Tarun Bharat

आयसीसी पुरस्कारांत कोहली, एलीस पेरीचे वर्चस्व

दोघेही ठरले दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, धोनीला ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’ पुरस्कार

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसीने सोमवारी जाहीर केलेल्या क्रीडा पुरस्कारांत भारताच्या विराट कोहलीने वर्चस्व गाजविले असून दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार त्याने पटकावला आहे. याशिवाय दशकातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कारही त्याला मिळाला आहे तर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची दशकातील ‘आयसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेट’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. महिलांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एलीस पेरीने तीनही पुरस्कार पटकावत क्लीन स्वीप साधले आहे.

2011 मध्ये इंग्लंड दौऱयातील नॉटिंगहॅम कसोटीत इयान बेल विचित्र पद्धतीने धावचीत झाला होता. पण कर्णधार धोनीने त्याला पुन्हा फलंदाजीस बोलावण्याचा दिलदारपणा दाखविला होता. त्याच्या या कृत्याला चाहत्यांनी पसंती दिल्याने त्याची स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कारासाठी निवड झाली. आयसीसीने पुरस्कार विजेत्यांची घोषणा ट्विटरच्या माध्यमातून केली. सर्वोच्च पुरस्कारासाठी त्यांनी कोहलीची निवड केली. पुरस्कारासाठी नियोजित केलेल्या कालावधीत कोहलीने 70 पैकी 66 आंतरराष्ट्रीय शतके नोंदवण्याचा पराक्रम केला आहे. याच कालावधीत त्याने सर्वाधिक अर्धशतके (94), सर्वाधिक धावा (20396) जमविताना 56.97 ही सर्वोच्च सरासरीही राखली. 70 हून अधिक डाव खेळलेल्यांचा यासाठी विचार करण्यात आला होता.

32 वर्षीय कोहलीने वनडेमध्ये 12040, कसोटीमध्ये 7318, टी-20 मध्ये 2928 धावा जमविताना प्रत्येक प्रकारात 50 हून अधिक धावांची सरासरी राखली आहे. 2011 मध्ये विश्वचषक जिंकणाऱया भारतीय संघाचाही तो सदस्य होता. दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्काराच्या शर्यतीत रविचंद्रन अश्विन, इंग्लंडचा जो रूट, लंकेचा कुमार संगकारा, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, द.आफ्रिकेचा एबी डीव्हिलियर्स, न्यूझीलंडचा केन विल्यम्सन यांचाही समावेश होता.

‘हा पुरस्कार मिळणे हा माझा सर्वात मोठा सन्मान असून 2011 मधील विश्वचषक जेतेपद, 2013 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद आणि 2018 मधील ऑस्ट्रेलियातील मालिकाविजय हे या दशकातील माझे सर्वात संस्मरणीय क्षण आहेत,’ अशा भावना कोहलीने व्यक्त केल्या. विशेष म्हणजे आयसीसीने निवडलेल्या दशकातील तिन्ही सर्वोत्तम संघात स्थान मिळविणारा कोहली हा विश्वातील एकमेव क्रिकेटपटू आहे. याशिवाय त्याला सर्वोत्तम कसोटी संघाचा कर्णधार म्हणूनही निवडण्यात आले. वनडे पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्यात 10,000 हून अधिक धावा करणारा कोहली हा एकमेव फलंदाज असून 39 शतके, 48 अर्धशतकांसह त्याने 61.83 धावांची सरासरी राखली आहे.

ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीतील प्रमुख आधारस्तंभ असणाऱया स्टीव्ह स्मिथला दशकातील सर्वोत्तम कसोटीपटू आणि अफगाणिस्तानच्या रशिद खानला दशकातील सर्वोत्तम टी-20 क्रिकेटपटू पुरस्कारासाठी आयसीसीने निवडले आहे. महिलांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एलीस पेरीने तीनही पुरस्कार पटकावले आहेत. दशकातील सर्वोत्तम  महिला क्रिकेटपटू, दशकातील सर्वोत्तम वनडे व टी-20 क्रिकेटपटू असे हे तीन पुरस्कार आहेत.

आयसीसी पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू : विराट कोहली, भारत

सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू : एलीस पेरी, ऑस्ट्रेलिया

दशकातील सर्वोत्तम कसोटीपटू : स्टीव्ह स्मिथ, ऑस्ट्रेलिया

दशकातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू : विराट कोहली

दशकातील सर्वोत्तम वनडे महिला क्रिकेटपटू : एलीस पेरी

दशकातील सर्वोत्तम टी-20 क्रिकेटपटू : रशिद खान, अफगाणिस्तान

दशकातील सर्वोत्तम महिला टी-20 क्रेकेटपटू : एलीस पेरी

दशकातील सर्वोत्तम असोशिएट क्रिकेटपटू : काईल कोएत्झर

दशकातील सर्वोत्तम असोशिएट महिला क्रिकेटपटू : कॅथरीन ब्राईस

दशकातील स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार : महेंद्रसिंग धोनी, भारत.

Related Stories

ब्राझीलच्या दमदार विजयात रिचर्लिसनची हॅट्ट्रिक

Amit Kulkarni

सुमीत नागल दुसऱया फेरीत

Patil_p

भारतीय महिला संघाची विजयी सलामी

Patil_p

डेल स्टीन कँडी टस्कर्समध्ये दाखल

Omkar B

मेदव्हेदेव, सिटसिपेस उपांत्य फेरीत

Patil_p

विश्व वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर

Patil_p