Tarun Bharat

आरपीएन इफेक्ट, स्वामीप्रसादांनी बदलला मतदारसंघ

सुरक्षित मतदारसंघाचा शोध का मोठय़ा खेळीची तयारी?

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तापलेल्या राजकीय वातावरणादरम्यान भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश करणारे दिग्गज ओबीसी नेते स्वामीप्रसाद मौर्य यांनी स्वतःचा पारंपरिक मतदारसंघ बदलला आहे. समाजवादी पक्षाने पडरौनाऐवजी फाजिलनगर मतदारसंघात त्यांना उमेदवारी दिली आहे. परंतु स्वामीप्रसाद यांनी स्वतःचा मतदारसंघ सोडण्यामागे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आरपीएन सिंह हे महत्त्वाचे कारण असल्याचे मानले जात आहे. अशा स्थितीत स्वामीप्रसाद हे सहाव्यांदा विधानसभेत जाण्यास यशस्वी ठरतात की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

स्वामीप्रसाद यांच्या समाजवादी पक्षातील प्रवेशामुळे भाजपला मोठा राजकीय धक्का बसला होता. अशा स्थितीत भाजपने काँग्रेसमधून आरपीएन सिंह यांना आणून मास्टरस्ट्रोक केला होता. पडरौनाचे राजे आणि काँग्रेसचे मातब्बर नेते आरपीएन सिंह यांना स्वतःच्या गोटात आणण्यास भाजपला यश आले होते. याचमुळे पडरौनामधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. अशा स्थितीत अँटी इनकंबेंसी आणि लोकांची नाराजी ओळखून स्वामीप्रसाद यांनी स्वतःचा मतदारसंघ बदलण्याचे पाऊल उचलले आहे.

फाजिलनगर मतदारसंघ

स्वामीप्रसाद मौर्य यांनी फाजिलनगर मतदारसंघाची निवड केली असून तेथे 10 वर्षांपासून भाजप आमदार आहे. परंतु त्यापूर्वी हा मतदारसंघ समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला होता. फाजिलनगरची राजकीय समीकरणे स्वामीप्रसाद यांच्यासाठी अनुकूल ओत. येथे कुशवाह समुदायासह मुस्लीम मतदार निर्णायक भूमिकेत आहेत. येथील समीकरणे पाहूनच स्वामीप्रसाद यांनी पडरौना मतदारसंघ सोडून फाजिलनगरमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पडरौनामध्ये तीनवेळा विजयी झालेल्या स्वामीप्रसादांसाठी आरपीएन सिंह यांच्या भाजपप्रवेशामुळे मोठे संकट उभे राहिले होते. पडरौनामध्ये आरपीएन सिंह यांनाच भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

पडरौनाचे माजी आमदार

स्वामीप्रसाद यांच्यापूर्वी आरपीएन सिंह हे पडरौनाचे तीनवेळा आमदार राहिले आहेत. अशा स्थितीत हा भाग स्वामीप्रसाद यांच्याप्रमाणेच आरपीएन सिंह यांचाही गड आहे. आरपीएन हे स्थानिक नेते आहे. तर स्वामीप्रसाद हे मूळचे प्रतापगढचे आहेत. अशा स्थितीत पडरौनामध्ये आरपीएन सिंह यांना भाजपने उमेदवारी दिल्यास स्वामीप्रसाद यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले असते. याचमुळे स्वामी यांनी सुरक्षित मतदारसंघाची निवड केली आहे.

स्वामी प्रसाद हे सपच्या स्टार प्रचारकांपैकी एक आहेत. ओबीसी समुदायावर त्यांचा चांगला प्रभाव असल्याचे मानले जाते. स्वामी यांच्या माध्यमातून अखिलेश यादव हे भाजपच्या मतपेढीला सुरुंग लावू पाहत आहेत.

फाजिलनगरमध्ये भाजपचा आमदार

फाजिलनगर मतदारसंघात भाजपचे गंगा कुशवाह हे दोनदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. परंतु त्यापूर्वी सपचे दिग्गज नेते विश्वनाथ येथे आमदार होते. विश्वनाथ 6 वेळा या मतदारसंघातून मुस्लीम मतदारांच्या मदतीने आमदार म्हणून निवडून आले होते. गंगा कुशवाह यांनी स्वतःच्या कुशवाह मतपेढीच्या बळावर विश्वनाथ यांना पराभूत केले होते. स्वामीप्रसाद याच समुदायाशी संबंधित असल्याने त्यांना या मतदारसंघात उमेदवारी देत विजय मिळविण्याचा सपचा प्रयत्न आहे. या मतदारसंघात चनऊ आणि कुशवाह समुदायाचे प्रभुत्व आहे. तर मुस्लीम मतदार निर्णायक भूमिकेत आहेत. येथे सुमारे 90 हजार मुस्लीम मतदार आहेत. तर 55 हजार मौर्य-कुशवाह मतदार आहेत. तर 50 हजार यादव मतदार आहेत. याचबरोबर 80 हजार दलित तर 30 हजार ब्राह्मण मतदार आहेत. परंतु 30 हजार वैश्य आणि 28 हजार कुर्मी समुदायाचे मतदार आहेत.

Related Stories

जी-7 परिषदेमुळे बिथरला चीन

Patil_p

दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखणे आवश्यक

Patil_p

टोकियोमध्ये आणीबाणी लागू; प्रेक्षकांच्या अनुपस्थित होणार ऑलिम्पिक स्पर्धा

Archana Banage

सांबा : लष्कराच्या छावणीजवळ 4 संशयित ड्रोनचा वावर

datta jadhav

भटक्या श्वानांच्या हल्ल्यात चिमुरडय़ाचा मृत्यू

Patil_p

नरेंद्र चंचल यांचे दिल्लीत निधन

Patil_p
error: Content is protected !!