Tarun Bharat

आरपीडी कॉर्नरवरील खड्डा वाहनधारकांना धोकादायक

प्रतिनिधी /बेळगाव

शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी महापालिकेच्यावतीने कोटय़वधीचा निधी खर्ची घातला जात आहे. पण रस्त्यांचे डांबरीकरण केलेल्या काही दिवसातच विद्युत वाहिन्या, मोबाईल केबल, जलवाहिनी घालण्यासाठी किंवा जलवाहिनी गळती काढण्यासाठी अशा विविध कारणास्तव रस्त्यांवर खोदाईसत्र आरंभले जाते. परिणामी रस्त्यांची स्थिती पुन्हा जैसे थे होत आहे. खानापूर रोडवर आरपीडी कॉर्नर येथे निर्माण झालेला खड्डा वाहनधारकांना अपघातास कारणीभूत ठरत आहे.

शहर आणि उपनगरांतील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध निधीअंतर्गत कोटय़वधीचा निधी खर्ची घातला जातो. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यांचा विकास करण्यासाठी कोटय़वधी निधी खर्च करण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात खर्ची घालण्यात आलेल्या निधीप्रमाणे रस्त्यांची देखभाल केली जात नाही. यामुळे रस्त्यांची दुरवस्था होत असल्याने वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. आरपीडी कार्नरवर रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा निर्माण झाला आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्याने खड्डा बुजविण्याची गरज आहे.

लॉकडाऊनमुळे शहरात वाहनांची वर्दळ कमी होती. पण अलीकडे अनलॉक झाल्याने वाहनांची वर्दळ या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. पावसामुळे खड्डय़ात पाणी साचून राहत आहे. यामुळे वाहनधारकांना खड्डय़ाच्या खोलीचा अंदाज येत नाही. याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे वाहनधारकांना धोकादायक बनला आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही याची दखल घेण्यात आली नसल्याने या ठिकाणी मोठा अनर्थ घडण्याची प्रतीक्षा महापालिकेचे अधिकारी करीत आहेत का, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. वाहनांना अपघात होऊ नये याकरिता नागरिकांनी खड्डय़ाभोवती बॅरिकेड्स ठेवले आहेत.

महापालिकेच्या अधिकाऱयांकडे अनेकवेळा तक्रार

आरपीडी कॉर्नरवर बसथांब्याच्या ठिकाणी मोठा खड्डा पडला असल्याने वाहनधारकांना वाहने चालविणे मुश्कील बनले आहे. खड्डा असल्याची बाब वाहनधारकांच्या लक्षात येत नाही. चौकात खड्डा असल्यामुळे या ठिकाणी अपघात होत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱयांकडे अनेकवेळा तक्रार करण्यात आली. पण याची दखल घेण्यात आली नसल्याने नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे रस्त्यांवरील धोकादायक खड्डे बुजविण्याची दखल महापालिका केव्हा घेणार, असा प्रश्न नागरिक करीत आहे. धोकादायक खड्डे बुजविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

Related Stories

आप्पाचीवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध

Patil_p

नाथाजीराव हलगेकर डेंटल कॉलेजचे यश

Amit Kulkarni

क्रिकेट मास्टर, सिद्धकला, शहापूर स्पोर्ट्स, साईराज संघ विजयी

Amit Kulkarni

काहेरतर्फे पर्यावरण दिन साजरा

Amit Kulkarni

महिला आघाडीतर्फे तिळगूळ समारंभ उत्साहात

Amit Kulkarni

जिल्हय़ातील 17 मंदिरांवर विश्वस्तांची होणार नेमणूक

Amit Kulkarni
error: Content is protected !!