Tarun Bharat

आशियाई चॅम्पियनशिपसाठी अमित, विकासचा संघात समावेश

आवश्यक परवानगी मिळाल्याने 21 मे रोजी भारतीय पथक दुबईकडे प्रयाण करणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य व आशियाई चॅम्पियनशिपचा विद्यमान विजेत्या अमित पांघलसह ऑलिम्पिकला जाणाऱया बॉक्सर्सना आशियाई चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. प्रवासाची आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर 21 मे रोजी भारतीय पथक दुबईला प्रयाण करणार आहे.

आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप आधीच्या नियोजनाप्रमाणे दिल्लीतच होणार होती. पण कोरोनाच्या दुसऱया लाटेने भारतात हाहाकार माजवल्याने ही स्पर्धा दुबईत घेण्याचे ठरविण्यात आले. स्पर्धा दुबईत होणार असली तरी त्याचे यजमानपद भारताकडेच असणार आहे. स्पर्धा 24 मेपासून सुरू होणार असून त्याआधी 23 मे रोजी ड्रॉ काढण्यात येणार आहे. भारतातून होणाऱया आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध घातल्यामुळे भारतीय संघासमोर अडचण निर्माण झाली होती. मात्र संयुक्त अरब अमिरातच्या अधिकाऱयांनी मंगळवारी भारतीय खेळाडूंच्या प्रवासाला परवानगी दिल्यामुळे भारतीय पथकाचा सहभागाचा मार्ग सुकर झाला आहे.

पुरुष संघात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या दोन मुष्टियोद्धय़ांचा यात समावेश नाही. मनीष कौशिक (63 किलो वजन गट) व सतीश कुमार (91 किलोवरील गट) या दोघांनाही कोरोनाची बाधा झाली असून त्यातून ते बरे होत आहेत. टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताचे एकूण पाच मुष्टियोद्धे पात्र ठरले आहेत. कौशिकच्या जागेवर चारवेळा आशियाई पदक मिळविणाऱया शिवा थापाला तर सतीश कुमारच्या जागी नरेंदरला स्थान देण्यात आले आहे. महिला संघाची घोषणा गेल्या महिन्यातच करण्यात आली असून एमसी मेरी कोम (51 किलो गट) प्रमुख आव्हानवीर आहे.  या संघात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या सिमरनजित कौरसह (60 किलो) चारही खेळाडूंचा समावेश आहे. सिमरनजितलाही कोरोनाची लागण झाली होती. पण त्यातून ती पूर्ण बरी झाली आहे.

‘यूएई सरकार, यूएईमधील भारतीय राजदूत पवन कपूर, एएसबीसीचे अध्यक्ष अनास अलोतायबा, ज्यांनी आमच्या संघाला दुबईतील प्रवासाची परवानगी मिळवून देण्यासाठी मोलाची मदत केली, त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो,’ असे भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष अजय सिंग म्हणाले. ‘ऑलिम्पिकची तयारी शेवटच्या टप्प्यात असल्याने ही स्पर्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पण प्रवासाची अडचण निर्माण झाल्याने आमची चिंता वाढली होती. पण या सर्वांनी मोलाचे सहकार्य केल्यामुळेच त्या स्पर्धेत आता भारतीय संघ सहभागी होणार आहे,’ अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

पुरुष संघात विकास कृशन (69 किलो गट), आशिष कुमार (75 किलो), यांचाही समावेश आहे. महिला संघामध्ये एक बदल करण्यात आला असून नागालँडच्या लालबुआतसैहीला (64 किलो) प्विलाव बासुमातरीच्या जागी निवडण्यात आले आहे. बासुमातरीच्या पासपोर्टचे अद्याप नूतनीकरण झाले नसल्याने तिला माघार घ्यावी लागली आहे.

2019 च्या थायलंडमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपच्या आवृत्तीत भारताने सर्वोत्तम प्रदर्शन करताना 13 पदके पटकावली होती. त्यात 2 सुवर्ण, 4 रौप्य व सात कांस्यपदकांचा समावेश होता. आगामी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या बॉक्सर्सची नियमित अंतराने आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात येत असून पतियाळा, पुणे व बेंगळूर येथे बायोबबलमध्ये त्यांचा सरावही सुरू आहे.

Related Stories

कॅचेनोव्ह, इव्हान्स दुसऱया फेरीत

Patil_p

स्पोर्टिंग प्लॅनेट संघाकडे फँको चषक

Omkar B

अँडरसनने कुंबळेला मागे टाकले

Patil_p

हिमा दासचे सुवर्ण कोरोना योद्धय़ांना समर्पित

Patil_p

सौराष्ट्र-बंगाल लढत रंगतदार स्थितीत

tarunbharat

बाबर आझम, इमाम उल हक पहिल्या कसोटीतून बाहेर

Patil_p