Tarun Bharat

आली… निवडणूक घटिका समीप !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात होणारी जिल्हा पंचायतीची निवडणूक ही पहिलीच असल्याने मतदार कसा प्रतिसाद देतील हे पहावे लागेल. राज्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी धोका टळलेला नाही.

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अडकलेली गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणूक 12 डिसेंबर रोजी घेण्याचा विचार असून राज्य निवडणूक आयुक्ताकडून लवकरच तशी अधिकृत घोषणा होऊ शकते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने मतदार कसा प्रतिसाद देतील हे पहावे लागेल. राज्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे चोख व्यवस्थेबरोबरच मतदान केंद्रावर काही नवीन बदलही अपेक्षित आहेत.

गेल्या 22 मार्च रोजी हे मतदान होणार होते. प्रचार संपुष्टात आला आणि त्याचवेळी देशावर कोरोनाचे संकट धडकले. संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने मतदानाच्या दिवशीच जनता कर्फ्यू लागू केला व पुढे 21 दिवसांचे पूर्ण लॉकडाऊन झाले. आता तब्बल 8 महिन्यानंतर ही निवडणूक होत आहे. निवडणुकीची प्रक्रिया या आधीच पूर्ण झाल्याने मतदान तेवढे पार पडणार व मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यापर्यंत सोपस्कार होतील. गोव्यात दक्षिण व उत्तर अशा दोन जिल्हा पंचायती कार्यरत असून दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 25 याप्रमाणे एकूण 50 मतदारसंघ आहेत. गोव्यात सन 2000 मध्ये पहिली निवडणूक झाली व यंदा होणारी ही चौथी जि. पं. निवडणूक आहे. 2015 पासून या निवडणुका पक्ष पातळीवर होत आहेत. त्यानुसार सत्ताधारी भाजपाने यंदा उत्तरेतील सर्व 25 तर दक्षिणेत 16 अशा 41 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. विरोधी काँग्रेस पक्षाने उत्तरेतून 21 तर दक्षिणेतून 16 मिळून 37 तर प्रमुख प्रादेशिक पक्ष असलेल्या मगोचे दक्षिणेतून 10 तर उत्तरेतून 7 असे 17 उमेदवार रिंगणात आहेत. सध्या सरकारच्या विविध धोरणांवर आक्रमकपणे टीका करणारा आम आदमी पक्षही या स्पर्धेत असून त्यांनी ख्रिस्तीबहुल दक्षिण गोव्यात 14 तर उत्तरेत 7 उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादीचेही 7 उमेदवार रिंगणात असून गोवा फॉरवर्डने मात्र अधिकृतरित्या आपला एकही उमेदवार निवडणुकीत उतरविलेला नाही. सांकवाळ मतदारसंघातून भाजपाच्या अनिता थोरात या बिनविरोध निवडून आल्याने प्रत्यक्षात 49 जागांवर मतदान होणार असून एकूण 203 उमेदवार रिंगणात आहेत.

तसे पाहिल्यास गोव्यात जि.पं.ला विशेष महत्त्व नाही. पंचायतराज कायद्यात अनेक अधिकार दिले असले तरी ते केवळ कागदावरच दिसतात. मात्र पक्ष पातळीवर ही निवडणूक होत असल्याने राजकीयदृष्टय़ा तिला विशेष महत्त्व आहे. सत्ताधारी भाजपा सरकारसह सर्व पक्षांसाठी ती महत्त्वाची आहे. कारण राज्यातील नगरपालिकांची मुदत संपुष्टात आली असून विधानसभा निवडणुकाही एका वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे जनमत आजमावण्यासाठी जि.पं. ही येणाऱया विधानसभा निवडणुकीची नांदी ठरणार हे निश्चित. राज्यातील बंद असलेला खाण व्यवसाय सुरु करण्याच्या सरकारच्या हालचाली,  दहा हजार नोकर भरतीची मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा, म्हादईच्या मुद्यावर घेतलेली ताठर भूमिका व राज्याचे कोळसा हब होऊ देणार नाही! हे जाहीर विधान लक्षात घेतल्यास सरकार निवडणूक घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत होते. उमेदवारांनाही याची कुणकुण लागल्याने त्यांनी प्रचारावर पुन्हा जोर दिला आहे. दुहेरी रेल्वे ट्रक यासह कोळसा वाहतूक व अन्य मुद्यांवर विरोधकांनी भाजपा सरकार विरोधात आंदोलनाचे रान उठविले आहे. त्यात सत्तरीत होऊ घातलेल्या आयआयटी प्रकल्पाला होणारा विरोध असे अनेक मुद्दे भाजपाला अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत काही राजकीय गृहितके लक्षात घ्यावी लागतील. गेल्या वर्षी झालेली लोकसभा निवडणूक व विधानसभेच्या चार मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीच्या तोंडावर मगो-भाजपाची युती तणावग्रस्त स्थितीत संपुष्टात आली. त्यामुळे सत्तेबाहेर पडलेला मगो पक्ष भाजपाचा कडवा प्रतिस्पर्धी बनला. काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष असला तरी भाजपाला धडा शिकविण्यासाठी जिल्हा पंचायत उमेदवार उभे करताना वेगळी रणनीती आखली गेली. काँग्रेसशी अंतर्गत समझोता करून भाजपाला शह देण्यासाठी ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आहेत, तेथे मगोने उमेदवार उभे केलेले नाहीत. काँग्रेसनेही त्यांच्या या रणनीतीला साथ देत मगो विरोधात उमेदवार ठेवलेले नाहीत. मागच्या निवडणुकीत मगो भाजपा युती असल्याने 50 पैकी बहुतांश जागांवर युतीचे उमेदवार जिंकले होते. कोरोनामुळे मध्यंतरी बराच काळ गेल्याने व राजकीय समीकरणे बदलल्याने हे दोन्ही पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याची शक्यता लक्षात घ्यावी लागेल. म्हादईवर झालेली गोव्याची कोंडी व राज्यात कोळसा आणण्यासाठी मगोने भाजपाएवढेच काँग्रेसलाही जबाबदार धरले आहे. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षातील अंतर्गत सौदा कितपत टिकेल याबाबत प्रश्नचिन्ह आहे. विशेष म्हणजे सध्या आपने गोव्यात हातपाय पसरायला सुरुवात केली असून सरकार विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. आपने 21 उमेदवार रिंगणात उतरविल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. कारण गोव्यातील ख्रिस्ती मतदार हा काँग्रेसला नेहमीच हक्काची व्होटबँक वाटत आला आहे. या समाजातील नवमतदार आपकडे आकर्षित होऊ लागल्याने दक्षिण गोव्यात काँग्रेसला त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. विविध पक्षांच्या अधिकृत उमेदवारांबरोबरच अपक्ष उमेदवार व पक्ष विरोधात जाऊन निवडणूक लढविणाऱया उमेदवारांमुळे काही मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याचा संभव आहे. या एकूण पार्श्वभूमीवर निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

– सदानंद सातारकर

Related Stories

विमानतळाचे स्वप्न वीस वर्षांनंतर सत्यात

Patil_p

मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार का गेले?

Patil_p

फिरकीचा सम्राट!

Patil_p

कोरोना: पंतप्रधान नरेंद्र मोदी चक्रव्यूहात

Patil_p

जीएमओची निष्पत्ती

Patil_p

धुमसता ड्रगन

Patil_p