Tarun Bharat

आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप आजपासून

Advertisements

न्यूझीलंड-विंडीज यांच्यात रंगणार सलामीची लढत : भारत पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत तर ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा अजिंक्यपदासाठी फेवरीट

वृत्तसंस्था /माऊंट माऊंगनुई

न्यूझीलंड-विंडीज यांच्यातील सलामी लढतीने आजपासून (शुक्रवार दि. 4) आयसीसी महिला वनडे विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होत आहे. न्यूझीलंडने अलीकडेच झालेल्या मालिकेत भारताचा 4-1 असा फडशा पाडला असून दुसऱया सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड देत आपण वर्ल्डकपसाठी पूर्ण सुसज्ज असल्याचा दाखला दिला. त्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल. दोन्ही संघातील सलामी लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6.30 वाजता खेळवली जाणार आहे.

सध्याच्या वनडे मानांकन यादीत न्यूझीलंडचा संघ पाचव्या स्थानी फेकला गेला आहे. मात्र, या संघाची कर्णधार सोफी डिव्हाईन हिने आपला संघ दि. 3 एप्रिल रोजी होणाऱया फायलनमध्ये निश्चितपणाने खेळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

भारतीय संघातर्फे मिताली राज आपला शेवटचा वर्ल्डकप खेळत असून दोनवेळा हुलकावणी देणाऱया जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याचा संघाचा प्रयत्न असेल. इंग्लंडची हिदर नाईट जगज्जेतेपद कायम राखण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल तर मेग लॅनिंग ऑस्ट्रेलियाला विक्रमी सातवे जेतेपद मिळवून देण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरणे अपेक्षित आहे.

यंदाची ही वर्ल्डकप स्पर्धा लीग पद्धतीने खेळवली जाणार असून सर्व आठ संघ परस्पराविरोधात प्रत्येकी एक सामना खेळतील आणि साखळी फेरीअखेर पहिले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. 2017 मधील मागील आवृत्तीत व त्यापूर्वी 2005 मध्ये फायनलपर्यंत धडक मारणारा भारतीय महिला संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. 2000 साली विजेता ठरलेला न्यूझीलंडचा संघ विंडीजविरुद्ध सलामी लढतीत खेळणार आहे.

आजवर सहा वेळा विजेता ठरलेला सर्वात यशस्वी संघ ऑस्ट्रेलिया विद्यमान विजेत्या इंग्लंडविरुद्ध पहिली लढत खेळेल. इंग्लंडने आजवर 4 वेळा या स्पर्धेत जेतेपद संपादन केले आहे. महिनाभर चालणाऱया या स्पर्धेत युवा व अनुभवी खेळाडू एकत्रित येत असून मिताली राज, झुलन गोस्वामी, सुझी बेट्स व मेगन स्कटसारख्या दिग्गज खेळाडूंसह शफाली वर्मा, रिचा घोष, प्रॅन जोन्स व डॅर्सी ब्राऊन यांच्याकडून बहारदार खेळाची अपेक्षा आहे.

(थेट प्रक्षेपण :  स्टार स्पोर्ट्स नेटवर्क)

सहभागी संघ आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा…

ऑस्ट्रेलिया : 2017 मध्ये भारताविरुद्ध सेमीफायनलमधील धक्कादायक पराभवाचा वचपा काढण्याची महत्त्वाकांक्षा! उत्तम फॉर्म हेच सध्याचे बलस्थान. मागील 30 वनडेत फक्त एकच पराभव!

भारत : मागील आवृत्तीतील उपजेता भारत यंदा जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी महत्त्वाकांक्षी! कर्णधार मिताली व अनुभवी झुलन गोस्वामी यांच्यासाठी हा शेवटचा वर्ल्डकप! साहजिकच, जेतेपदाने कारकिर्दीचा समारोप करण्याचा दृढनिश्चय!

इंग्लंड : स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ ही इंग्लिश महिला संघाची खरीखुरी ओळख! इंग्लंड विद्यमान विजेते असून यंदाही जेतेपद कायम राखण्याच्या निर्धारानेच ते मैदानात उतरत राहतील!

न्यूझीलंड : न्यूझीलंडमधील मागील विश्वचषक 22 वर्षांपूर्वी भरवण्यात आला आणि या संघाने त्यावेळी इतिहासातील आजवरचे एकमेव जेतेपद नोंदवले. यंदा पुन्हा एकदा वर्ल्डकप मायभूमीत होत असताना पुन्हा एकदा हा संघ जगज्जेतेपदावर आपली मोहोर उमटवण्यासाठी सज्ज असेल!

