होणे अपेक्षित असलेल्या शशांक मनोहर यांना त्यानंतरही आणखी दोन महिने मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष कॉलिन ग्रेव्हज हे आयसीसीचे पुढील अध्यक्ष असणार आहेत. पण, आयसीसीची बैठक होईतोवर शशांक मनोहर हेच अध्यक्षपदी असतील, हे स्पष्ट आहे.

यापूर्वीच्या रुपरेषेप्रमाणे जूनमध्ये आयसीसीची बैठक होणे अपेक्षित होते. पण, सध्याची परिस्थिती पाहता, ही बैठक होण्याची शक्यता खूपच कमी मानली जाते. शशांक मनोहर सध्या दुसऱयांदा आयसीसी अध्यक्षपदी कार्यरत आहेत. पण, पुन्हा एका टर्मसाठी प्रयत्न करण्याचा त्यांचा विचार नसल्याचे सूत्रांकडून कळते.

‘शशांक मनोहर अध्यक्षपदावरुन पायउतार होणार, हे निश्चित आहे. पण, जूनमधील वार्षिक सर्वसाधारण बैठक होणे कठीण असल्याने त्यांना किमान ऑगस्टमध्ये बैठक होईतोवर मुदतवाढ घ्यावी लागेल. ऑगस्टमध्ये आयसीसीचे नवे अध्यक्ष रुजू होतील’, अशी माहिती आयसीसी कार्यकारिणीतील एका सदस्याने गोपयिनयतेच्या अटीवर सांगितले.

बीसीसीआय सतर्क

शशांक मनोहर तिसऱया टर्मसाठी प्रयत्न करणार नाहीत, याची कुणकुण बीसीसीआयला आहे. पण, त्यांनी याबाबत काहीही मतप्रदर्शन करणे कटाक्षाने टाळले आहे. एरवी शशांक मनोहर व बीसीसीआय यांच्यात फारसे सौहार्दाचे संबंध नसल्याचे अनेक मुद्यावरुन दिसून आले आहे.

‘जोवर शशांक मनोहर अधिकृतरित्या आयसीसी अध्यक्षपदावरुन पायउतार होत नाहीत, तोवर किमान मी तरी त्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. जे डोळय़ांनी पाहू शकतो, त्यावरच विश्वास ठेवणे बरे असते. अद्याप ते आणखी एक टर्म कार्यरत राहू शकतात. त्यामुळे अंतिम क्षणी जर त्यांनी आयसीसी अध्यक्षपदावर कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला तर यामुळे वेगळीच कलाटणी मिळेल’, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱयाने नमूद केले.

‘इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडीज हे देश गेव्हज यांच्या उमेदवारीला पाठिंबा देतील. अगदी बीसीसीआयशी देखील ग्रेव्हज यांचा उत्तम स्नेह आहे. फक्त अद्याप बीसीसीआयने उघडपणे तशी भूमिका घेतलेली नाही’, असे मंडळातील सदस्याने नमूद केले.

शशांक मनोहर यांच्यापेक्षा ग्रेव्हज यांच्याशी उत्तम स्नेह राखणे शक्य होईल, असा बीसीसीआयचा होरा आहे. शशांक मनोहर यांनी भारताचे हित जपणे पसंत केले, अशी टीका येथे होण्याचेही कारण राहणार नाही. माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना अशा टीकेला यापूर्वी सामोरे जावे लागले होते.

पुरेसे पाठबळ नसल्याने इम्रान ख्वाजा यांची पिछेहाट

शशांक मनोहर यांचे वारसदार म्हणून हाँगकाँगचे इम्रान ख्वाजा यांचे नाव प्रारंभिक टप्प्यात आघाडीवर होते. पण, त्यांना आयसीसीच्या पूर्ण सदस्यांचा पुरेसा पाठिंबा मिळाला नसल्याचे समजते. त्यानंतर ग्रेव्हज यांचे नाव पुढे आले आणि त्यावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत आहेत. गेव्हज यांची ईसीबी अध्यक्षपदाची मुदत नोव्हेंबरमध्ये संपते. ईसीबीमध्ये ग्रेव्हज यांची जागा एफएचे माजी अध्यक्ष इयान व्हाटमोर घेतील, अशी चिन्हे आहेत.

Related Stories

विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबई अजिंक्य

Patil_p

आयपीएल समालोचन पॅनेलमध्ये संधी द्या : मांजरेकर

Patil_p

दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व सुने लुसकडे

Patil_p

राष्ट्रीय वेटलिफ्टिंग शिबिराच्या ठिकाणात बदल

Patil_p

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला सिंधू उपस्थित राहणार

Patil_p

एक महिन्याचे वेतन क्रीडामंत्र्यांकडून जाहीर

tarunbharat