वृत्तसंस्था/ बँकॉक
आशियाई चषक पुरुष आणि महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत भारताची महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्राने शुक्रवारी एकेरीची उपांत्य फेरी गाठताना चीन तैपेईच्या चेन युचा पराभव केला. पुरुष विभागात भारताच्या जी. साथीयान आणि राष्ट्रीय विजेता शरथ कमल यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
44 व्या मानांकित मनिका बात्राने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत शुक्रवारी चीन तैपेईच्या 23 व्या मानांकित चेन झु यु हिचा 4-3 असा (6-11, 11-6, 11-5, 11-7, 8-11, 9-11, 11-9) असा पराभव केला. आशियाई चषक टेबल टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारी मनिका बात्रा ही भारताची पहिली टेबल टेनिसपटू आहे. या स्पर्धेमध्ये मनिका बात्राने गुरुवारी झालेल्या सामन्यात चीनच्या सातव्या मानांकित चेन झिंगटाँगला पराभवाचा धक्का देत पुढील फेरीत स्थान मिळविले होते. कोरियाची झी आणि जपानची मिमा इटो यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर मनिकाची उपांत्य फेरीची लढत होणार आहे.
पुरुषांच्या एकेरीत भारताच्या जी. साथीयान आणि राष्ट्रीय विजेता शरथ कमल यांचे आव्हान संपुष्टात आले. 44 व्या मानांकित शरथ कमलला या स्पर्धेत पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली होती. चीन तैपेईच्या चुआँग युआनने शरथ कमलचा 4-3 अशा गेम्समध्ये (11-9, 11-8, 7-11, 9-11, 11-6, 10-12, 11-6) असा पराभव केला. या स्पर्धेत शरथ कमलने चीन तैपेईच्या युआनचा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. ही स्पर्धा 19 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.