Tarun Bharat

आरिदानेच्या गोलमुळे हैदराबाद एफसीने ईस्ट बंगालला बरोबरीत रोखले

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

आयएसएल फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेली हैदराबाद एफसी आणि एससी ईस्ट बंगाल यांच्यातील लढत 1-1 अशी बरोबरीत संपली. हा सामना वास्कोतील टिळक मैदानावर खेळविण्यात आला.

कप्तान आरिदाने सांतानाने शेवटच्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे हैदराबाद एफसीने पराभवाच्या नामुष्कीतून आपली सुटका करून घेतली. त्यापूर्वी ब्राईट एनाबाखरेने गोल करून ईस्ट बंगालला आघाडी मिळवून दिली होती. या निकालाने उभय संघांना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. हैदराबाद एफसीचे आता 17 सामन्यांतून पाच विजय, नऊ बरोबरी आणि तीन पराभवाने 24 गुण झाले असून ते चौथ्या स्थानावरून आता तिसऱया स्थानावर गेले आहेत. एफसी गोवाचे 23 गुण असून ते आता चौथ्या स्थानावर आले आहेत. ईस्ट बंगाल एफसीचे 17 सामन्यांतून तीन विजय, आठ बरोबरी आणि सहा पराभवाने आता 17 गुण झाले असून ते नवव्या स्थानावर आहेत.

सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला हैदराबाद एफसीला गोल करण्याची नामी संधी होती. यावेळी लिस्टन कुलासोने घेतलेला फ्री-कीकवरील फटका गोलमध्ये जाताना किंचित चुकला. हैदराबादने प्रारंभीच्या खेळावर शॉर्ट पासेसचा अवलंब करून ईस्ट बंगालवर दबाव ठेवला. 21 व्या मिनिटाला ईस्ट बंगालसाठी गोलरक्षक सुब्रतो पॉलचा अनुभव पणास आला. हैदराबादच्या लुईस सास्त्रsने दिलेल्या पासवर जॉएल चियानीसेने हाणलेला फटका सुब्रोतोने चपळाईतेने अडवून संघावर होणारा संभाव्य गोल टाळला.

त्यानंतर 34 व्या मिनिटाला परत एकदा लिस्टन कुलासो, हालीचरण नझारी आणि जॉएल चियानीसेने रचलेल्या चालीवर लुईस सास्त्रेने गोल करण्याची सोपी संधी वाया घालविली. सामन्याच्या 40 व्या मिनिटाला हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणीने दोन वेळा ईस्ट बंगालचे गोल करण्याचे यत्न हाणून पाडले. या दोन्ही वेळी त्याने अंकीत मुखर्जीचे फटके अडविले. कट्टीमणीने दोन मिनिटानंतर परत एकदा अँथनी पिलकिंगटनने मारलेला शॉट पंच करून कॉर्नरसाठी टाकला.

दुसऱया सत्रातही दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. प्रथम मध्यंतरानंतर तीनच मिनिटांनी लिस्टन कुलासोच्या पासवर आरिदाने सांतानाने गोल करण्याची संधी गमविली. प्रत्युत्तरादाखल रचलेल्या चालीत ईस्ट बंगालच्या नारायण दासने दिलेल्या पासवर ब्राईट एनोबाखरेची सोपी संधी सदोष नेमबाजीमुळे वाया गेली. 59व्या मिनिटाला अँथनी पिलकिंगटनच्या पासवर ब्राईट एनोबाखरेने गोलरक्षक सुब्रोतो पॉलला भेदून गोल केला आणि एससी ईस्ट बंगालला आघाडीवर नेले.

सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला हैदराबाद एफसीच्या मोहम्मद यासिरला घिसाडघाईच्या खेळाबद्दल रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढण्यात आले. यानंतर हैदराबादने बरोबरीचा गोल केला. आरिदाने सांतानाने हा गोल करून संघाच्या पराभवाच्या छायेतून काढले. या सामन्यात हैदराबाद एफसीच्या आकाश मिश्राची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली.

Related Stories

म्हापसा पालिकेचा तक्रार निवारण कक्षाचा तपशीलच नाही

Patil_p

खारेबांद येथील नादुरुस्त सुलभ शौचालयाची पाहणी

Amit Kulkarni

’टीसीपी’ कायदा दुरुस्ती म्हणजे गोवा उद्ध्वस्त करण्याची घाई

Patil_p

सांखळीत तीन दिवसीय प्रदर्शन, विक्री केंद्राचे उद्घाटन

Amit Kulkarni

प्रत्येक माणसामध्ये एक मनोरूग्ण असतो

Amit Kulkarni

पर्वरीत ‘सेव्ह म्हादई सेव्ह गोवा’ चा निषेध मोर्चा

Amit Kulkarni