Tarun Bharat

आयोजक म्हणतात, पुढील वर्षीही ऑलिम्पिक होणे कठीण!

टोकियो / वृत्तसंस्था

पुढील वर्षापर्यंतही कोव्हिड-19 च्या महामारीवर नियंत्रण राखता आले नाही तर लांबणीवर टाकली गेलेली ऑलिम्पिक स्पर्धा त्यावेळी देखील भरवता येणार नाही, असे टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी मंगळवारी म्हणाले. सध्याची जागतिक स्तरावरील परिस्थिती गंभीर असून त्या पार्श्वभूमीवर योशिरो यांनी सदर वक्तव्य केले. यापूर्वीच्या रुपरेषेप्रमाणे यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा 24 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणे अपेक्षित होते. पण, कोव्हिडच्या प्रकोपामुळे ती एका वर्षाने लांबणीवर टाकली गेली. नव्या रुपरेषेनुसार, सदर स्पर्धा पुढील वर्षी दि. 23 जुलैपासून सुरु होणार आहे.

एखाद्या परिस्थितीत ही स्पर्धा पुढील वर्षीही न झाल्यास आमच्याकडे कोणताही प्लॅन बी तयार नाही, असे आयोजन समितीने यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता पुढील वर्षी ही स्पर्धाच होणे कठीण असल्याचे संकेत अध्यक्षांच्या या वक्तव्यातून मिळाले.

जर 2021 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकली नाही तर ती 2022 पर्यंत लांबणीवर टाकली जाईल का, या प्रश्नावर बोलताना योशिरो यांनी नकारार्थी उत्तर दिले. जर पुढील वर्षी एखाद्या कारणामुळे ऑलिम्पिक होऊ शकत नसेल तर ते रद्द झाल्यासारखेच असेल, असे ते म्हणाले.

यापूर्वी फक्त महायुद्धाच्या वेळी ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करावी लागली होती, याची योशिरो यांनी येथे आठवण करुन दिली. जर कोव्हिड-19 महासंकटाचे थैमान वेळीच थोपवता आले, त्यावर पूर्ण विजय मिळवता आला तर पुढील हंगामात ऑलिम्पिक स्पर्धा निर्धोकपणे पार पडेल, याचा त्यांनी येथे उल्लेख केला.

प्रवक्त्याकडून प्रतिक्रियेस नकार

दरम्यान, टोकियो आयोजन समितीचे प्रवक्ते मासा तकाया यांनी स्पर्धा रद्द होण्याच्या शक्यतेवर काहीही प्रतिक्रिया देणे शिताफीने टाळले. योशिरो यांनी जे मत मांडले, ती त्यांची वैयक्तिक धारणा असू शकते, असे तकाया म्हणाले. अर्थात, या वक्तव्यामुळे पुढील वर्षीही ऑलिम्पिक होण्याबद्दल साशंकताच असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सध्याच्या घडीला आयोजक व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर ऍथलिट्स व विविध क्रीडा संघटनांचे प्रचंड दडपण आहे, हे सुद्धा दिसून येत आहे.

कोव्हिड-19 वर वेळीच लस शोधण्यात आली नाही तर पुढील वर्षी देखील ऑलिम्पिक स्पर्धा होणे अवघड असेल, असे जपान वैद्यकीय असोसिएशनने मंगळवारी स्पष्ट केले. 2021 मध्येही ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकणार नाही, असे मी अजिबात म्हणत नाही. पण, ही स्पर्धा भरवणे त्यावेळी देखील कठीण असू शकते, असे योशिताके योकोकुरा म्हणाले.

बरीच दिरंगाई अपेक्षित

कोबे विद्यापीठात साथीच्या रोगांवर संशोधन करणारे प्रो. केन्तारो ईवाता यांनी ही स्पर्धा पुढील वर्षी होणेही कठीण असल्याचा अंदाज येथे वर्तवला. ‘एकवेळ पुढील उन्हाळय़ापर्यंत कोव्हिडचा समूळ नायनाट करणे जपानला शक्य होईल. पण, जे जपानला शक्य होईल, ते जगातील प्रत्येक देशाला तोवर होईलच, असे छातीठोकपणे सांगण्याची स्थिती नाही. त्यामुळे, पुढील वर्षी ऑलिम्पिक होईल का, याबद्दल माझ्या मनात पूर्णपणे संदेह आहे’, असे ईवाता म्हणाले. अर्थात, जपानमध्ये देखील याबाबत संमिश्र मतप्रवाह असून त्यांच्या वैद्यकीय पथकाने पुढील वर्षाच्या स्थितीबद्दल आताच काही मत व्यक्त करणे घाईचे ठरेल, याचा उल्लेख केला.

जापनीज पदाधिकारी व आयवोसीने ही स्पर्धा कोरोना विषाणूविरुद्ध लढय़ातील विजयाचा उत्सव असेल, अशी भूमिका यापूर्वी मांडली. काहींनी तर उद्घाटन सोहळय़ात कोव्हिडविरुद्ध विजयाचे प्रतिबिंब उमटवता येईल, अशीही सूचना मांडली. पण, अद्याप या सर्व बाबींना बराच अवधी असल्याचे स्पर्धा लांबणीवर टाकली गेल्यानंतर स्पष्ट झाले.

खर्चाला फाटा देण्यासाठी ऑलिम्पिक-पॅरालिम्पिकचे सोहळे एकत्र?

एकवेळ स्पर्धा होऊ शकल्यास उद्घाटन सोहळा व सांगता सोहळा स्वतंत्रपणे न आयोजित करता एकच सोहळा आयोजित केला जावा, असा विचार आयोजन समितीत सुरु होता. ऑलिम्पिक व पॅरालिम्पिकचा संयुक्त सोहळा, हा देखील
खर्च कमी करण्याचा पर्याय म्हणून विचाराधीन आहे. पण, कोव्हिडचे थैमान लवकर संपुष्टात आणता आले तरच हे सर्व प्रत्यक्षात आणता येणार आहे. तूर्तास, या प्रस्तावाबद्दल आयवोसी व पॅरालिम्पिक कमिटीशी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही, हे देखील तितकेच खरे आहे.

आयोजन समितीला वाढीव खर्च पेलणार का?

सध्या स्पर्धा लांबणीवर टाकली गेली असली तरी यामुळे जी आर्थिक अरिष्टे सोसावी लागतील, ती कोटय़वधीच्या घरात पोहोचणारी असणार आहेत. त्यामुळे अर्थातच तो खर्च पेलणे आयोजन समितीसाठी मोठे आव्हान असेल, असे संकेत आहेत. या घडीला स्पर्धा लांबणीवर टाकल्यामुळे खर्चात किती वाढ होऊ शकेल, याचे ठोकताळे देखील आयोजन समितीकडे नाहीत. त्यामुळे, वाढीव खर्च त्यांना पेलणार का, याचेही उत्तर त्यांच्याकडे सध्या नाही.

Related Stories

अफगाण-झिंबाब्वे कसोटी मालिका बरोबरीत

Patil_p

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा लांबणीवर

Patil_p

क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर कोरोनामुक्त

Patil_p

बलबिर सिंग सिनियर यांना राष्ट्रीय सन्मान मिळावा

Patil_p

मँचेस्टर युनायटेडचा निसटता विजय

Patil_p

महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत-इंग्लंड सामना आज

Patil_p