द. आफ्रिका : विंडीज, पाकिस्तान व भारताविरुद्ध सातत्याने मालिकाविजय संपादन करत या संघाने आता वर्ल्डकप जिंकणे हाच आपला प्राधान्यक्रम असेल, असा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. जागतिक स्तरावरील सर्वात वेगवान महिला गोलंदाज शबनीम इस्माईल याच संघाचे प्रतिनिधीत्व करते!

विंडीज : गतवर्षी कोव्हिड-19 मुळे पात्रता फेरी रद्द करावे लागल्यानंतर विंडीजने सरस वनडे मानांकनाच्या आधारे वर्ल्डकपमध्ये आपले स्थान निश्चित केले. 2013 मध्ये उपजेतेपद ही या संघाची आजवरची सर्वोच्च कामगिरी. ऑफस्पिनर अनिसा मोहम्मद पाचव्यांदा वर्ल्डकप खेळेल.

पाकिस्तान : आजवर 4 वेळा वर्ल्डकप खेळलेला पाकिस्तानचा संघ तीनवेळा तळाच्या स्थानीच राहिला आहे. 2009 मध्ये पाचवे स्थान मिळवले, ही त्यांची वर्ल्डकपमधील आजवरची सर्वोत्तम कामगिरी! कर्णधार बिस्माह मारुफ व डावखुरी सीमर नश्रा सुंधू हे या संघाचे महत्त्वाचे खेळाडू!

बांगलादेश : हा संघ यंदा प्रथमच महिला विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. सरस वनडे मानांकनाच्या आधारे या संघाला पात्रता मिळवता आली. निगार सुल्ताना या संघाची कर्णधार असेल. फलंदाजी व यष्टीरक्षणाच्या आघाडीवर तिच्याकडून बांगलादेश संघाला महत्त्वपूर्ण योगदानाची अपेक्षा असणार आहे!

थोडेसे स्पर्धेविषयी…..सहभागी संघ : 8

यंदा 8 संघ या स्पर्धेत सहभागी होत असून न्यूझीलंडला यजमान देश या नात्याने थेट प्रवेश मिळाला. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व भारत यांनी पहिल्या पाचमधील मानांकनाच्या आधारे पात्रता संपादन केली. पात्रता फेरी न झाल्याने उर्वरित मानांकनाच्या आधारेच तीन संघ निश्चित झाले.

पात्रता फेरी नसतानाही तीन संघ कसे निश्चित झाले?

कोरोनामुळे प्रवासावर निर्बंध असल्याने या स्पर्धेतील पात्रता फेरीचे सामने पूर्ण होऊ शकले नाहीत. झिम्बाब्वेमध्ये नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये सदर सामने होणे अपेक्षित होते. त्यानंतर उर्वरित 3 संघ सरस मानांकनाच्या आधारे निश्चित केले गेले. पाकिस्तान, विंडीज व बांगलादेश हे तीन देश यावेळी सरस ठरले. श्रीलंका, थायलंड व आयर्लंडचे संघ यावेळी बाहेर फेकले गेले. बांगलादेशने वर्ल्डकप खेळण्याची ही पहिली वेळ आहे.

स्पर्धेतील महत्त्वाचे सामने कोणते?

   भारत-पाकिस्तान महिला संघात दि. 6 रोजी होणारी लढत मुख्य आकर्षण केंद्र असेल. याशिवाय, दि. 13 मार्च रोजी न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया, दि. 28 मार्च रोजी भारत-द. आफ्रिका हे साखळी फेरीतील सामने महत्त्वाचे असतील. या स्पर्धेतील महत्त्वपूर्ण अशा पहिल्या दोन उपांत्य लढती अनुक्रमे 30 व 31 मार्च रोजी होतील. त्यानंतर जेतेपदाचा फैसला दि. 3 एप्रिल रोजी होणार आहे.

असा असेल स्पर्धेचा फॉरमॅट

2019 आयसीसी पुरुष वनडे वर्ल्डकपच्या धर्तीवरच महिला गटातील ही स्पर्धा खेळवली जाईल. सर्व संघ परस्परांविरोधात प्रत्येकी एक सामना खेळतील आणि पहिले 4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पहिल्या चारमध्ये 1 विरुद्ध 4 व 2 विरुद्ध 3 अशा उपांत्य फेरीच्या लढती होतील. यातील विजयी संघ फायनलमध्ये जेतेपदासाठी आमनेसामने उभे ठाकतील.

