ऍपवर लसीकरणाची माहिती- प्रवासादरम्यान तपासणीत होणार सुलभता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आरोग्य सेतू ऍपवर आता कुठलाही व्यक्ती स्वतःच्या मोबाईलद्वारे लसीकरणाचा स्टेटस अपडेट करू शकणार आहे. ही सेल्फ असेसमेंट प्रक्रिया असणार आहे. सरकारनुसार ही सुविधा कुठलाही प्रवास करताना लसीकरणाच्या स्थितीची तपासणी सोपी करणार आहे. माहिती-तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने सर्व आरोग्य सेतू वापरकर्त्यांना अपडेट द व्हॅक्सिनेशन स्टेटसचा पर्याय मिळणार असल्याचे सांगितले आहे.
आरोग्य सेतूवर ही नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे. लसीचा एकच डोस मिळालेल्या लोकांच्या ऍपच्या होम स्क्रीनवर लसीकरणाच्या स्टेटसह सिंगल ब्ल्यू टिक दिसून येणार आहे. दुसरा डोस मिळाल्यावर अशा लोकांना ऍपवर डबल टिकयुक्त एक ब्ल्यू शील्ड दिसून येईल. कोविन पोर्टलशी लसीकरणाच्या स्थितीची पडताळणी झाल्यावर ही डबल टिक दिसून येणार आहे.
लसीकरणाचा स्टेटस कोविन नोंदणीसाठी वापरण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकावर अपडेट करता येऊ शकतो. आरोग्य सेतूवर सेल्फ असेसमेंट केल्यावर ज्या लोकांनी लसीचा किमान एक डोस घेतला आहे, त्यांना आरोग्य सेतूच्या होम स्क्रीनवर पार्शल व्हॅक्सिनेशन/व्हॅक्सिनेटेड (अनव्हेरिफाइड)चा टॅब मिळणार आहे.
सेल्फ असेसमेंटदरम्यान वापरकर्त्याकडून देण्यात आलेल्या लसीकरणाच्या माहितीवर ही प्रक्रिया आधारित आहे. कोविनशी ओटीपी आधारित पडताळणीनंर अनव्हेरिफाइड स्टेटस व्हेरिफाइड होतो. दुसऱया डोसच्या 14 दिवसांनी आरोग्य सेतूच्या होम स्क्रीनवर यू आर व्हॅक्सिनेटेड लिहिलेले दिसून येईल. यामुळे प्रवास किंवा कुठल्याही कँपसमध्ये जाण्यासाठी लसीकरणाच्या स्थितीची पडताळणी सहजपणे होणार आहे. भारतात 19 कोटींपेक्षा अधिक लोक आरोग्य सेतू ऍपचा वापर करत आहेत.