Tarun Bharat

आरसीबी जिंकली…चर्चा तर होणारच!

Advertisements

राजस्थान रॉयल्सचा 10 गडी राखून एकतर्फी फडशा, देवदत्त पडिक्कलचे 51 चेंडूतच शतक, विराट कोहलीसह 181 धावांची अभेद्य भागीदारी

वृत्तसंस्था / मुंबई

दस्तुरखुद्द विराट कोहलीची खेळी देखील झाकोळून जाईल, असे तडफदार शतक साकारणाऱया देवदत्त पडिक्कलच्या अवघ्या 52 चेंडूतील झंझावातामुळे आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा तब्बल 10 गडी राखून फडशा पाडला आणि या मोसमातील सर्वात एकतर्फी निकालाची नोंद केली. प्रारंभी, राजस्थानला 20 षटकात 9 बाद 177 धावांवर रोखल्यानंतर विराट व देवदत्त या सलामीवीरांनीच आरसीबीला एकहाती विजय संपादन करुन दिला. आरसीबीचा हा या मोसमातील सलग चौथा विजय ठरला.

देवदत्त पडिक्कलने 52 चेंडूत 11 चौकार, 6 षटकारांसह नाबाद 101 तर विराट कोहलीने 47 चेंडूत 6 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 72 धावांचे योगदान दिले.  एरवी विराट क्रीझवर असताना सहकारी फलंदाज त्याला परस्परपूरक साथ देत असतो. पण, येथे चित्र उलटे दिसून आले. येथे देवदत्त आक्रमक भूमिकेत होता आणि विराट त्याला पूरक साथ देत होता. या जोडीने चौफेर फटकेबाजीचा पहिल्या चेंडूपासूनच सिलसिला सुरु केला आणि 16.3 षटकात विजय संपादन केल्यानंतरच त्यांच्या चित्ती खऱया अर्थाने समाधान पसरले.

पडिक्कलच्या बॅटीतून जे षटकार बाहेर पडले, त्यात ताकदीपेक्षाही टायमिंगचा अधिक वाटा होता. त्याने मुस्तफिजूर रहमानला पूलवर फटकावलेला षटकार तर डोळय़ाचे पारणे फेडणारा ठरला. रियान परागला एक्स्ट्रा कव्हरवरुन फटकावत त्याने 27 चेंडूत अर्धशतक साजरे केले आणि नंतर आणखी 24 चेंडूत 50 धावा फटकावत शतकही थाटात साजरे केले. एकीकडे, पडिक्कल उत्तुंग फटकेबाजी करत असताना विराटने देखील खराब चेंडूंचा समाचार घेण्याची एकही संधी सोडली नाही. रॉयल्सचा सर्वात महागडा खेळाडू ख्रिस मॉरिसला विराटने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेचलेला षटकार क्लास दाखवून देणारा होता. कोहलीने 34 चेंडूत या सामन्यातील अर्धशतक साजरे केले आणि आयपीएल इतिहासातील वैयक्तिक 6 हजार धावांचा माईलस्टोनही सर केला.

दुबे-तेवातियाची फटकेबाजी

शिवम दुबे (32 चेंडूत 46) व राहुल तेवातिया (23 चेंडूत 40) यांच्या जोरदार फलंदाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 9 बाद 177 धावांपर्यंत मजल मारली. प्रारंभी खराब सुरुवात झाल्यानंतरही त्यांनी पावणेदोनशे धावांचा टप्पा सर करणे स्पृहणीय ठरले.

आरसीबीने नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थानला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय पहिल्या टप्प्यातच सार्थ ठरवला. जोस बटलर (8) व मनन वोहरा (7) हे राजस्थानचे दोन्ही सलामीवीर अवघ्या 16 धावांमध्येच तंबूत परतले. सहकारी सलामीवीर मनन वोहरा काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर मिडऑनवरुन फटका मारण्याच्या प्रयत्नात रिचर्डसनकडे सोपा झेल देत तंबूत परतला. डेव्हिड मिलर तर आपल्या दुसऱयाच चेंडूवर पायचीत झाला. वास्तविक, सिराजच्या गोलंदाजीवर मैदानी पंचांनी मिलरला नाबाद ठरवले होते. पण, कर्णधार विराटने या निर्णयावर रिव्हय़ू घेतला आणि रिप्लेमध्ये तो बाद असल्याचे दिसून आले. साहजिकच, मैदानी पंचांना आपला निर्णय फिरवावा लागला. मिलर  भोपळाही फोडू शकला
नाही.