असे असेल गुणांकन

   विजयी संघाला 2 गुण तर सामना टाय झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. साखळी फेरीत सामना टाय झाल्यास सुपरओव्हर खेळवला जाणार नाही. साखळी फेरीनंतर गुणांच्या आधारावर टाय असल्यास सरस धावगतीचा निकष लावला जाईल. सरस धावगतीमध्येही बरोबरी असल्यास दोन्ही संघातील लढतीतील विजेत्या संघाचा निकष अंतिम मानला जाईल. 2019 पुरुष वनडे वर्ल्डकपमधील वादग्रस्त बाऊन्ड्री काऊन्टचा निकष येथे लावला जाणार नाही. सेमीफायनल किंवा फायनल टाय झाल्यास सुपरओव्हर खेळवले जाईल.

स्पर्धेची 6 केंद्रे

न्यूझीलंडमधील 6 स्टेडियमवर स्पर्धेतील 31 सामने खेळवले जाणार आहेत. ऑकलंडमधील ईडन पार्क, ख्राईस्टचर्चमधील हॅग्ले ओव्हल, डय़ुनेडिनमधील युनिव्हर्सिटी ओव्हल, हॅमिल्टनमधील सेडॉन पार्क, माऊंट माऊंगनुई येथील बे ओव्हल, वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्हचा यात समावेश आहे.

डीआरएसविषयी

यंदा महिला वर्ल्डकपमध्ये दुसऱयांदा डीआरएसचा अवलंब केला जाणार आहे. सर्व संघांना प्रत्येक डावात 2 डीआरएस घेता येतील. यापूर्वी 2017 मधील आवृत्तीतही डीआरएस उपलब्ध होते. पण, काही मोजक्या सामन्यात त्याचा अवलंब केला गेला होता.

वैयक्तिक स्तरावरील विश्वविक्रमाविषयी….

मिताली राज आजवर खेळवल्या गेलेल्या सर्वच्या सर्व 6 वर्ल्डकपमध्ये खेळण्याचा पराक्रम गाजवणारी पहिलीवहिली खेळाडू ठरण्यासाठी सज्ज झाली आहे. मितालीला वर्ल्डकपमध्ये सर्वोच्च धावांचा डेबी हॉकलीचा विक्रम मोडीत काढण्यासाठी आणखी 362 धावांची आवश्यकता आहे. सध्या मितालीच्या खात्यावर 1139 धावा नोंद आहेत. गोलंदाजीत झुलन गोस्वामीच्या खात्यावर वर्ल्डकपमध्ये 36 बळी नोंद असून विश्वविक्रमासाठी तिला आणखी 4 बळींची आवश्यकता आहे.

महिला वर्ल्डकप स्पर्धेचा इतिहास

 • वर्ष             विजेते              उपविजेते         फायनलचे ठिकाण
 • 1973          इंग्लंड               ऑस्ट्रेलिया        एजबस्टन
 • 1978          ऑस्ट्रेलिया        इंग्लंड              हैदराबाद
 • 1982          ऑस्ट्रेलिया        इंग्लंड              ख्राईस्टचर्च
 • 1988          ऑस्ट्रेलिया        इंग्लंड              मेलबर्न
 • 1993          इंग्लंड               न्यूझीलंड          लंडन
 • 1997          ऑस्ट्रेलिया        न्यूझीलंड          कोलकाता
 • 2000          न्यूझीलंड          ऑस्ट्रेलिया        लिंकन
 • 2005          ऑस्ट्रेलिया        भारत              सेंच्युरियन
 • 2009          इंग्लंड               न्यूझीलंड          सिडनी
 • 2013          ऑस्ट्रेलिया        विंडीज             मुंबई
 • 2017    इंग्लंड    भारत    लंडन.

Related Stories

बजरंग पुनियाची उपांत्य फेरीत धडक

datta jadhav

आयसीसीकडून महिला क्रिकेटसाठी एफटीपीची घोषणा

Patil_p

एफसी इस्तिकलोलने पटकावला सुपर कप, खुजान्दवर मात

Patil_p

मुगुरुझा उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

भारताची फिडे ऑनलाईन ऑलिम्पियाड फायनलमध्ये धडक

Patil_p

बेंगळूरमध्ये नव्या क्रिकेट अकादमीचा शुभारंभ

Patil_p
error: Content is protected !!