Tarun Bharat

आर. विनयकुमारचीही निवृत्तीची घोषणा

‘दावणगेरे एक्स्प्रेस’चा प्रथमश्रेणी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या व राज्य संघाला सलग दोनवेळा रणजी स्पर्धा जिंकून देणाऱया कर्नाटकाचा अनुभवी मध्यमगती गोलंदाज आर. विनयकुमारने शुक्रवारी प्रथमश्रेणी व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 37 वर्षीय विनयकुमारने 1 कसोटी, 31 वनडे व 9 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले  असून तिन्ही क्रिकेट प्रकारात एकत्रित 49 बळी घेतले आहेत. दावणगेरे एक्स्प्रेस या टोपण नावाने त्याला ओळखले गेले.

प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये आर. विनयकुमारने सातत्यपूर्ण प्रदर्शन साकारले. त्याने 139 सामने खेळत 22.44 च्या सरासरीने 504 बळी घेतले. यात 32 धावात 8 बळी, ही त्याची डावातील सर्वोत्तम गोलंदाजी होती.

‘सचिन, महेंद्रसिंग धोनी, विराट यांच्यासमवेत खेळत असताना मी प्रगल्भ झालो. अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सेहवाग, गौतम गंभीर, सुरेश रैना, रोहित शर्मा यांच्या अनुभवाने अधिक समृद्ध झालो’, असे आर. विनयकुमार याप्रसंगी म्हणाला. आर. विनयकुमारने 2004-05 हंगामात कर्नाटकतर्फे रणजी पदार्पण केले आणि त्यानंतर तो याच संघाचा सर्वात अनुभवी सीमर म्हणूनही खेळला. 2007-08 व 2009-10 चे रणजी हंगाम त्याच्यासाठी अधिक फलदायी ठरले. या हंगामातील कामगिरीमुळेच त्याला आरसीबीतर्फे आयपीएल खेळण्याचीही संधी मिळाली. याशिवाय, 2013-14 व 2014-15 या सलग दोन हंगामात त्याने कर्नाटक राज्य संघाला सलग दोन जेतेपदे मिळवून देण्याचा पराक्रमही गाजवला.

वनडे क्रिकेट प्रकारात त्याने इंग्लंडविरुद्ध 2011 दिल्लीतील वनडेत 30 धावात 4 बळी घेतले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे हे सर्वोत्तम गोलंदाजी पृथक्करण ठरले. आयपीएलमध्ये त्याने आरसीबीबरोबरच केकेआर, मुंबई इंडियन्स व कोची टस्कर्स केरळ संघाचेही प्रतिनिधीत्व केले. लिस्ट ए क्रिकेटमध्ये 141 सामन्यात त्याच्या खात्यावर 24.39 च्या सरासरीने 225 बळी नोंद आहेत. 34 धावात 5 बळी, ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. 2019 मध्ये त्याने रणजी स्पर्धेत कर्नाटकाऐवजी पुदुच्चेरी संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. केएससीए व बीसीसीआयचेही त्याने याप्रसंगी विशेष आभार मानले आहेत.

दावणगेरे एक्स्प्रेस 25 वर्षे धावल्यानंतर आणि क्रिकेट कारकिर्दीत कित्येक स्टेशन अनुभवल्यानंतर आता रिटायरमेंट नावाच्या स्टेशनवर येऊन थांबले आहे. मी आंतरराष्ट्रीय व प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. सचिन, धोनी, विराट यांच्यासमवेत खेळण्याची संधी मिळाली, हा मी माझा सन्मान मानतो.

-मध्यमगती गोलंदाज आर. विनयकुमार

Related Stories

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत ठाकुर पिता-पुत्राचे विजय

Patil_p

बंदी उठविण्याची कनेरियाची पीसीबीला विनंती

Patil_p

बांगलादेशचा 103 धावांत खुर्दा, विंडीज सुस्थितीत

Patil_p

वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटनमध्ये भारतीयांना कठीण ड्रॉ

Amit Kulkarni

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 27 ऑगस्टपासून,

Patil_p

‘२५ तास’ पाण्यावर तरंगत योगासने करण्याचा विक्रम..!

Rohit Salunke