सलग 3 चेंडूंवर 3 फलंदाज बाद, तरीही हॅट्ट्रिक नाही!

राजस्थान रॉयल्सच्या डावात राहुल तेवातिया, ख्रिस मॉरिस व चेतन साकारिया हे 3 फलंदाज सलग 3 चेंडूंवर बाद झाले. पण, यातील तेवातिया 19 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर तर मॉरिस व साकरिया 20 व्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर बाद झाले असल्याने सलग 3 चेंडूंवर 3 फलंदाज बाद होऊनही हॅट्ट्रिकचा मान कोणत्याच गोलंदाजाकडे आला नाही. यातील 19 वे षटक सिराजने तर 20 वे षटक हर्षल पटेलने टाकले होते.

धावफलक

राजस्थान रॉयल्स : जोस बटलर त्रि. गो. मोहम्मद सिराज 8 (8 चेंडूत 2 चौकार), मनन वोहरा झे. रिचर्डसन, गो. जेमिसन 7 (9 चेंडूत 1 चौकार), संजू सॅमसन झे. मॅक्सवेल, गो. वॉशिंग्टन सुंदर 21 (18 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), डेव्हिड मिलर पायचीत गो. सिराज 0 (2 चेंडू), शिवम दुबे झे. मॅक्सवेल, गो. रिचर्डसन 46 (32 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), रियान पराग झे. चहल, गो. पटेल 25 (16 चेंडूत 4 चौकार), राहुल तेवातिया झे. शाहबाज, गो. सिराज 40 (23 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), ख्रिस मॉरिस झे. चहल, गो. पटेल 10 (7 चेंडूत 1 षटकार), श्रेयस गोपाल नाबाद 7 (4 चेंडूत 1 चौकार), चेतन साकारिया झे. डीव्हिलियर्स, गो. पटेल 0 (1 चेंडू), मुस्तफिजूर रहमान नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 13. एकूण 20 षटकात 9 बाद 177.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-14 (बटलर, 2.3), 2-16 (वोहरा, 3.5), 3-18 (मिलर, 4.3), 4-43 (संजू सॅमसन, 7.2), 5-109 (रियान, 13.3), 6-133 (दुबे, 15.3), 7-170 (तेवातिया, 18.6), 8-170 (मॉरिस, 19.1), 9-170 (साकारिया, 19.2).

गोलंदाजी  ः मोहम्मद सिराज 4-0-27-3, काईल जेमिसन 4-0-28-1, केन रिचर्डसन 3-0-29-1, यजुवेंद्र चहल 2-0-18-0, वॉशिंग्टन सुंदर 3-0-23-1, हर्षल पटेल 4-0-47-3.

आरसीबी : विराट कोहली नाबाद 72 (47 चेंडूत 6 चौकार, 3 षटकार), देवदत्त पडिक्कल नाबाद 101 (52 चेंडूत 11 चौकार, 6 षटकार). अवांतर 8. एकूण 16.3 षटकात बिनबाद 181.

गोलंदाजी : श्रेयस गोपाल 3-0-35-0, चेतन साकरिया 4-0-35-0, ख्रिस मॉरिस 3-0-38-0, मुस्तफिजूर 3.3-0-34-0, राहुल तेवातिया 2-0-23-0, रियान पराग 1-0-14-0.

Related Stories

मानांकन यादीत बेलारूसची साबालेन्का सातव्या स्थानी

Patil_p

मोदी सरकारने कोरोना मृत्यूचे आकडे लपवले

Patil_p

बुमराहच्या विवाह सोहळय़ासाठी फक्त 20 निमंत्रित!

Patil_p

भारत-इंग्लंड यांच्यात पाच टी-20 सामने होणार

Patil_p

नाना पाटेकरंचा तरुणाईशी दिलखुलास संवाद

Patil_p

रिचर्डसनला ऑलिम्पिक हुकणार

Patil_p
error: Content is protected !!