वार्ताहर / पाचगाव
आर के नगर येथील विद्युत वितरण कंपनी मधील कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीत बदल झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पाचगावचे माजी उपसरपंच संग्राम पोवाळकर यांनी शुक्रवारी शाखा अभियंता यांना दिला.
आर.के. नगर विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मनमानीपणा बद्दल सविस्तर वृत्त तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत माजी उपसरपंच संग्राम पोवाळकर यांनी आर. के. नगर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयातील शाखा अभियंत्यावर प्रश्नांचा भडिमार केला. या कार्यालयातील कर्मचारी आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलतात, ग्रामस्थांशी उद्धट वर्तणूक करतात, ग्राहकांच्या तक्रारींचे लवकर निवारण करण्यात येत नाही. अशा अनेक तक्रारी ग्रामस्थांच्या असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आनंदराव यादव यांनी सांगितले. कामचुकार कर्मचाऱ्यांवर आपण तातडीने कठोर कारवाई करणार असल्याचे यावेळी शाखा अभियंता यांनी स्पष्ट केले .
आर के नगर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालया मार्फत पाचगाव आर के नगर कंदलगाव मोरेवाडी गिरगाव परिसरातील सुमारे 19000 ग्राहकांना सेवा पुरवण्यात येते मात्र यासाठी केवळ चार कर्मचारी कार्यरत आहेत. तर दोघांची बदली झाली आहे. या कार्यालयासाठी चार कंत्राटी कामगार मुख्य कार्यालयाकडून पाठवण्यात आले आहेत. मात्र त्यापैकी एकच कामगार हजर झाला आहे. तर बाकीचे तीन कामगार विद्युत वितरण कंपनीच्या कामासाठी पात्र नसल्याचे समजते. यामुळे केवळ चार कर्मचाऱ्यांवर 19000 ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी आहे. प्रत्यक्षात या कामासाठी सुमारे वीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. नियमित लाईट बिल भरणाऱ्या ग्राहकांना विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे .


previous post