उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे अरण्य भागात एक वन निर्माण करण्यात येत आहे. हे वन पर्यटकांना ऑक्सिजन पुरविणार असून त्यांच्या प्रकृतीची देखभालही करणार आहे. या वनात विविध प्रकारच्या औषधी गुणयुक्त वनस्पतींची लागवड करण्यात येत असून या वनस्पतींपासून बनणारी औषधे आरोग्यासाठी लाभदायक असतात, असे प्रयोगांती आणि अनुभवावरून सिद्ध झाले आहे.


या वनात कडुलिंब, अर्जुन, बेहडा, गिलोय, अश्वगंधा, तेजपत्ता, केमोमाईल, लिंबू, लिंबू गवत इत्यादी 22 प्रकारच्या वनस्पती लावण्यात आल्या आहेत. सध्या या वनात 500 हून अधिक वृक्ष आहेत. येत्या 10 वर्षांत ही संख्या 100 पटीने वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या वनस्पतींचे औषधी गुण सिद्ध झालेले असून त्यामुळेच त्यांची निवड करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले.
लोकांच्या आरोग्याची देखभाल करण्याबरोबरच हे वन भरपूर प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठाही करणार आहे. यात लावण्यात आलेल्या वनस्पतींची हवा शुद्ध करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे प्रदुषणावरही ती लाभदायक ठरणार आहे, असा दावा तज्ञांकडून करण्यात येत आहे. हा उपक्रम सरकारी आणि खासगी भागीदारीतून साकारला जात आहे. लोकांना औषधी वनस्पतींची माहिती व्हावी, अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन करण्याचा प्रशासनाचा उद्देश असून या वनाचे पर्यटन करणाऱयांना शास्त्रशुद्ध माहितीही देण्यात येणार आहे. एकंदरीत हे वन केवळ मनोरंजनाचे साधन राहणार नसून प्रबोधनाचेही स्थळ बनविण्याची योजना आहे.