Tarun Bharat

आरोग्य शिक्षणाचे पाऊल

लोक एखादी गोष्ट जेव्हा स्वतः करतात, पाहतात तेव्हा शिकणे सहज आणि परिणामकारक होते. केवळ सांगण्याने एवढे काम होत नाही. वर्गातल्याप्रमाणे व्याख्यान देणे हे आरोग्य शिक्षणात फारसे उपयोगाचे नाही.

लिहिण्यावाचण्याची अनेक लोकांना सवय नसते व लिखित गोष्टींपेक्षा पाहणे, करणे हीच स्वयंशिक्षणाची पध्दत प्रचलित आहे. अर्थात काही ठिकाणी संवाद किंवा पोस्टर्सचा चांगला उपयोग होऊ शकतो. प्रत्येक माणूस उपलब्ध समोर असलेली माहिती, अनुभवातून स्वतःची कल्पना तयार करतो. बऱयाचवेळा प्रत्येकाची कल्पना थोडीथोडी वेगळी होऊ शकते. ही प्रक्रिया समजणे आणि त्यात मदत करणे हे आपले मुख्य काम आहे.

शब्दापेक्षा डोळयांनी पाहून चांगले समजते. शब्द ऐकणे, वाचणे यापेक्षा चित्र पाहणे हे अनेकपटींनी चांगले माध्यम आहे. शक्मय तिथे त्याचा वापर करा. पण त्यासाठी साधी, सोपी चित्रे वापरा. अनेक चित्रे लोकांना समजत नाहीत किंवा त्यातून चुकीचा, वेगवेगळा अर्थ निघू शकतो. लोकांना सहज समजतील, गैरसमज होणार नाहीत अशा चित्रकलेला कौशल्य लागते. चित्रांबरोबर पारदर्शिका, प्रतिकृती वगैरेंचाही चांगला उपयोग होतो. गुंतागुंतीची किंवा मोठी आकडेवारी देण्याचा मोह टाळावा. आकडेवारी द्यायची तर त्यांना समजतील अशा पद्धतींनी दिली पाहिजे. उदा. भारताच्या लोकसंख्येत दरवषी किती वाढ होते हे सांगण्यापेक्षा आपल्या गावात किती नवीन जन्म होतात हे सांगणे बरे. काही ठिकाणी लोकांना टक्केवारीपेक्षा आणेवारीची भाषा चांगली समजते. आकडेवारीची सवय असलेल्या लोकांना जे सहज समजते ते इतरांना समजेल अशी अपेक्षा बाळगू नये.

आपल्या ज्ञानाची, कौशल्याची प्रचिती आपल्या वागण्यातून आपोआप सहज दिसली पाहिजे. आपण एखाद्या विषयाचे तज्ञ आहोत असे भासवून आरोग्य शिक्षणाचे काम सोपे होते असे नाही. उलट लोक मनाने लांब सरकतात. नम्रता बाळगणे हेच जास्त कामाचे. तसेच फार अवघड तांत्रिक शब्द वापरण्याचे टाळावे. व्यवहारातले सोपे शब्द वापरावेत. न समजणारा एकही शब्द वापरू नये. समजेनासे शब्द कानावर आले की लोक अडखळतात व त्यांचे लक्ष उडून जाते. शक्मयतोवर त्यांना तुमच्या कार्यक्रमात सामील करून घ्या. त्यांना हाताने गोष्टी करून पाहू द्या. चुका करत शिकू द्या. लोक स्वतः चुका करून शिकतात तेव्हाच खरे शिकतात. चुकायला वाव ठेवायला पाहिजे. चुकांची भीती घालू नका. लहान मुलांच्या बाबतीतही हेच शिक्षणाचे सूत्र आहे.

शिकण्या-शिकवण्याचा प्रसंग आनंदाचा, उल्हासाचा झाला पाहिजे. ज्यात करमणूक, आनंद, उल्हास आहे अशा गोष्टींशी लोक समरस होऊन त्या स्मरणात ठेवतात. कुठल्याही प्रकारे त्यांचा अपमान होईल, पीडा होईल असे प्रसंग टाळलेच पाहिजेत. शिकण्यात आत्मसन्मान वाढतो. आनंद वाढतो. असे दिसले तर ते लवकर सामील होतील. व्यवहारातले दाखले द्या. जीवनाशी संबंध असलेल्या विषयांशी ते लवकर एकरूप होतात. दूरच्या गोष्टी टाळा. त्यांच्या मनात तुमच्या सांगण्यावरून काही प्रतिमा-चित्रे निर्माण झाली पाहिजेत. ती त्यांच्या जीवनात अनुभवायला मिळत असतील तरच तुमच्या तारा जुळतील.

लोकांकडून शिकण्याची तयारी ठेवा

लोकांकडून शिकण्यासारखे बरेच काही असते. फक्त त्यांना अनुभव सांगायला पुरेशी संधी, वेळ , जागा द्या. वैद्यकशास्त्रात लोकांनी भरपूर भर घातली आहे. विशेषतः प्राथमिक आरोग्यसेवांच्या बाबतीत तर ते अनेक चांगल्या सूचना करू शकतात. बाळांचे पोषण चांगले कसे करता येईल हे आयांना विचारा. त्या कितीतरी कल्पना सांगतील. अडचणी सोडवतील. सुरुवात स्वतःपासूनच करा. संदेश लाखमोलाचे पण सांगण्याची पध्दतही तशीच पाहिजे.

तुम्ही सांगताय ती माहिती फार मोलाची असेल. पण ती समजेल अशा पध्दतीने सांगितली गेली नाही तर फारसा उपयोग होणार नाही. सांगण्याच्या पध्दतीवर संवाद कौशल्यावर बरेच अवलंबून असते, त्याशिवाय यश मिळणार नाही.

Related Stories

कलारंगी विश्व रंगले..

Patil_p

नव्या युगातील आपण

Patil_p

महती माघ पौर्णिमेची

Patil_p

सरकारी शाळा क्र. 45 नार्वेकर गल्ली

Patil_p

प्रदूषणापासून सावध व्हा !

Patil_p

टेकिंगमास्टर हष

Patil_p