Tarun Bharat

आशियाई सुवर्णजेते डिंको सिंग कालवश

Advertisements

लिव्हर कॅन्सरशी प्रदीर्घ झुंज अखेर निष्फळ, अवघ्या 42 व्या वर्षी मुष्टियुद्ध वर्तुळातील एका पर्वाची सांगता

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

करारी व्यक्तिमत्त्व आणि बॉक्ंिसग रिंगमधील धडाकेबाज खेळाच्या बळावर असंख्य भारतीय युवा मुष्टियोद्धय़ांचे प्रेरणास्थान बनलेले आशियाई सुवर्णजेते माजी मुष्टियोद्धा डिंको सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. अवघ्या 42 वर्षांचे डिंको सिंग 2017 पासून लिव्हर कॅन्सरविरुद्ध झुंजत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

कर्करोगाशी झुंजणाऱया डिंको सिंग यांनी गतवर्षी कावीळ व कोरोनावर यशस्वी मात केली होती. मात्र, कर्करोगाविरुद्ध त्यांची झुंज निष्फळ ठरली. ‘आम्ही आज महान क्रीडापटू गमावला आहे’, अशी प्रतिक्रिया ऑलिम्पिक पात्र मुष्टियोद्धा विकास कृष्णनने व्यक्त केली. डिंको सिंगनी 1998 मध्ये बँकॉक आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते. आश्चर्य म्हणजे 1982 मधील कौर सिंगच्या पदकानंतर या स्पर्धेत तब्बल 16 वर्षे भारताची पाटी कोरीच राहिली. तो दुष्काळ डिंको यांनी संपुष्टात आणला होता.

‘डिंको सिंगच्या निधनामुळे भारतीय मुष्टियुद्धाची अपरिमित हानी झाली आहे. भारतीय युवा मुष्टियोद्धय़ांसाठी ते प्रेरणास्थान होते आणि यापुढेही राहतील’, असे भारतीय मुष्टियुद्ध संघटनेचे अध्यक्ष अजय सिंग म्हणाले. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनीही या अव्वल मुष्टियोद्धय़ाला श्रद्धांजली वाहिली. ‘डिंको सिंग हे भारतात घडलेल्या काही अव्वल मुष्टियोद्धय़ांपैकी एक होते. डिंकोनी 1998 बँकॉक आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकल्यानंतर या खेळाला खऱया अर्थाने लोकप्रियता मिळाली’, असे रिजिजू म्हणाले.

मणिपुरी सुपरस्टार असलेल्या डिंको यांनी सब-ज्युनियर गटात अवघ्या 10 व्या वर्षीच पहिलेवहिले राष्ट्रीय जेतेपद काबीज केले होते. आशियाई सुवर्ण जिंकल्यानंतर ते आधुनिक मुष्टियुद्धातील स्टार क्रीडापटू ठरले. सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या एमसी मेरी कोमसारख्या अनेक अव्वल मुष्टियोद्धय़ांसाठी ते खरेखुरे हिरो होते.

रिंगमध्ये बेधडक प्रतिस्पर्धी असणाऱया डिंकोने बँकॉकमध्ये सुवर्ण जिंकताना थायलंडच्या सोन्ताया वोंगप्रेटस् व उझ्बेकच्या तिमूर या दोन ऑलिम्पिक पदकजेत्यांना धूळ चारण्याचा पराक्रम गाजवला होता.

कारकिर्दीतील सर्वोच्च पदक जिंकले, त्याच वर्षात अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले गेलेले डिंको सिंग पुढे 2013 मध्ये पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरले. डिंकोनी 2000 साली संपन्न झालेल्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले. मात्र, प्री-क्वॉर्टर्समध्येच त्यांचे आव्हान संपुष्टात आले. भारतीय नौदलात कार्यरत डिंको निवृत्ती स्वीकारल्यानंतर इम्फाळच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात प्रशिक्षकपदी रुजू झाले. मात्र, आजारपणामुळे त्यांना सातत्याने घरीच रहावे लागले होते.

गतवर्षी रेडिएशन थेरेपी घेण्यासाठी दिल्ली गाठणे आवश्यक असताना प्रवास करणे अडचणीचे असल्याने त्यांच्यासाठी एअर ऍम्ब्युलन्स उपलब्ध करुन दिली गेली. पण, कावीळ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर रेडिएशन करता आले नव्हते. त्यांना पुन्हा इम्फाळला नेण्यात आले. मात्र, या प्रवासादरम्यान त्यांना कोरोनाची बाधा झाली. पुढे एका महिन्याच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली होती.

डिंको सिंग हे रॉकस्टार होते, लिजेण्ड होते. मणिपूरमध्ये त्यांच्या लढती पाहण्यासाठी मी रांगेत थांबून गॅलरीत पोहोचत असे. ते खऱया अर्थाने माझे हिरो होते, प्रेरणास्थानही होते. त्यांच्या निधनामुळे आपल्या सर्वांची अपरिमित हानी झाली आहे.

-भारताची अव्वल महिला मुष्टियोद्धा एमसी मेरी कोम

Related Stories

चहलला क्रीझचा आणखी उत्तम लाभ घेता येईल

Patil_p

बार्टी, अझारेन्का, बेडोसा, स्विटोलिना, नदाल तिसऱया फेरीत

Patil_p

प्ले-ऑफ निश्चितीसाठी मुंबईला आज शेवटची संधी

Amit Kulkarni

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला आर्थिक फटका

Patil_p

माजी क्रिकेटपटू फिल कार्लसन कालवश

Patil_p

बाबर आझम, ऍलीसा हिली महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू

Patil_p
error: Content is protected !!